Indian Ocean Dipole: अमेरिका-इस्त्राईल आणि इराण दरम्यानच्या युद्ध समाप्तीच्या घोषणेनंतर भारतीय शेतीला अल्प दिलासा मिळाला असला तरी एल निनो चे संकट मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक गडद होत आहे. जून महिन्याचे दोन आठवडे उलटून गेले तरी राज्यात अजूनही मॉन्सून पावसास सुरुवात झाली नाही. त्यातच सूर्य आग ओकत असल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने (आयएमडी) दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाजात स्पष्ट सांगितले आहे की एल निनो सक्रिय झाल्याने आणि त्याच वेळी ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) स्थिर असल्यामुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी (९० टक्क्यांपर्यंत) पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जगातील बहुतेक संस्थांनी एल निनोचा अंदाज वर्तविला आहे. .असे असताना काही तथाकथित हवामानतज्ज्ञ मात्र यावर्षी देखील चांगला पाऊस पडणार, असे सांगून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत आहेत. विशेष म्हणजे असे तथाकथित हवामान तज्ज्ञ नेमक्या कोणत्या मॉडेलनुसार अंदाज देतात, हे सांगत नाहीत. त्यांच्या अंदाजांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. अर्थात त्यांचा अंदाज देण्याचा हेतू पूर्वीपासूनच कोणत्या तरी एखाद्या व्यावसायिक घटकाला लाभ मिळावा असा राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा तथाकथित खासगी हवामान तज्ज्ञांवर आणि त्यांच्या अंदाजावर देखील विश्वास ठेऊ नये..El Nino: एल निनो सक्रिय; ‘आयएमडी’चा दुजोरा.एल निनोच्या काळात सामान्यतः भारतीय मॉन्सून कमकुवत असण्याची शक्यता अधिक मानली जाते. मात्र, त्याच वेळी आयओडी सकारात्मक (पॉझिटिव्ह) असेल, तर तो एल निनोचा परिणाम काही अंशी कमी करू शकतो. परिणामी मॉन्सूनच्या काळात चांगला पाऊस होऊ शकतो. यंदाच्या मॉन्सून हंगामाच्या उत्तरार्धात आयओडी सकारात्मक होण्याची शक्यता होती. मात्र आता हवामान विभागाने संपूर्ण मॉन्सून हंगामात ‘आयओडी’ तटस्थ राहणार असल्याचा सुधारीत अंदाज जारी केला आहे..त्यामुळे पावसाळी चारही महिन्यांत यावर्षी कमी पाऊस असणार, असेच हवामान विभागाचे म्हणणे आहे. अशा वेळी काही हवामान तज्ज्ञ अथवा संस्था यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचे सांगत असतील तर ती शेतकऱ्यांची दिशाभूल ठरू शकते, असे म्हणता येईल. यातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एल निनो बाबत अंदाजात जशी स्पष्टता देता येते, तसे आयओडीबाबत देता येत नाही. कारण आयओडी अंदाजाच्या मॉडेलमध्ये अचूकता कमी असून विविधता जास्त आहे. आयओडीबाबतचा अंदाज बहुतांश करून अनिश्चित मानला जातो. त्यामुळे देखील जुलैनंतर चांगला पाऊस पडेल, हे सध्या खात्रीने सांगता येत नाही..Monsoon Update: मॉन्सूनची वाटचाल ९ व्या दिवशीही ठप्प; राज्यात उष्णतेचा चटका, पावसाचाही अंदाज.ही सर्व परिस्थिती पाहता एल निनो असेल किंवा आयओडी यांच्या पुढील वागणुकीवर तसेच त्यानंतरच्या परिणामांवर बारीक लक्ष ठेवून राहावे लागेल. हवामानात काही बदल असेल तर त्यानुसार वेळोवेळी अचूक अंदाज देत शेतकऱ्यांसह सर्वांना सजग करणे हे काम हवामानशास्त्र विभाग, कृषी विभागाला करावे लागणार आहे..कृषी शास्त्रज्ञांनी पीक व्यवस्थापनाबाबत तेच ते सल्ले देण्याऐवजी हवामानातील बदलानुसार शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनातील बदल सांगायला हवेत. एल निनोचे संकट हे काही भारतापुरते मर्यादित नाही. जगातील अनेक देशांना त्याचा फटका बसणार आहे. यंदा एल निनो गेल्या ७० वर्षांतील सर्वाधिक तीव्र असेल, असा इशारा ऑष्ट्रेलियाच्या हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभुमीवर सरकारने चोख नियोजन आणि भक्कम धोरणात्मक आधार यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.