डॉ. प्रा. केशव देशमुखChallenges Facing Marathi Language: सोमवारी १५ जूनला भाषा सल्लागार समितीची बैठक पुणे येथे आयोजित केली असून, त्या अनुषंगाने शिक्षणातील मराठी आणि मराठीतील शिक्षणाचा घेतलेला हा आढावा....मराठीच्या असंख्य शाळा संकटात, मराठी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा भला मोठा आकडा आणि मराठी शाळा ते विद्यापीठांच्या शिक्षणात मराठीकडे येणाऱ्या मुलांचा एकंदर ओढा कमी हे सत्यच असून, ते आपण अधिक नीटपणे समजून घेतलेच पाहिजे. खरे म्हणजे घेतल्या जाणाऱ्या शिक्षणातून आनंदच आटत चालला आहे. शिवाय, हमी नावाची गोष्टही शिक्षणातून लापता होत चालली आहे. नेमका वास्तव निगडित हा विचारमात्र आपण करीत नाही. .Marathi Language Mandatory: निकालपत्र आता मराठीत बंधनकारक.त्यामुळे दुखणे खरे आहे ते हे! मुळात, मराठी, मराठी, मराठी असा उच्चरवाने घोष करून मराठीत तसूभरही भर पडणार नाही. त्यापेक्षा मराठी हा विषय मुले का घेत नाहीत? घेतलाच तर मराठीत एवढ्या संख्येत मुले अनुत्तीर्ण का होतात? मराठीच्या अध्यापनाची प्रत नेमकी कशी आहे? आणि नेमलेले अभ्यासक्रम अथवा शिकवली जाणारी पाठ्यपुस्तके मुलांना आशेचा किरण दाखवतात का? यावर जास्त भर देत त्यासंबंधी चिंतन होण्याची निकड अधिक आहे..मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळून त्याचे पुढे काय झाले, हे कोडे एकूण मराठी आम लोकांना आणि मराठीची काळजी वाहणाऱ्या हितचिंतकांनाही पुरते समजलेले आहे, याची अगदी खात्री नाही. मराठी विषय निवडून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या जबरदस्त रोडावली आहे, ही खरे तर आजची चिंता नव्हे. गेल्या अनेक वर्षांपासून मुले मराठीकडे येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जे तरुणाई सोसणारे लोक मराठीत (उच्चविद्याविभूषित?) आहेत म्हणजे अर्थातच एमए, बीएड, पीएचडी, नेट, सेट आहेत, यांच्यापुढे त्यांना आनंद मिळेल अशी उत्तरे नाहीत आणि ही उत्तरे देण्यात आपणही पुरते हतबल झालेलो आहोत. तरुणांपुढे आहेत त्या फक्त असंख्य प्रश्नांच्या तेवढ्या चळती!.आता यात मुलांची चूक मुळीच नाही. चूक आहे ती त्यांना आशेवर आणि धुरकट स्वप्नांवर जगविणाऱ्या आमच्यातीलच ज्ञानदानकर्त्यांची! मग अशावेळी मुलांनी मराठी विषयातून काढता पाय घेतला, तर त्यासाठी या लेकरांना जबाबदार धरणे, ही चूक पुन्हा आपणच करीत आहोत, हे कबूल केले पाहिजे. खरे तर उणिवांवर बोट ठेवताना उरलेली इतर बोटं आपल्याही बाजूने वळलेली असतात, हे मात्र लक्षातच घेतले जात नाही. म्हणजे पाणी नेमके इथे मुरलेले असते. या मुरलेल्या पाण्याचाही कधी ना कधी हिशेब द्यावा लागेल. त्यासाठी मराठीकडे येणारा विद्यार्थी-ओढा का मंदावला जातोय आणि मराठीची ही एवढी अशी ओढाताण का वाढली आहे, याचे उत्तर शोधायला फार उशीर लागणारच नाही..Marathi Language: लोकभाषेतील शब्दशिदोरी ....हे करून पाहत येईलसरासरी स्नातक अर्थात बीए स्तरीय शिक्षण विद्यापीठात दिले जात नाही, ते काॅलेजस्तरावर मिळते. म्हणजे एकूण विद्यापीठातूनच मराठी विषय शिक्षणाची सोय करायला हरकत नसावी.यामुळे विद्यार्थी प्रवेशाची एकप्रकारे हमी बॅंक विद्यापीठातच तयार होईल. मराठी एकछत्री शिक्षणाची ही वाट मराठी विषयाच्या ओढाताणीचा काहीएक ताण कमी करायला हातभार लावेल.जिथे पूरक सुविधा नसतील अशा न साधन, न सुविधेच्या काॅलेजमधील एमए मराठी शिक्षण थांबवले पाहिजे..मराठी विषयाचे अभ्यासक्रम हे काहीसे वशिलाप्रधान असतात, हे अमान्य करता येणार नाही. शिवाय ते उत्तमही असतात, पण यापेक्षाही ते रोजगार देणारे, आनंद देणारे, मराठी विषय निवडावा अशी इच्छा शाबूत ठेवणारे असलेच पाहिजे. मराठीत उत्तम शिक्षण घेऊन मुलांना कुठली ना कुठली जगण्याची वाट ही सापडली पाहिजे आणि अशा मराठी शिक्षणाचा आग्रह थेट समाजातूनसुद्धा उचल खायला हवा. यातूनही मराठीचा ताप कमी व्हायला मदत होईल, मराठीचे शैक्षणिक असंतोषाचे तापमान निवळायला मदत होऊ शकेल..मागील अनेक वर्षांपासून शिक्षण संस्थेतील अध्यापनाचा गाडा हा घड्याळी तासांवर काम करणारी उच्चविद्याविभूषित तरुणाई ओढते आहे. कारण जी शिकवणारी होती ती माणसे निवृत्त होऊन बाहेर पडली आहेत. तेव्हा या सीएचबी (क्लॉक आवर बेसिस) म्हणविल्या गेलेल्या ज्ञाननिष्ठ पण अस्वस्थ तरुणाईस स्वस्थ करून त्यांना उत्तम वेतनावर नेमले जायला हवे. नोकरी आणि भाकरी ही कधीही महत्त्वाचीच असते. हा विचार करून पूर्णवेळ आणि पूर्णकाळ अध्यापक संस्कृती स्थापित करणे हा मराठी विषयाच्या निरामयतेचाच विषय असतो..आपल्या एकंदर शिक्षणसंस्थेत वसतिगृहे आहेतच, पण आणखी वाढवत नेऊन ती दर्जेदार आणि सुविधासंपन्न हवीत. मराठीची अनेक मुले या वाचनात भान व ज्ञान हरवून बसतात. शेती आणि श्रम यातून येणारी मुले अन्न आणि निवास याशिवाय महानगरांत राहू शकणारी नसतात. सर्व मुलांना ही सुविधा अधिक सुलभ आणि उत्तम स्वरूपात लाभावी. त्यातही मराठी विषयाच्या लेकरांना हा लाभाचा टक्का थोडासा अधिक असावा..आता हे पुढ्यात वाढून ठेवलेले टोकदार वर्तमान पाहू जाता, सर्वांना शिक्षकच किंवा सर्वांना मराठी विषय घेऊन प्राध्यापकच होणे नक्कीच शक्य नाही. त्यापेक्षा मराठीत अगदी पारंगत होऊन म्हणजे ही मराठी आंतरज्ञानक्षेत्री करावी. त्यासाठी ती रोजगाराभिमुख करावी. म्हणजेच, मराठीची ही तरुणाई कुशल, कलाप्रेमी, माध्यमात संधी मिळवून उभी राहणारी, व्याकरण, मुद्रण, संपादन, लेखनकुशल, यात संधी हशील करणारी तयार करण्याची अधिक आवश्यकता आहे. यासाठी मराठीचे अभ्यासक्रम पायाभूत विषयाचा वावर सलामत ठेवूनही आमूलाग्र बदलावे लागतील. .सध्याची वाढती ओढाताण लक्षात घेता अनेक विद्यापीठांतील मराठीचे अभ्यासक्रम हळूहळू उपयोजित व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच आशा आहे, की कधीतरी चित्र बदलेल आणि मराठीचे सारेच्या सारे विद्यार्थ्यांचे वर्ग पुन्हा खचाखच पूर्वीसारखे भरतील. परंतु यासाठी नुसती अवाढव्य स्वप्नं रंगवून चालणार नाही तर शिक्षणाचा सर्वोत्तम दर्जा, अध्यापनाची खात्रीशीर गुणवत्ता आणि या सम-काळाचा, कठोर वास्तवाचा, संभ्रमित अगणित संख्येतील या तरुणाईचा, त्याच्या पालकांचा विचार पुढ्यात ठेवून शिक्षणातील मराठी आणि मराठीतील शिक्षण हे निखालस उत्तम राखले जायला हवे. तरच मराठी विद्यार्थी प्रवेशाची वाढती ही ओढाताण कमी होऊन या विषयाचा दिवसेंदिवस घटत चाललेला ओढा वाचावयास मदत होऊ शकेल.९४२२७२१६३१(लेखक मराठी बोलीभाषांचे अभ्यासक असून, महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे तज्ज्ञ सदस्य आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.