Future Of Farming: जुने वर्ष सरले, नवे सुरू झाले. नवे वर्ष म्हणजे नवी पहाट, नवा सूर्य, नवे तेज, नवा दिवस, नवे संकल्प, नव्या आशा, नव्या अपेक्षा! असे असले तरी शेतकऱ्यांच्या जीवनावर नजर टाकली, तर अशी वर्षामागून कित्येक वर्षे सरली तरी त्यांच्या अभावग्रस्त जीवनात मात्र फारसा काही फरक पडलेला दिसत नाही. सरते वर्षे (२०२५) तर बळीराजासाठी फारच कष्टदायक गेले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी बरोबर सुलतानी संकटांचा कहर वर्षभर सुरू राहिला. शेतीत आधीच खर्च मिळकतीची तोंड मिळवणी होत नसताना वर्षाची सुरुवातच खतांच्या भाववाढीने झाली. त्यानंतर अत्यंत तापदायक उन्हाळा शेतकऱ्यांनी अनुभवला. .मॉन्सूनच्या चांगल्या पाऊसमानाच्या एप्रिलमधील अंदाजाने शेतकरी सुखावला पण आनंद फार काळ टिकला नाही. पूर्ण मे महिना मॉन्सूनपूर्व पावसाने गाजविला. त्यामुळे खरीप पेरण्या खोळंबल्या. पुढे ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी, महापुराने पिकांचे अतोनात नुकसान झाले. उत्पादन घटले. हाती आलेल्या शेतीमालास भावही कमी मिळाला. नुकसानग्रस्तांना मदतीचे मोठे पॅकेज जाहीर झाले, परंतु त्यातीलही पोकळपणा फार काळ लपला नाही..Agriculture Innovation: काळानुरूप नवीन वाण, तंत्रज्ञान वापर, मार्केटिंगसह नव्या संधींचा शोध गरजेचा.सरते वर्ष आंदोलने तसेच घोटाळ्यांनीही चांगलेच गाजले. माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा कृषी विभागातील कथित घोटाळा, माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली, त्यानंतर सोयाबीन खरेदी घोटाळा, बनावट निविष्ठा, निविष्ठा लिंकिंग, पीकविम्यातील गैरप्रकार आदी अनेक गैरव्यवहार कृषी विभागात घडले. शेतीमालास रास्त भाव, वीज, कर्जमाफीसाठी तसेच शक्तिपीठ महामार्ग विरोधात आंदोलने झाली. अर्थसंकल्पातही शेतीच्या हाती फारसे काही लागले नाही. कृषी समृद्धी योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला, परंतु निधीच्या अभावाने ही योजना काही मार्गी लागली नाही..शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला देखील वर्ष सरले तरी मुहूर्त लागला नाही केंद्र सरकारने मनरेगा योजनेचे नाव तसेच कार्यपद्धतीत बदल करून ती अधिक कमकुवत केली. तब्बल ३८ वर्षांनंतर कृषी विभागाने ‘शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी’ हे घोषवाक्य घेऊन बोधचिन्हातही बदल केला आहे. जागतिक पातळीवरही शेतीच्या अनुषंगाने सरते वर्ष प्रतिकूलच राहिले आहे. व्यापार युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नीतीने अडचणीत आलेल्या अमेरिकेतील शेतकऱ्यांनी पॅकेजची मागणी लावून धरली..Agriculture Development : मूल्यवर्धन साखळीतून कृषी क्षेत्राचा विकास.संकटांच्या या मालिकेत सरत्या वर्षात काही चांगल्या बाबी देखील घडल्या आहेत. बारामती येथे एआय ऊसशेतीचा पथदर्शक प्रकल्प यशस्वी झाला आहे. या प्रयोगामध्ये एआयच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक ऊस उत्पादन शक्य झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर देखील हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. अशावेळी राज्यातील इतर महत्त्वाच्या पिकांमध्ये अशा प्रकारचे प्रयोग करून उत्पादन वाढ साधता येऊ शकते. कृषी विभागाने तशी घोषणा केली असली तरी त्या दिशेने कृतियुक्त पावले उचलण्याची गरज आहे..वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान वाढत असताना याचा समावेश पीकविम्यात करण्यात आल्याने त्याचाही राज्यातील शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. पशू संवर्धनला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्याने त्या आनुषंगिक लाभ या विभागाला देखील मिळणार आहेत. शेती तसेच पूरक व्यवसायांमध्ये वाढीच्या अमर्याद संधी आहेत. परंतु त्या साध्य करण्यासाठी केंद्र-राज्य सरकारचे भरभक्कम धोरणात्मक पाठबळ हवे. राज्य कृषी विभागाने केवळ बोधचिन्ह आणि घोषवाक्य बदलून काहीही होणार नाही. त्यांनी आपली मानसिकता, दृष्टिकोन तसेच धोरणात्मक चौकट बदलली तरच शेती शाश्वत अन् शेतकरी समृद्ध होतील. ‘ॲग्रोवन’ परिवारातर्फे सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.