Heavy Rain Crop Loss Maharashtra : खरे तर ‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. श्रावण सरीनंतर राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु मागील तीन-चार वर्षांपासून पोळा ते अगदी दसरा, दिवाळीपर्यंत चांगला पाऊस पडत आहे. राज्यात १५ ऑगस्टपर्यंत पाऊस अनियमितच होता. त्यानंतरही विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. विदर्भातील अकोला, वाशीम, यवतमाळसह मराठवाड्यातील नांदेड, लातूर, हिंगोलीमध्ये मागील दहा दिवसांत दोनदा झालेल्या अतिवृष्टीने पिके जमीनदोस्त झाली आहेत. सप्टेंबरमध्येही देशभर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असल्याने अतिवृष्टीने हाती येणाऱ्या पिकांचे नुकसान वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. .पावसाचा हा प्रकोप महाराष्ट्रापासून उत्तराखंड, जम्मू- काश्मीरपर्यंत सुरू आहे. पूर्वोत्तर तसेच दक्षिणेतील राज्यांना देखील अतिवृष्टी महापुराचे तडाखे बसले आहेत. जूनमध्ये हिमाचल प्रदेशात पावसाने हाहाकार माजविल्यानंतर उत्तराखंडमध्ये ऑगस्टमध्ये दोनदा ढगफुटी झाली. जम्मू- काश्मीरमध्येही ढगफुटीचा कहर सुरू आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू- काश्मीरमधील ढगफुटीनंतर भूस्खलन होऊन तिथे अनेक जणांना प्राणास मुकावे लागले आहे. शेतीबरोबर एकंदरीतच पूरक व्यवसायाला देखील हवामान बदलाचा तडाखा बसला असून, त्यामुळेच या बदलास पूरक अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतीच बोलून दाखविली आहे..Rain Crop Damage : अतिवृष्टीने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास.देशातील एकूण जमीन क्षेत्रापैकी १२ टक्के क्षेत्राला भूस्खलनाचा धोका असल्याचे भारतीय भूगर्भ सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या अभ्यासावरून पुढे आले आहे. भूस्खलन प्रवण क्षेत्रात हिमालयाच्या रांगा तसेच पश्चिम घाटाचा प्रामुख्याने समावेश आहे. मागील दशकात आसाम, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि केरळमध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून आणि जमीन खचल्याने हजारो लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. भूस्खलन हा पाऊस अथवा वादळी वाऱ्याने होणाऱ्या जमिनीच्या धुपेचा पुढचा प्रकार आहे..निसर्ग एका मर्यादेपर्यंत मानवी हस्तक्षेप सहन करतो त्यानंतर मात्र त्याचा प्रकोप अटळ आहे. २०१३ मध्ये केदारनाथ येथे झालेली ढगफुटी आणि त्यातील जलप्रलयामुळे ५६०० लोकांचा मृत्यू झाला होता. याचवर्षी ढगफुटीने विदर्भातील हजारो एकर जमीन खरडून गेली होती. २०१४ मध्ये अतिवृष्टीने पुणे जिल्ह्यातील माळीण हे गाव भूस्खलनात गडप झाले होते. परंतु यापासून आपण काहीच धडा घेतलेला नाही. त्यामुळेच मागील दशकभरात देशभर अतिवृष्टी, ढगफुटीचा कहर चालू असून त्यात शेतपिकांच्या नुकसानीसह जीवित- वित्तहानीदेखील वाढली आहे..Rain Crop Damage : पावणेतीन लाख हेक्टर पिकांना अतिवृष्टीचा फटका.हवामान बदलाची चर्चा देशात मागील एक- दीड दशकापासून सुरू आहे. हवामान बदलाचे सर्वाधिक चटके या देशातील शेतीक्षेत्राला बसत आहेत. अतिवृष्टी असो की दुष्काळ, नुकसान होऊन डबघाईला आलेल्या शेतकऱ्यांना जगण्यापुरती मदत मिळालीच पाहिजे. पण दरवर्षी शेतकऱ्यांनाच हात पसरण्याची वेळ यावी, हा नियोजनकर्त्यांचे अपयश आहे. नैसर्गिक आपत्तीत तुटपुंज्या आर्थिक मदतीने प्रश्न सुटणारच नाहीत. हवामान बदलाच्या संकटांना तोंड देण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा मेळ घालून युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे. जागतिक तापमानवाढीची कारणे स्पष्ट आहेत. .आपल्या देशात हवेतील कार्बनचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच तापमानही वाढते आहे. कार्बन उत्सर्जनासह सर्व प्रकारचे प्रदूषण कमी करावे लागेल. तसेच देशभरातील शेताचे बांध ते जंगलक्षेत्रापर्यंत वाढती वृक्षतोडही थांबवावी लागेल. पश्चिम घाट ते हिमालय पर्वत यांवर विकासाच्या नावाखाली होणारे अतिक्रमण त्वरित थांबवावे लागेल. हे करीत असताना देशात या बदलास पूरक अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी देखील प्रयत्न वाढवावे लागतील. तरच आपला टिकाव लागेल, अन्यथा विनाश अटळ आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.