
India Population Update : चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश झाला आहे. भारताची लोकसंख्या (Population of India) १४२.८६ कोटींवर पोहोचली असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या ‘द स्टेट ऑफ वल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट-२०२३’ च्या अहवालात नमूद केले आहे.
देशात जन्मदर वाढत असताना आरोग्याच्या सुविधेमुळे मृत्युदर घटला आहे. त्यामुळे आयुर्मान वाढून लोकसंख्येत भर पडत आहे. मुळात जगाच्या केवळ २.४ टक्के क्षेत्रफळ असलेल्या आपल्या देशात जगाच्या १८ टक्के लोकसंख्या सामावलेली आहे.
त्यामुळे येथील जल, जंगल, जमीन, वारा या नैसर्गिक संसाधनांबरोबर ऊर्जा, इंधन, रस्ते, शिक्षण, आरोग्य अशा पायाभूत सुविधांवर मुळातच ताण होता.
जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसा या सर्वांवर ताण वाढत गेला. त्यातच पुढील तीन दशके भारताची लोकसंख्या वाढत जाणार असून, लोकसंख्येने १६५ कोटींचा टप्पा पार केल्यावर त्यात घसरण होणार आहे. यावरून नैसर्गिक संसाधनांबरोबर पायाभूत सुविधांवर अजून किती ताण वाढेल, हे लक्षात यायला हवे.
लोकसंख्या वाढीतच देशातील सर्व समस्यांचे मूळ दडलेले आहे, असे म्हटले जाते तर काहींच्या मते लोकसंख्या वाढीला विकासाचा अभाव कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. अर्थात, हा वादविवादाचा मुद्दा आहे. आज अन्नधान्यांच्या बाबतीत आपण पूर्णपणे स्वावलंबी नाही.
दैनंदिन आहारात उपयुक्त ३० टक्के डाळी आणि ७० टक्के खाद्यतेल आपण आयात करतो. २०५० पर्यंत आपली लोकसंख्या १६५ कोटींवर पोहोचणार आहे. अन्नधान्य उत्पादन दुप्पट केले तर आपले पोट भरणार आहे.
अशावेळी घटत जाणाऱ्या शेतीक्षेत्रातून वाढत्या लोकसंख्येची भूक कशी भागविणार? महागाई तसेच बेरोजगारीने देशात उच्चांक गाठला आहे. लोकसंख्या वाढ अशीच होत राहिली तर सर्वांना रोजगार, शिक्षण, चांगल्या आरोग्य सेवा कशा मिळणार? घटत्या शेती क्षेत्रातून अन्नसुरक्षा अबाधित ठेवायची असेल, तर पिकांच्या उत्पादकता वाढीशिवाय पर्याय नाही.
शेतीला वीज, पाणी या पायाभूत सुविधांबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल. संरक्षित शेती, काटेकोर शेती या भविष्यातील शेती पद्धती असतील, हे पाहावे लागेल. हे करीत असताना शेतीतून काही लोकांना बाहेर काढून (छुपे बेरोजगार) त्यांना पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील.
भारताच्या लोकसंख्यावाढीबाबत एक चांगली बाबही सांगण्यात येते. भारताला तरुणांचा देश म्हटले जाते. भारतीयांचे सरासरी वय २९ वर्षे असून ते चीन, अमेरिका, युरोपियन देशांपेक्षा खूप कमी आहे. कर्त्या लोकसंख्येचे भारतातील प्रमाण सध्या ६४ टक्के असून, ते २०२६ पर्यंत ६८ टक्क्यांच्या पुढे जाणार आहे.
कर्ती लोकसंख्या व आर्थिक विकासाचा सकारात्मक संबंध असल्याचे अनेक तज्ज्ञांनी अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. परंतु केवळ तरुणांची संख्या अधिक आहे म्हणून विकासदरात आपोआप वाढ होत नसते. त्यासाठी उपलब्ध श्रमशक्तीला रोजगार पुरवून तिचा उत्पादक वापर करणे आवश्यक असते.
चीनने वाढत्या कर्त्या लोकसंख्येचा उत्पादक वापर करून दोन अंकी विकासदर साध्य केला होता. अशी व्यवस्था निर्माण करण्यात भारत देशाला मात्र अपयश आले हे आहे.
अजूनपर्यंत तरी भारताला विकासदराची आठ टक्क्यांची सीमारेषा ओलांडता आलेली नाही. लोकसंख्या वाढीसाठी आपण जात, धर्म या घटकांना जबाबदार धरत बसलो आहोत. खरेतर लोकसंख्या वाढीला हे घटक जबाबदार नसून ते घटक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आहेत, हे लक्षात
घेऊन उपाययोजना केल्याशिवाय लोकसंख्या नियंत्रणात येणार नाही. लोकसंख्या नियंत्रणाबरोबर सध्याच्या डिजिटल तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात युवक-युवतींना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.