Veteran Actor: व्यवस्थेवर चिडलेला सर्वसामान्य युवक नानांच्या जळजळीत तारुण्याशी नकळत जोडून घेऊ लागला होता. कारण दोघांचीही नाळ एकच होती. .पाऊणशे वयमान हे काही जाण्याचे नव्हे. काही प्रतिभावंतांबाबतीत तर वय हा निव्वळ एक आकडा असतो. ही कलावंत मंडळी अमर आहेत, हे रसिकमनाने गृहितच धरलेले असते. गेल्या चार वर्षात अनेक प्रतिभावंत आपल्याला सोडून गेले. लता मंगेशकर, आशा भोसले, विजया मेहता, प्रभा अत्रे, अगदी कालपरवा शकुंतला नगरकर, कितीतरी. तथापि, नभांगणी पोचलेल्या या प्रतिभावंतांमध्ये नाना पाटेकरांचाही समावेश करावा लागणार, ही भावनाच वेदनादायी आहे. यासाठी कुणाचीच मानसिक तयारी नव्हती. .Nana Patekar Death: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.तशी ती नसतेच. आज देशाचा असा कोपरा नाही, जिथे नाना पाटेकरांची नक्कल करणारा मिमिक्रीवाला आढळत नाही. बंगाली किंवा दक्षिणी चित्रसृष्टीतही नाना पाटेकर हे नाव आदराने घेतले जाते. इतकी सर्वस्तरीय रसिकमान्यता मिळालेले कलावंत विरळा असतात. नाना पाटेकर हे महाराष्ट्राचे भूषण होते. ते फक्त कलावंत नव्हते, समाजाचे आपणही काही देणे लागतो, या भावनेने शेतकरी-श्रमिकांच्या जीवनातही समरसून गेलेला हा कलाकार होता..फिल्मी दुनियेचे वारे अंगाखांद्यावर खेळवतानाच नाना पाटेकरांनी आपला पाटेकरी बाणा कधी सोडला नाही, आणि ग्लॅमरच्या चमकील्या जगताला जास्त भावही दिला नाही. साधा लिननचा पायजमा, सुती सदरा, गळ्यात तितकाच साधा पंचा, आणि पायात अस्सल मऱ्हाटी पायताण, अशा वेशात नाना पाटेकर अतिशय सहज वावरत असत. किंबहुना, तेच त्यांचे एक स्टाइल स्टेटमेंट होते. या अभिनेत्याला साहित्य कळत होते, आणि शेकडो कविता तोंडपाठ होत्या. जे जे कला महाविद्यालयात रीतसर शिकलेल्या या चित्रकाराला अभिजाताची कायम ओढ होती, पण त्याचे वागणे मात्र रगेल, ग्रामीणच राहिले. आजूबाजूचे तारे-सितारे कोट्यानुकोटीचे इमले खरेदी करुन आलिशान गाड्यांमध्ये फिरताना दिसत होते, तेव्हा हा अवलिया कलाकार आपले ग्लॅमर बांधाच्या पल्याड ठेवून शेतकऱ्याच्या थेट वावरात शिरला होता. दुष्काळी भागात मौन हातांनी कास्तकारांना ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून मदतीचा हात देत होता. कुठल्याशा नटीने केलेल्या भलत्या सलत्या आरोपांना उत्तरे देत न बसता आपले हात काळ्या मातीत घालून हिरवी स्वप्ने साकारु बघत होता. नाना पाटेकर ही एक मूर्तिमंत कविताच होते.-तीही अस्सल मराठी!.Nana Patekar Passes Away: शेतकऱ्यांना मदत, 'जलयुक्त शिवार'साठी काम, दुष्काळी पाहणीही करणार होते, पण 'नाना' अचानक सोडून गेले.त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने कलाविश्वच नव्हे, तर अवघा देश सुन्न झाला आहे. ‘मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा’, हे बुद्धीला पटले, तरी मनाला नाही पटत. नाना पाटेकरांचे जाणे अनेकांना पोरके करुन गेले. रंगभूमीवरल्या नव्या पिढीतल्या धडपड्या मुलामुलींसाठी ते आधारस्तंभ होते. हिंदी चित्रसृष्टीत नाना पाटेकरांच्या आवाजाला परिसाचे मोल होते. नव्याजुन्या लेखक-कवींसाठी नाना पाटेकर हा हक्काचा श्रोता होता. मोठ्यात मोठ्या सुपर सिताऱ्यापासून आडगावच्या नडलेल्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वांसाठी ते ‘आपला नाना’च होते. .तडक फडक स्वभावाच्या या कलावंताने इतकी माणसे जोडली कशी, याचेच नवल वाटावे. वेळप्रसंगी कुणाच्याही कानाखाली खेचण्यास मागेपुढे न पाहणारा हा माणूस ज्या आपुलकीने मिठी मारायचा, त्यात या लोकसंग्रहाचे गुह्य दडलेले आहे. नाना पाटेकरांची एण्ट्री जशी धूमकेतूसारखी अचानक झाली, तशीच झटपट एग्जिटही या कलंदर कलावंताने घेऊन टाकली. ज्यांनी ज्यांनी शिरवाडकरांचा ‘नटसम्राट’ रंगभूमीवर साकारला ते हृदयविकाराच्या धक्क्याने गेले, असा एक भयचकित करणारा योगायोग नाना पाटेकरांनी नुकताच मध्यंतरी बोलून दाखवला होता. .नानांनीही नटसम्राट साकारला, पण तो चित्रपटात. तरीही व्हायचे ते झालेच. ‘माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझियासाठीच माझा पेटण्याचा सोहळा’ या कविवर्य सुरेश भटांच्या गजलेतल्या ओळीसारखे जीवन नाना पाटेकर जगले, आणि कुणालाही कुणकूणही लागू न देता ‘गुंतुनी गुंत्यात साऱ्या’ आपला पाय मोकळा करुन दिगंताकडे निघून गेले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.