Retreating Monsoon : परतीचा पाऊस -हवी अधिक स्पष्टता

Monsoon Rain : मागील काही वर्षांपासून परतीच्या पावसाला उशिरा सुरुवात होऊन तो बराच काळ राज्यावर रेंगाळत असल्याने खरीप तसेच रब्बी या दोन्ही हंगामांसाठी तो नुकसानकारक ठरत आहे.
Monsoon Rain
Monsoon Rain Agrowon
Published on
Updated on

Monsoon Update : राज्यात सध्या हिवाळ्याची चाहूल लागल्यासारखे वाटत असतानाच पावसास पोषक वातावरण तयार होऊन कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. त्यातच या वर्षी परतीच्या पावासाचा प्रवास थोड्या उशिरानेच सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. खरे तर २०२० मध्ये हवामान विभागाने परतीच्या पावसाचे नवे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार राजस्थानमधून मॉन्सूनच्या परतीची सुरुवात १७ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

अर्थात, पूर्वीच्या सरासरी परतीच्या तारखेपेक्षा (१ सप्टेंबर) ही सुधारित तारीख १५ दिवसांहून अधिक उशिराने आहे. या वर्षी मात्र १७ सप्टेंबर ही तारीख उलटून गेली तरी राजस्थान, गुजरात, उत्तराखंडसह वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीसाठी अद्यापही पोषक स्थिती दिसत नाही. मागील पाच वर्षांच्या मॉन्सूनच्या परतीच्या वाटचालीवर नजर टाकली असता सप्टेंबर शेवटी ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वायव्य भारतातून मॉन्सूनने परतीची वाटचाल सुरू केली. वायव्य भारतातून मॉन्सूनने माघार घेतल्यानंतर महाराष्ट्रातून परतीच्या वाटचालीस १५ ते २० दिवस लागतात. मॉन्सून परतत असताना राज्याच्या काही भागांत पाऊस होतो.

Monsoon Rain
Monsoon 2024 : मॉन्सूनचा परतीचा मुहूर्त लांबतोय

आपण मॉन्सूनचा संबंध थेट पावसाशी जोडत असलो तरी मॉन्सूनचा खरा संबंध हा पावसाशी नसून वाऱ्यांच्या दिशेशी असतो. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांतील वारे नैर्ऋत्येकडून वाहतात आणि समुद्रावरचे बाष्प, ढग व पाऊस जमिनीवर घेऊन येतात. पण सप्टेंबरमध्ये वारे उलट दिशेने वाहू लागतात. ते उत्तरेकडची कोरडी हवा दक्षिणेकडे आणतात आणि पाऊस कमी होतो किंवा थांबतो. यालाच मॉन्सूनची माघार किंवा परतीची प्रक्रिया म्हणतात.

नैर्ऋत्य मॉन्सून आणि ईशान्य मॉन्सूनच्या प्रवाहांत ज्या वेळी संक्रमण होते त्या वेळी पडलेल्या पावसाला राज्यात परतीचा पाऊस असे म्हटले जाते. मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासावेळी राज्यात खरीप हंगामातील पिकांची काढणी, तर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणी सुरू असते. राज्यात जून ते सप्टेंबर हा पाऊसमानाचा काळ धरून येथील खरीप तसेच रब्बी हंगामासाठीचे पीक पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे.

Monsoon Rain
Maharashtra Rain Alert : उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज; मराठवाडा आणि विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात होणार

परंतु मागील काही वर्षांपासून परतीच्या पावसाला उशिरा सुरुवात होऊन तो बराच काळ (ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत) राज्यावर रेंगाळत असल्याने या दोन्ही हंगामांसाठी तो नुकसानकारक ठरत आहे. परतीचा पाऊस लांबला, रेंगाळला तर खरिपातील काढणीला आलेले सोयाबीन आणि पहिल्या-दुसऱ्या वेचणीचा कापूस भिजतो, तर रब्बी हंगामातील हरभरा, गहू या पिकांना वरचा पाऊस लाभदायक समजला जात नाही.

अशावेळी परतीच्या मॉन्सूनच्या बदलत्या ‘पॅटर्न’नुसार खरीप तसेच रब्बी हंगामातील पीक पेरणीच्या नियोजनात काही बदल करावा लागेल का, हेही पाहायला हवे. हवामानशास्त्रज्ञांनी मॉन्सूनच्या आगमनाची व्याख्या काटेकोरपणे केलेली आहे. परतीच्या पावसाच्या बाबतीत मात्र तसे नाही. मॉन्सूनचे आगमन किंवा त्याचे एखाद्या ठिकाणी दाखल होणे ही एक नैसर्गिक घटना असते जी आपल्याला डोळ्यांनी दिसते, कारण पाऊस पडू लागतो, वारे नैर्ऋत्येकडून वाहू लागतात.

पण मॉन्सूनचे परतणे तसे नसते. मॉन्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस पुष्कळदा विश्रांती घेतो व पुन्हा सुरू होतो. तेव्हा मॉन्सूनने माघार घेणे ही तशी एका विशिष्ट स्वरूपाची घटना नाही. आपल्याला तिची जाणीव प्रत्येक वेळी होईलच असेही नाही. अनेकदा कुणालाही चाहूल लागू न देता मॉन्सूनने राज्यातून काढता पाय घेतला आहे. अशावेळी मॉन्सूनच्या परतीचा हवामानतज्ज्ञांनी अभ्यासही वाढवायला हवा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com