
Agricultural Issues : राज्यात रब्बी हंगामातील पीक पेरण्या आता अंतिम टप्प्यात आहेत. काही ठिकाणी गहू पेरणी अजूनही शेतकरी करीत आहेत. इतर रब्बी पिकांच्या पेरण्या मात्र आटोपल्या असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. १५ सप्टेंबर रब्बी ज्वारीच्या पेरण्याने सुरू होणारा हा हंगाम फेब्रुवारी शेवटपर्यंत (उशिराने पेरलेल्या) गव्हाच्या काढणीपर्यंत चालतो.
या वर्षी राज्यात रब्बीचा पेरा मागील वर्षीच्या तुलनेत ७ लाख हेक्टरने वाढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात मॉन्सूनचा झालेला चांगला पाऊस, त्यामुळे जमिनीत उपलब्ध ओलावा आणि नदी-नाले, बोअरवेल-विहिरीपासून ते तलाव-धरणांत वाढलेल्या पाणीसाठ्याने यंदा रब्बी पीकपेरा वाढला आहे.
रब्बी हंगामात ज्वारी, गहू, मका ही तृणधान्ये, हरभरा, मटकी, मसूर, मूग, उडीद ही कडधान्ये आणि करडई, जवस, तीळ, सूर्यफूल, भुईमूग ही तेलबिया पिके घेतली जातात. या हंगामी पिकांसह कांदा, लसूण, टोमॅटो, कोबी अशी अनेक भाजीपाला पिके रब्बी हंगामात घेतली जातात.
खरिपाच्या तुलनेत कमी नैसर्गिक आपत्ती, स्वच्छ-निरभ्र आकाश आणि थंड हवामानामुळे रब्बी पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भावही कमी असतो. त्यामुळे रब्बी हंगामातील हवामान पिकांना पोषक असून तो शाश्वत मानला जातो. असे असताना शासन-प्रशासन पातळीवर मात्र रब्बी हंगाम तेवढाच दुर्लक्षित असल्याचे दिसून येते.
डाळी आणि खाद्यतेलात स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने रब्बी हंगाम हा अतिमहत्त्वाचा आहे. अशावेळी या हंगामातील पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हमीभावात चांगली वाढ करणे गरजेचे होते. परंतु रब्बी पिकांच्या हमीभावात प्रतिक्विंटल कमीतकमी १३० रुपये तर अधिकाधिक ३०० रुपये अशी नाममात्र वाढ करण्यात आली आहे.
रब्बी पीक पेरणीच्या काळात डिएपीसह इतरही रासायनिक खतांचा तुटवडा होता. त्यामुळे रब्बी पिके पेरणी करताना बहुतांश शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. पीककर्ज वाटप आणि पीकविमा याबाबतीतही रब्बीकडे फारच दुर्लक्ष होते. रब्बी पीककर्जाबाबत तर शेतकऱ्यांमध्ये प्रबोधनच होत नाही. त्यामुळे रब्बीसाठी पीककर्ज उपलब्ध असते, हे अनेक शेतकऱ्यांना माहीतही नाही.
पीकविम्याच्या बाबतीतही प्रबोधनाच्या अभावामुळे अनेक शेतकरी पीकविमा उतरविण्यापासून वंचित राहतात. शेतकऱ्यांची बिकट आर्थिक परिस्थिती आणि रब्बीतील वाढत्या नैसर्गिक आपत्ती पाहता पीककर्ज वाटप आणि पीकविमा या दोन्ही योजनांची व्याप्ती वाढवावी लागेल.
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप वाढले तर क्षेत्रात अजून वाढ होईल, पिकांच्या योग्य व्यवस्थापनातून उत्पादकता वाढ देखील साधली जाईल. रब्बी पिकांना पीकविम्याचा भक्कम आधार मिळाला तर वाढत्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांची जोखीम कमी होईल. बहुतांश रब्बी पिके ही सिंचनावरच घेतली जातात.
मागील काही वर्षांपासून धरणे भरत असली तरी आवर्तने सोडण्याचे वेळापत्रक शेतकऱ्यांच्या गरजेनुसार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेत पाणी मिळत नाही. शिवाय भारनियमनामुळे शेतीला आठवडाभर दिवसा तर आठवडाभर रात्री वीज मिळते. मिळणारी वीज पूर्ण दाबाने देखील मिळत नाही.
कडाक्याचा थंडी आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या भीतीने रात्री सिंचन करणे शेतकऱ्यांसाठी फारच धोकादायक ठरत आहे. शिवाय सिंचनासाठीचा वेळ, पैसा आणि श्रम देखील वाढतात. रब्बी हंगामात शेतीला पूर्ण दाबाने आणि दिवसा वीजपूरवठा झाला पाहिजेत. असे झाले तर शाश्वत रब्बी हंगाम शेतकऱ्यांना किफायतशीर ठरेल. देशाच्या संपूर्ण अन्नसुरक्षेच्या दृष्टीने देखील हे फार गरजेचे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.