Cotton Cultivation : ‘अतिघन’ अति उत्तमच!

Deshi Cotton : नवे सुधारित देशी कापूस वाणं उत्पादकतेबरोबर दर्जातही कसे सरस आहेत, हे अतिघन लागवड प्रकल्पाद्वारे प्रत्यक्ष दाखवून द्यावे लागेल.
Cotton Farm
Cotton FarmAgrowon

Cotton Crop : आंबा, पेरू यांसारखी काही फळपिके सोडली, तर देशात अतिघन लागवड तंत्र फारसे प्रचलित झाले नाही. केसर आंबा तसेच पेरूमध्ये देखील काही निवडक शेतकऱ्यांनीच या तंत्राचा अवलंब केला आहे. नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर) मागील दशकभराहून अधिक काळापासून कापसाच्या अतिघन लागवड तंत्राचा प्रसार-प्रचार करते. परंतु त्यांनाही यात फारसे यश आलेले नाही.

कोरडवाहू व हलक्या जमिनीमध्ये संकरित बीटी कापूस लागवड करण्याऐवजी देशी कापसाची अतिघन पद्धतीने लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते, असा सीआयसीआरचा अभ्यास सांगतो. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कापूस विकास कार्यक्रमात देखील देशी वाणांच्या अतिघन लागवडीचा समावेश करण्यात आला होता.

परंतु ही पद्धत देशातील बहुतांश कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. आत्ताही सीआयसीआरच्या पुढाकाराने कापसाची उत्पादकता वाढविण्याच्या हेतूने देशातील आठ कापूस उत्पादक राज्यांत अतिघन कापूस लागवड प्रकल्प (एचडीपीएस) राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत क्षेत्राच्या (७७५० हेक्टर) निम्म्याहून अधिक क्षेत्र (चार हजार हेक्टर) राज्यात आहे.

Cotton Farm
Cotton Cultivation : अति घन लागवड करून कापसाचे उच्चांक उत्पादन घ्या

जगाची सरासरी कापूस उत्पादकता ९५० किलो रुई प्रतिहेक्टर आहे. याच्या निम्म्याहून थोडी अधिक उत्पादकता (५५० किलो प्रतिहेक्टर) भारताची आहे. ब्राझील, तुर्की, मेक्सिको, चीन या कापूस उत्पादक देशांची उत्पादकता भारताच्या तिप्पट (१५०० ते १६०० किलो रुई प्रतिहेक्टर), तर ऑस्ट्रेलियाची उत्पादकता आपल्या पाच पट (२६०० किलो रुई प्रतिहेक्टर) आहे.

देशातील ६० टक्के कापूस हा जिरायती क्षेत्रात घेतला जात असून, तिथे उत्पादकता केवळ ३०० किलो रुई प्रतिहेक्टर एवढी कमी आहे. दुर्दैवी बाब म्हणजे राज्याची सरासरी कापूस उत्पादकताही ३०० किलो रुई प्रतिहेक्टर एवढीच आहे. आता अतिघन लागवड तंत्राने कापसाची प्रतिहेक्टर उत्पादकता ५०० ते ६०० किलो रुई नेण्याचे प्रस्तावित आहे.

खरे तर बीटीच्या आगमनानंतर देशात कापसाच्या लागवड पद्धतीत अनेक बदल झालेले आहेत. बीटी आगमनापूर्वी ठरावीक अंतरावर लागवडीची फुली पद्धत होती. आता पावली पद्धतीचा सर्वत्र अवलंब केला जात असून, त्यात दोन ओळी, दोन झाडे यांतील अंतर निश्‍चित नाही. बीटीच्या अधिक बियाण्याच्या वापर व्हावा म्हणून बियाणे कंपन्यांनी ही पद्धत प्रचलित केली असली, तरी त्यातून उत्पादकतेत काहीही फरक पडला नाही.

उलट २०१२-१३ पासून बीटी कापसाची उत्पादकता सतत घटत चालली आहे. अशावेळी प्रचलित पावली पद्धतीपेक्षा सघन लागवड पद्धत कशी वेगळी आहे, हेही उत्पादकांना पटवून द्यावे लागेल. सघन पद्धतीत प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या देशी वाणांबद्दलही उत्पादकांना फारसे माहीत नाही.

नवे सुधारित देशी कापूस वाणं उत्पादकतेबरोबर दर्जातही कसे सरस आहेत, हे अतिघन लागवड प्रकल्पाद्वारे प्रत्यक्ष दाखवून द्यावे लागेल. अतिघन लागवड पद्धतीत `कॅनॉपी मॅनेजमेंट’ महत्त्वाचे असून, त्याशिवाय ही पद्धती यशस्वी होणार नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.

कापसाचे वाण आणि लागवड तंत्र याशिवाय इतरही अनेक घटक कमी उत्पादकतेस कारणीभूत आहेत. अन्नद्रव्ये व्यवस्थापनाबाबत कापूस उत्पादकांमध्ये मोठा संभ्रम असून, बहुतांश शेतकरी कापसाला शिफारशीत खत मात्रा देताना दिसत नाहीत.

बीटी कापसावर गुलाबी बोंड अळी, रसशोषक किडी, तर मर, बोंडसड रोग, तर ‘लाल्या’ विकृतीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या कीड-रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन तंत्राचा अवलंब गरजेचा असताना बहुतांश शेतकरी केवळ रासायनिक कीडनाशकांचा वापर करतात.

त्यामुळे कीड-रोगांचे नियंत्रण तर होत नाही, उलट उत्पादनखर्च वाढतो आणि उत्पादकता कमी मिळते. कापसामध्ये लागवड ते वेचणीपर्यंत अत्याधुनिक यंत्रांचा वापर वाढला पाहिजेत. असे झाले तरच कापसाचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादकता वाढेल, कापसाची शेती उत्पादकांना किफायतशीर ठरेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com