Rain Deficit Crisis: जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे राज्यातील खरीप हंगामाबाबत निर्माण झालेली चिंता काही काळ दूर झाली होती. ‘एल निनो’च्या इशाऱ्यामुळे जूनमध्ये रखडलेल्या पेरण्यांनी जुलैमध्ये वेग घेतला आणि राज्यात तब्बल ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. धरणांतील पाणीसाठाही वाढला आणि खरिपाबाबत आशावाद निर्माण झाला. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने अचानक दिलेल्या प्रदीर्घ खंडाने हे चित्र पालटले आहे. ऐन फुलोरा, शेंगा आणि बोंड धरण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. त्यातच सप्टेंबरमध्ये काही भागात सुरुवातीच्या टप्प्यात पावसाचा अंदाज असला तरी राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने महाराष्ट्र आता प्रत्यक्षात दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. .पावसाच्या कमतरतेची स्थिती केवळ एखाद-दोन जिल्ह्यांपुरती मर्यादित नाही. राज्यातील ३६ पैकी तब्बल ३१ जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याचा परिणाम जाणवत आहे. अनेक भागांत ऑगस्टमध्ये ४० ते ८९ टक्क्यांपर्यंत पावसाची तूट राहिली. पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पूर्व अहिल्यानगर तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक तालुके गंभीर संकटात आहेत. संपूर्ण राज्याचा विचार करता ऑगस्टमध्ये सरासरीच्या तुलनेत ४६ टक्के कमी पाऊस झाला..जून ते ऑगस्ट या कालावधीत पावसाची तूट १२ टक्के राहिली. सोयाबीन, कापूस आणि तूर ही प्रमुख पिके माना टाकू लागली आहेत. सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात बाजरी, मका आणि कडधान्यांची वाढ खुंटली आहे. खानदेशात गेल्या २५ दिवसांपासून पाऊस नसल्याने पिके धोक्यात आली आहेत..कोकणातही पावसातील खंडामुळे भाताची वाढ खुंटली आहे. या संकटाचे गांभीर्य असे, की आता केवळ पाऊस पडण्याची वाट पाहून उपयोग नाही. पिकांच्या वाढीचा निर्णायक कालावधी निघून चालला आहे. काही भागांत पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही, तर सोयाबीनची फुले आणि शेंगा गळण्याची शक्यता आहे. अनेक पिकांवर आधीच आर्द्रताजन्य ताण, रोग आणि किडींचा दुहेरी आघात झाला असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे काही भागांत आता पाऊस पडला, तरी झालेले नुकसान पूर्णपणे भरून निघेलच, अशी स्थिती राहिलेली नाही..देशाची परिस्थितीही दिलासादायक नाही. जून ते ऑगस्ट या काळात देशात सरासरीच्या केवळ ८६ टक्के पाऊस झाला. खरीप पेरणी गेल्या वर्षापेक्षा १८.९१ लाख हेक्टरने कमी आहे. भात, मका, सोयाबीन, कापूस आणि ऊस यांच्या क्षेत्रात घट झाली आहे. सप्टेंबरमध्येही देशात ९१ टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे आता खरिपाचे संकट पेरणी क्षेत्राचे नसून उत्पादकतेचे बनले आहे. केंद्राने १७.६२ कोटी टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी पावसातील तूट हे लक्ष्य धोक्यात आणू शकते..महाराष्ट्रासाठी मात्र प्रश्न अधिक तातडीचा आहे. जुलैच्या पावसामुळे निर्माण झालेल्या आशावादात सरकार आणि प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य कमी लेखू नये. निम्म्या राज्यावर दुष्काळाची छाया आताच गडद झाली आहे. सप्टेंबर महिन्यातही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता नाही. राज्य सरकारने संकटग्रस्त भागांत तातडीने पीकस्थितीचे सर्वेक्षण आणि पंचनामे सुरू करणे आवश्यक आहे..पाऊस पडेल आणि संकट टळेल, या आशेवर शेतकऱ्यांना ठेवणे आता योग्य ठरणार नाही. दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांची वाट पाहण्यापेक्षा उपाययोजना सुरू करण्याची वेळ आली आहे. राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत, तर यंदाच्या पावसातील खंडाचे रूपांतर शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला अडचणीत आणणाऱ्या मोठ्या संकटात होऊ शकते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.