Jamun Tree Predict Drought: भारताचे एक पौराणिक नाव जंबुद्वीपदेखील आहे. जंबुद्वीप म्हणजे जांभूळ वृक्षांचा प्रदेश. या रसाळ फळावरून आपल्या वास्तव्यस्थानाचे नामकरण करणाऱ्या अज्ञात प्रतिभावंत पूर्वजांच्या कल्पकतेला दाद द्यायलाच हवी. तशी वचनेही ठायीठायी उद्धृत केली जातात. परंतु एखादे चिंतनमग्न ऋषी झाडाला भरघोस लगडलेली जांभळे पाहून चिंतेतही पडले होते काय, हे सांगणारा संदर्भ पारंपरिक वाङ्मयात उपलब्ध नाही. ही पुराणातली वांगी खंगाळण्याचे कारण हेच, की जांभळांची तथाकथित मुबलक उपलब्धता आणि त्या अनुषंगाने संभाव्य दुष्काळाचा वर्तविलेला अंदाज, अशा आशयाचा मजकूर नुकताच समाजमाध्यमांवर फॉरवर्डरूपी खतपाण्यातून चांगलाच तरारला..जांभूळ वृक्ष जणू काही वनस्पतीविश्वातील इच्छामरणी भीष्म पितामह आहे, असे या साथीच्या संदेशलाटेतून सूचित होते. शिखंडीची ढाल करून अर्जुनाने सोडलेल्या बाणांनी शरपंजरी पडलेल्या भीष्माने उत्तरायणाची वाट पाहून जसा प्राणत्याग केला, तीच प्रक्रिया जांभूळ वृक्षाकडून दुष्काळाच्या आगमनापूर्वी राबविली जाते, असा या संदेशाचा सूर आहे. देह पंचमहाभूतांत विलीन करण्यापूर्वी महामूर फळे देण्याचा तथाकथित दानशूरपणा करणारे एकमेव परोपकारी झाड म्हणजे जांभूळ, असाही या संदेशाचा सांगावा आहे. त्याचे पारायण केल्यानंतर खरोखरच ‘पवित्र तो देश, पवित्र ती माती, जेथे ऐसे जंबुवृक्ष जन्म घेती’ अशी भावना व्हावी..Drought Farming Tips: एल निनोच्या काळात कोरडवाहू शेतीच्या नियोजनासाठी महत्त्वाच्या टिप्स.संबंधित मजकूर जांभूळवृक्षाच्या कौतुकापर्यंतच निरुपद्रवी राहिला असता तर त्याला अग्रलेखाचा विषय बनविण्याचे कारण नव्हते. परंतु यंदा जांभळे जास्त आली म्हणजे दुष्काळ निश्चित, असा त्याने काढलेला निष्कर्ष छद्मविज्ञानाच्या श्रेणीत जाऊन बसतो आणि जनांची दिशाभूल करतो, म्हणून त्याचे खंडन करणे भाग आहे..येथे लोकज्ञानाचा अवमान करण्याचे अजिबात कारण नाही. कारण शतकानुशतके शेतकरी आकाश, वारा, पक्षी, कीटक, झाडे यांचे निरीक्षण करतच आले आहेत. अनेकदा त्या निरीक्षणांत अनुभवजन्य सत्यही दडलेले असते. पण लोकज्ञान आणि विज्ञान यांचा संबंध महाभारतातील कृष्ण आणि अर्जुनासारखा असावा; शकुनी आणि दुर्योधनासारखा नव्हे. सत्याच्या शोधात निघालेल्या मुशाफिरांसाठी निरीक्षण हा प्रारंभबिंदू असतो; निष्कर्ष नव्हे. चिंतन-मंथन-खंडन-मंडन या प्रक्रियेतून बाहेर पडणारे गीतासार चिरस्थायी दिशादर्शक बनून राहते..Climate Change : आशिया देशांना २०२५ मध्ये हवामान संकटाचा मोठा फटका; उष्णतेच्या लाटा, पूर आणि दुष्काळामुळे वाढले नुकसान.लोकज्ञान आणि विज्ञान यांच्यात संवादाचा पूल कायम असावा. कारण अनेक पिढ्यांच्या अनुभवातून लोकज्ञान आकार घेते, तर निरीक्षण, प्रयोग, विदा (डेटा) आणि पुराव्यांवर आधारित सत्यशोधनाच्या मार्गावर विज्ञान चालते. तद्वत जांभळाच्या बाबतीतही विज्ञानाने काही तथ्ये शोधली आहेत. काही वर्षे झाडांना अधिक फळधारणा होते, तर काही वर्षे कमी. यालाच ‘मास्टिंग’ असे म्हणतात. हवामान, तापमान, पर्जन्यमान, परागीभवन, झाडाचे वय, संसाधनांची उपलब्धता अशा अनेक घटकांचा त्यावर परिणाम होतो. पण ‘यंदा जांभळे भरपूर आली म्हणजे पुढे दुष्काळ येणार’ हा निष्कर्ष विज्ञान धुडकावून लावते..या प्रकरणातील शोकांतिका अशी, की दुष्काळाच्या खऱ्याखुऱ्या कारणांवर आपण बोलतच नाही. पाणलोट विकासाकडे दुर्लक्ष, चुकीची पीकनिवड, हवामान बदल, जल व्यवस्थापनातील त्रुटी यांवर चर्चा करणे म्हणजे अवघड जागचे दुखणे ठरते. कारण अशा चर्चा झाल्याच तर आपापले उत्तरदायित्वदेखील निश्चित करावे लागते. पण मग मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? त्याऐवजी जांभळावर नेम धरणे सर्वांसाठीच सोपे ठरते..जमिनीवर पडलेल्या जांभळाच्या सड्याला दुष्काळाचा दूत ठरविण्याऐवजी त्याच डोळ्यांवर विज्ञानाचा चष्मा चढविला, की भविष्यवेध घेता येईल. निसर्ग निरीक्षणाची ऊर्मी जपावी, पण तिची पडताळणी वैज्ञानिक कसोटीवर व्हावी. अन्यथा प्रत्येक अफवा ज्ञानाचे रूप धारण करेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.