Fertilizers Use : पर्यायी खतांचा करा परिणामकारक वापर

DAP Fertilizer : रब्बी हंगामात डीएपीसह इतरही खतांचा कमी पुरवठा झाल्यास शेतकऱ्यांनी पॅनिक न होता तज्ज्ञांच्या सल्ल्याने पर्यायी खतांचा वापर करायला हवा.
Fertilizers
FertilizersAgrowon
Published on
Updated on

Uses of Alternative Fertilizers : राज्यात परतीचा पाऊस चांगला बरसतोय. हा पाऊस खरिपातील सोयाबीन, कापसासह इतरही पिकांना नुकसानकारक ठरत असला, तरी रब्बी हंगामासाठी चांगलाच मानला जातो. या पावसाने उपलब्ध झालेल्या ओलाव्यावर कोरडवाहू पद्धतीने काही रब्बी पिके चांगली येतील. शिवाय या वर्षी धरणे बऱ्यापैकी भरली आहेत. भूगर्भातील पाणीपातळीही वाढल्याने बागायती रब्बी पिकांचा पेरादेखील वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारकडे रब्बी हंगामासाठी तीन लाख टन डीएपीची मागणी केली असता केवळ अडीच लाख टन डीएपीला मंजुरी देण्यात आली आहे.

त्यामुळे खरिपाबरोबर रब्बी हंगामातही डीएपीचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातही मागणीच्या ६२ टक्केच डीएपीचा पुरवठा करण्यात आला होता. डीएपीसह युरिया, पोटॅश या खतांचाही मागणीच्या तुलनेत थोडा कमीच पुरवठा होण्याची चिन्हे दिसताहेत. खतांचा कमी पुरवठा म्हणजे त्यात भेसळीचे, बनावटपणाचे प्रकार वाढतात. कंपन्या, विक्रेते यांच्याकडून लिंकिंगचे प्रकारही घडतात. खतांमधील भेसळ, बनावटपणा आणि लिंकिंगमुळे शेतकऱ्यांवर नाहक आर्थिक भुर्दंड बसतो. शिवाय माती, पिकांवरही बनावट, भेसळीच्या खतांचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे राज्यात आगामी रब्बी हंगामात बनावट-भेसळखोरी तसेच लिंकिंगचे प्रकार घडणार नाहीत, ही काळजी घ्यायला हवी. शेतकऱ्यांनी सुद्धा रब्बी हंगामात डीएपीसह इतरही खतांचा कमी पुरवठा झाल्यास पॅनिक न होता तज्ज्ञांच्या सल्ल्याने पर्यायी खतांचा वापर करायला हवा.

Fertilizers
DAP Fertilizers Shortage : रब्बी हंगामात डीएपीचा तुटवडा भासण्याची चिन्हे

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी डीएपी, १२ः३२ः१६, १४ः३५ः१४, सिंगल सुपर फॉस्फेट या खतांचा वापर केलेला असतो. ही खते पिकांना १५ ते २५ टक्क्यांपर्यंत त्या हंगामात उपलब्ध झालेली असतात. उर्वरित खते अवशेष स्वरूपात जमिनीतच राहतात. ही अवशेष स्वरूपातील जमिनीतील खते पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी रब्बी हंगामात जैविक खतांचा (पीएसबी- फॉस्फेट सोलुबलायझिंग बॅक्टेरिया) पावडर अथवा द्रव स्वरुपात वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजेत.

पीएसबीचा वापर केला तर जमिनीतील २५ टक्के फॉस्फरस पिकांना उपलब्ध होण्यासाठी याची मदत होते. पीएसबी हे जैविक खत राज्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असून ते स्वस्तही आहे. रब्बी हंगामात कोरडवाहू तसेच बागायती पद्धतीने पिके घेतली जातात. अशा पिकांसाठी डीएपीऐवजी सिंगल सुपर फॉस्फेटचा (एसएसपी) वापरही परिणामकारक ठरू शकतो. डीएपीमधून केवळ दोनच अन्नद्रव्ये (फॉस्फरस आणि नायट्रोजन) मिळतात. परंतु कॅल्शिअम, सल्फर, फॉस्फरस असे तीन प्रकारचे अन्नद्रव्य एसएसपीमधून मिळू शकतात.

Fertilizers
Chemical Fertilizer : रासायनिक खतांची लिकिंगसह खरेदी बंद

आता तर नवीन पद्धतीत झिंकेटेट, बोरुलेटेट सिंगल सुपर फॉस्फेट उपलब्ध आहे. याचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची खतांची गरज भागविली जाऊ शकते. कोरडवाहू पद्धतीने घेतल्या जात असलेल्या रब्बी पिकांना पाण्यात विद्राव्य खतांचा वापर देखील करता येऊ शकतो. पाण्याची उपलब्धता नसताना जमिनीतून खते दिल्यास ती पिकांना उपलब्ध होत नाहीत.

त्याऐवजी मोनो अमोनियम फॉस्फेट, ०ः५२ः३४, १२ः६१ः०, १९ः१९ः१९ या विद्राव्य खतांचा वापर पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत फवारणीच्या स्वरुपात केल्यास ही खतेही पिकांना अधिक उपयुक्त ठरू शकतात. नॅनो डीएपीचा देखील एक चांगला पर्याय आता शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. नॅनो डीएपी फवारणीच्या स्वरूपात वापरता येते. जमिनीत पिकांच्या मुळांची चांगली वाढ होऊन पिकांना भरगच्च फुले येण्यास नॅनो डीएपीचा वापर शेतकरी करू शकतात. एका डीएपीच्या बॅगला एक नॅनो डीएपीची बॉटल शेतकरी वापरू शकतात. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात डीएपीचा कमी पुरवठा असला तरी पर्यायी खतांचा परिणामकारक वापर करून शेतकरी आपली गरज भागवू शकतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com