Krushidhan Collective Farming Model: शेतीमध्ये मजुरांची टंचाई ही अलीकडे फारच गंभीर समस्या बनली असली, तरी अगदी पूर्वीपासून याचा सामना शेतकरी करीत आहेत. पूर्वी शेतीचे यांत्रिकीकरण झाले नव्हते. शेतकऱ्यांची जमीन धारणा अधिक होती. त्या वेळी पीक पेरणी, लागवड तसेच काढणी, मळणीच्या कामांसाठी एकाच वेळी अधिक मजूर लागत होते. .त्या वेळी भावकी, शेतशेजारी एवढेच नव्हे तर गावातील शेतकरी कुटुंबे एकत्र येऊन त्यांच्या घरच्या मनुष्यबळावर एका पाठोपाठ एक अशी सर्व शेतकऱ्यांची कामे उरकून घेत. याला ‘इर्जिक’ असे नाव होते. काही गावांत इर्जिक दरम्यान सर्व शेतकऱ्यांचा स्वयंपाक आणि जेवणही एकत्र असायचे..यातून सामाजिक सलोखादेखील वाढत असे. परंतु काळाच्या ओघात ही प्रथा बंद पडत गेली. आता शेतीचे लहान लहान तुकडे झाले आहेत. शेतीचे यांत्रिकीकरणही मोठ्या प्रमाणात झाले. पेरणी, लागवड, काढणी, मळणी यंत्रे - अवजारे आली. परंतु आंतरमशागतीच्या कामांसाठी अजूनही पुरेशी यंत्रे - अवजारे उपलब्ध नाहीत. मजूरटंचाई प्रचंड वाढली आहे. शेतीत काम करायला कोणी तयार होत नाही. त्यामुळे गट, समूह शेतीची संकल्पना पुढे आली..Future Farming: गुरुमंत्रांचा गजर !.जालना जिल्ह्यातील अंधवाडी येथील कृषिधन बळिराजा शेतकरी गटाने सामूहिक शेतीचा आदर्श घालून दिला आहे. गटातील १३ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी १३ बैलजोड्यांच्या साहाय्याने ५० एकरावरील कपाशीची डवरणी एका दिवसात पूर्ण केली आहे. त्याचे त्यांना अपेक्षित चांगले परिणामदेखील मिळणार आहेत..गट, समूह शेतीमुळे शेतीतील कामे वेळेत पूर्ण होतात. उत्पादन खर्चात बचत होते. निविष्ठांची खरेदी तसेच शेतीमालाची एकत्रित विक्री करता येते. याद्वारे सौदाशक्तीच्या वापरातून कमी दरात निविष्ठा मिळविता येतात शिवाय शेतीमालास चांगला दर मिळतो. पर्यायाने अधिक नफा पदरी पडण्यास हातभार लागतो..गट, समूह शेतीद्वारे तंत्रज्ञानाचा अवलंबदेखील केला जाऊ शकतो. नैसर्गिक संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर होतो. त्याहीपुढे जाऊन भावकी, शेजारी, गावातील शेतकऱ्यांमधील मतभेद कमी होऊन शेती बाहेरील इतरही कामांमध्ये परस्पर सहकार्य वाढीस लागते. गट, समूह शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या अनेक योजना असून, त्याचाही लाभ शेतकरी एकत्र येऊन घेऊ शकतात..Collective Farming: कडूसच्या कृषी गटाकडून ‘सामूहिक शेती’.कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता गटशेतीमध्ये आहे. सद्यःस्थितीत शेतीतील अनेक समस्यांवर मात करून यशस्वीपणे पुढे जाण्याची क्षमता गट, समूह शेतीत आहे. गटशेतीचा मूळ उद्देश ज्यांना खरोखरच समजला असून, अपेक्षित ध्येय गाठण्याचे ज्यांनी चिकाटीने प्रयत्न केले असे काही गट, समूह राज्यात यशस्वी झाले. बाकी केवळ शासकीय अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे गट तयार झाले आहेत..केंद्र - राज्य सरकार पातळीवर सुद्धा गट अथवा समूह शेतीशिवाय आपल्याला भवितव्य नाही, असे म्हटले जात आहे. राज्यात २०१३ मध्ये गटशेतीचे धोरण आले. परंतु या धोरणांतर्गत गटशेतीला ना निधी, ना कालबद्ध कृती कार्यक्रम मिळाला. त्यामुळे राज्यभर शेतकऱ्यांचे बहुतांश गट कागदोपत्रीच उभे राहिले..२०१७ मध्ये पुन्हा गटशेतीचे नवे धोरण आणून गावागावांत किमान १०० एकराचा एक गट तयार करून त्याला एक कोटी रुपये अनुदान देण्याचा धाडसी निर्णय घेतला गेला. परंतु याचेही अपेक्षित लाभ कार्यक्षम गटांना मिळाले नाहीत. शेतकरी उत्पादक कंपन्यांचे देखील तसेच आहे..हाताच्या बोटावर मोजता येतील येवढ्या शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यक्षम असून, बाकी कागदावरच शोभून दिसताहेत. सामूहिक श्रमशक्तीची ‘कृषिधन’प्रमाणे अनेक चांगली उदाहरणे आहेत. त्याचा आदर्श गटांगळ्या खात असलेल्या गट, समूहांनी तसेच उत्पादक कंपन्यांनी घेतल्यास शेतीचे चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.