आधुनिक भगीरथ ः विलासराव साळुंखे

आजच्या तरुण पिढीला विलासराव साळुंखेची ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासामधील पाणी, जमीन व पर्यावरण या संदर्भातील आर्थिक सिद्धांत, तत्त्वप्रणाली व त्यांनी केलेले प्रयोग यांची तोंडओळख नाही.
Vilasrao Salunke
Vilasrao SalunkeAgrowon

आजच्या तरुण पिढीला विलासराव साळुंखेची ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासामधील पाणी, जमीन व पर्यावरण या संदर्भातील आर्थिक सिद्धांत, तत्त्वप्रणाली व त्यांनी केलेले प्रयोग यांची तोंडओळख नाही. ते दोनशे वर्षे पुढे विचार करणारे द्रष्टे कर्मयोगी होते. ‘एक होता कार्व्हर’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांनी विलासरावांवर ‘भगीरथाचे वारस’ हे पुस्तक लिहिले आहे, यात बरेच काही आले. विलासराव असे म्हणत, की या शेती शास्त्रज्ञ डॉ. कार्व्हर प्रमाणेच जिद्द, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय जीवनमूल्यांचा अभिमान असणाऱ्या हजारो तरुणांची ग्रामीण भूमी आतुरतेने वाट पाहत आहे.

कुठल्याही अन्यायाविरुद्ध लढताना एक संघर्ष रेषा असते. पूर्वीच्या काळात मालकाविरुद्ध गुलाम असा संघर्ष होता. मार्क्सने कामगारविरुद्ध भांडवलशाही शोषण असा लढा दिला. आंबेडकरांनी जाती-वर्गवादाविरुद्ध संघर्ष केला. शरद जोशींनी इंडिया-भारत संकल्पना मांडली. शेतकऱ्यांच्या सजकतेविरुद्ध त्यांच्या वरकड उत्पन्नावर पोसणाऱ्या बांडगुळ असा उल्लेख झाला. आर्थिक विषमतेची दरी वाढवणारी श्रीमंती आणि गरिबीला छेदणारी एक अजून रेषा आहे, ती म्हणजे पाणी.

वर्षानुवर्षे जिरायती व कोरडवाहू शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. अशा वेळी विलासरावांनी हे तत्त्व मांडले, की भूपृष्ठावरील व भूजल या निसर्गाकडून मिळणाऱ्या पाण्यावर सर्वांचा हक्क आहे. आणि त्याचे समप्रमाणात वाटप झाले पाहिजे. त्यांनी मांडलेल्या विचारांची प्रचिती येण्यास अजून काही दशके जावे लागतील. नुसते विचार मांडून थांबले नाही तर त्याच्या अंमलबजावणीसाठी आपले मन, बुद्धी, शरीर, व्यवसाय, संपूर्ण आयुष्य हे सगळे या उद्दिष्टासाठी पणाला लावले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील हे विलासराव संदर्भात म्हणले होते, ‘‘पाण्याच्या थेंबाशी इमान असणारा हा माणूस पाण्याच्या थेंबासारखाच नितळ होता.’’ विलासराव म्हणत, ‘‘ते आज नाही, तरी नजीकच्या भविष्यात तुम्हाला स्वीकारावेच लागेल. पाणी मोजूनच घ्यावे लागेल!’’

इंजिनिअर व यशस्वी उद्योजक असलेल्या संवेदनशील विलासरावांचे १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या हृदयविदारक दर्शनामुळे समाजसुधारकामध्ये स्थित्यंतर झाले. आपल्या विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी पत्नी व लहान लहान मुलांना घेऊन पुणे सोडले व नायगाव येथे प्रयोगशाळेमध्ये, रानातच घर थाटले. त्यांनी स्थापिलेल्या ‘ग्राम गौरव प्रतिष्ठान- पाणी पंचायती’च्या माध्यमातून ठिकठिकाणी १००च्या वर प्रकल्प राबवून १४९४० हेक्टर जमिनीवर दिशादर्शी मॉडेल्स उभी राहिली आहेत. महाराष्ट्रातील पाणी प्रश्‍नांवर काम करणाऱ्या अनेक सदस्यांना विलासरावांच्या विचारांची प्रेरणा व स्फूर्ती होती यात दुमत नाही. पाणी प्रश्‍नांवर आदर्शवत कार्य करणारे अण्णा हजारे, पोपटराव पवार आदी हे ‘विलासरावांनी आम्हाला वैचारिक दिशा दिली’ अशी कबुली देतात.

वि. स. पागे यांना ‘रोजगार हमी योजने’चे जनक म्हटले जाते. कालांतराने ही योजना केंद्र सरकारने मनरेगाअंतर्गत देशभरात स्वीकारली. पागे यांनी विलासरावांचे जलसंधारण, मृदुसंधारणाचे प्रयोग व विचार समजून घेण्यासाठी नायगावला जाऊन मुक्काम केला. पूर्वी रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ते व खडी फोडण्याचे अनुत्पादक काम होत असे. त्यामध्ये पाण्याच्या योजनांवर काम करण्याचा समावेश करण्यात आला. हे विलासरावांच्या पथदर्शक विचारांच्या बहुमोल योगदानाचे एक उदाहरण! त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या रसायनामध्ये रवींद्रनाथ टागोर, वारकरी संप्रदायाचे संस्कार व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांचा समतेचा विचार आध्यात्मिक जाणिवेतूनच विकसित झाला होता. तर कोणालाही सहजासहजी पचनी न पडणारे तत्त्वज्ञान हे विद्रोही तुकारामांच्या अभंगाशी साधर्म्य दाखवणारे असे होते. ‘निश्‍चयाचे बळ! तुका म्हणे तोचि फळ।।’ या उक्तीप्रमाणे एकदा ठरवले की पूर्णत्वाला न्यायची त्यांची दृढ इच्छाशक्ती होती. श्रममूल्याची प्रतिष्ठा, साध्या राहणीमानाचे जीवनव्रत, तळागाळातील कष्टकऱ्यांबद्दल आंतरिक प्रेम ही त्यांची दुर्मीळ अशी स्वभाव वैशिष्ट्ये होती.

कुठलेही प्रस्थापित व्यवस्थेमध्ये परिवर्तन करायचे म्हटले, की संघर्ष हा अपरिहार्य असतो. पण विलासराव डगमगले नाही. योजना मूर्त स्वरूपात येण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार, मंत्रालयाच्या वाऱ्या, पाण्याची पदयात्रा दिंडी उपक्रम, उपोषण, रस्त्यांवरील आंदोलने, सत्याग्रह, शासकीय पाठपुरावा, पाणी परिषदा असे अनेक मार्ग अवलंबले. प्रसंगी न्यायालयाचे दारही ठोठावले. पाण्याचा दुष्काळ हा पाण्याच्या अभावापेक्षा त्याच्या गैरव्यवस्थापन पायी होतो, या संदर्भात त्यांनी सरकारच्या विरोधात मुंबईच्या उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

विलासरावांना परदेशातील तंत्रज्ञानाच्या शोधात जपान, अमेरिका, युरोपीय देश, इंग्लंड, कॅनडा अशा अनेक देशांमध्ये भ्रमण करण्याचा योग आला. तिथे चाललेले अतिरेकी आधुनिकीकरण व चंगळखोर भोगवादी संस्कृती त्यांच्या आध्यात्मिक मनाला अस्वस्थ करीत असे. पाणी या विषयासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांचे निष्कर्ष त्यांच्या स्वानुभवावर आधारित व प्रयोगाने सिद्ध झालेले असायचे. त्यांच्या वक्तव्यातील प्रांजळपणा व आंतरिक तळमळ समोरच्यांना भावून टाकायची. ‘महाराष्ट्राच्या जलसंपत्तीचे नियोजन-पाण्याचे न्यायवाटप, धोरण, दिशा, कार्यवाही’ या त्यांच्या पुस्तकात दिलेली माहिती, आकडेवारी, सांख्यिकी तक्ते पाहून लक्षात येते की त्यांची मांडणी किती शास्त्रशुद्ध व सुसूत्रबद्ध होती.

इस्राईलला भेट देऊन आल्यानंतर विलासराव म्हणाले, की फक्त ठिबक सिंचनाची व उपदेशाची जलनीती न सांगता तिथल्या समान वाटप शिस्तीचे नियोजन, पाण्याचे कायदे, स्वतंत्र पाणी आयोग याचे अनुकरण करावे लागेल.

कार्पोरेट क्षेत्राची पार्श्‍वभूमी असल्यामुळे विलासरावांना कार्यकर्ते, शेतकरी यांच्या प्रशिक्षणाचे महत्त्व माहिती होते. ‘पाणी पंचायती’च्या माध्यमातून आजपर्यंत हजारो कार्यकर्ते प्रशिक्षण घेऊन तयार झालेत. यामध्ये लोक संघटन, जमीन व पाण्याचे गावपातळीवरील नियोजन, सामूहिक पाणीवाटप, सेंद्रिय शेती, पर्यावरण वगैरे विषयांचा अंतर्भाव होता. त्या ठिकाणी शिबिरार्थीच्या निवासाची, जेवणाची ही व्यवस्था केली गेली. विलासरावांनी ‘पाणी पंचायत’ हे चळवळीचे मुखपत्र द्विमासिक सुरू केले. त्यात जलप्रकल्प, चळवळीतील अनुभव, ग्रामीण विकास, दुष्काळ उपाययोजना वगैरे विषय असायचे.

विलासरावांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला व त्यांच्या कार्याला गवसणी घालून शब्दबद्ध करणे अत्यंत अवघड काम आहे. कोणीही प्रतिभावंत लेखक त्यांना पूर्ण न्याय देऊ शकणार नाही. दुष्काळाच्या झळा आपण वारंवार सहन करीत आहोत. त्याचा सामना करण्यासाठी विलासरावांचे विचार, तसेच निसर्गाचे संवर्धन करणारी अनुकूल सर्वसमावेशक पर्यायी विकास नीती नजीकच्या काळात अवलंबावीच लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com