Meteorological Research on Return Monsoon Rainfall: यंदाच्या मॉन्सूनवर ‘एल निनो’चे सावट असल्याचा अंदाज पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वर्तविण्यात आला होता. त्यामुळे राज्यात दुष्काळाची शक्यता होतीच. आता ती शक्यता खरी होताना दिसते. १४ सप्टेंबरपर्यंत राज्याच्या पावसात तब्बल १६ टक्क्यांपर्यंत तूट आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात भर पावसाळ्यात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. शेतातील पिके करपली. नदी-नाले कोरडे ठाक पडले आहेत. राज्यातील जनता ऑक्टोबर हीट सप्टेंबर सुरुवातीपासूनच अनुभवत आहे..अशा परिस्थिती शेतकऱ्यांसह शासनाला देखील परतीच्या पावसावर थोडी बहुत आशा होती. परंतु आता राजस्थानमधून मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच एल निनो तीव्र होत चालल्याने परतीचा पाऊसदेखील हुलकावणी देण्याचीच शक्यता अधिक आहे. पिकांची वाढ अन् पक्व अवस्थेत पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे..धाराशिव जिल्ह्यात पावसाचा ८० दिवसांचा खंड पडला असून पिकांचे नुकसान ८५ टक्क्यांवर पोहोचले असल्याचा अहवाल आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी दिला आहे. उर्वरित दुष्काळी भागात असेच काहीसे चित्र आहे. अशा वेळी परतीच्या पावसाने पाठ फिरविली, तर दुष्काळी पट्ट्यात पिकांचे १०० टक्के नुकसान होऊन जनावरांचा चारा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो..Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही .मॉन्सूनच्या आगमनाविषयी जितके संशोधन झालेले आहे, तितके मॉन्सूनच्या परतीविषयी केले गेलेले नाही. मॉन्सूनचे आगमन ही एक नैसर्गिक घटना असते जी आपल्याला डोळ्यांनी दिसते. मॉन्सूनचे वारे वाहू लागतात. पाऊस पडू लागतो. मॉन्सूनचे परतणे तसे नसते. अनेकदा आपल्याला त्याची जाणीव देखील होत नाही. साधारण १७ सप्टेंबरला मॉन्सून देशाच्या वायव्य भागातून माघारी सरण्यास सुरुवात होते..परतत असताना १९ दिवसांनी म्हणजे सरासरी ५ ऑक्टोबरच्या दरम्यान ईशान्य दिशेकडून महाराष्ट्राच्या प्रवेशद्वाराजवळ आणि पाच दिवसांतच म्हणजे १० ऑक्टोबरला मॉन्सून राज्यातून पूर्णपणे परतून निघून जातो. या पाच दिवसांतच नैॡत्येकडून येणारे बाष्पयुक्त वारे व ईशान्येकडून येणारे कोरडे वारे यांच्या संयोगातून राज्यात पाऊस पडतो. हाच खऱ्या अर्थाने परतीचा पाऊस आहे..हा पाऊस पडण्याचा कालावधी पाच दिवसांऐवजी कधी एक दिवस, तर कधी आठ दिवसांपर्यंत असू शकतो. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर सह सोलापूर संपूर्ण जिल्हा, तसेच सांगली, साताऱ्याच्या दुष्काळी पट्ट्यात खरीप हंगामात पुरेसा पाऊस पडत नाही, तेथे परतीचा पाऊस प्रामुख्याने रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरतो..Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ.कमी कालावधीत, कमी क्षेत्रावर आणि कमी प्रमाणातच होणाऱ्या, परंतु खरीप तसेच रब्बी हंगामासाठी देखील उपयुक्त अशा परतीच्या पावसाचा अभ्यास हवामानतज्ज्ञांनी वाढवायला हवा. २०२० पासूनच्या हवामानशास्त्र विभागाच्या नव्या वेळापत्रकानुसार राजस्थानवरून मॉन्सूनच्या परतीची सुरुवात सरासरी १७ सप्टेंबरच्या आसपास होते. ही आधीच्या सरासरी तारखेपेक्षा १५ दिवस उशिराने आहे..महाराष्ट्रावरून नैॡत्य मॉन्सूनच्या माघारीच्या सरासरी तारखा पण आता बदलल्या गेल्या आहेत. त्यासुद्धा पहिल्यापेक्षा ५ ते १० दिवस उशिरा आहेत. कोकण ८ ऑक्टोबर, मध्य महाराष्ट्र ८ ते १३ ऑक्टोबर, मराठवाडा ९ ऑक्टोबर आणि विदर्भ ८ ऑक्टोबर अशा मॉन्सूनच्या परतीच्या नव्या सरासरी तारखा आहेत..या बदलत्या तारखांनुसार पीक पद्धती, पीक व्यवस्थापनातील बदल याबाबत देखील संशोधनात्मक अभ्यासातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हायला हवे. एकंदरीतच काय तर दुष्काळ आता उंबरठ्यावर आहे. याची चाहूल फार आधी लागली होती. परंतु आपण त्याबाबत गाफीलच राहिलो. आता दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्यात जोर धरत आहे. शेतकऱ्यांचा फार अंत न पाहता दुष्काळ जाहीर करून त्या आनुषंगिक उपाययोजना केल्या तर शेतकऱ्यांना अल्प दिलासा मिळू शकतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.