डॉ. मंदार दातारस्थानिक समाज, आदिवासी, ग्रामवासी यांच्यामध्ये राहून, त्यांच्या समस्या लक्षात घेत गाडगीळांनी निसर्गाधारित विज्ञानाची जी मांडणी केली आहे, ती आजघडीला पर्यावरण ऱ्हासाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मोलाची आहे..अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित प्राध्यापक माधव गाडगीळ यांच्या निधनाने आपण एक मोठा द्रष्टा गमावला आहे. पर्यावरणशास्त्रात त्यांनी केलेल्या कामगिरीचे मोल सद्यःस्थितीत कशातही करता येणार नाही, एवढे मोठे आहे. ते जसे बिनीचे जीवशास्त्रज्ञ म्हणून लोकांना माहीत आहेत, तसे उत्तुंग प्रतिभेचे लेखक म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली आहे. एकीकडे विज्ञानाचा ठोस धागा पकडून काम करत राहणे, त्यावर आधारित वैज्ञानिक प्रबंध प्रकाशित करणे, तर दुसरीकडे थेट लोकांसोबत राहून प्रत्यक्ष जमिनीवर काम करणे अशी दुहेरी कामगिरी गाडगीळसरांनी आयुष्यभर मोठ्या कुशलतेने केली..Madhav Gadgil Passes Away: सह्याद्रीचा सखा हरपला.त्यांचा जन्म पुण्यातलाच. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे ते सुपुत्र. वडिलांमुळे लहानपणापासूनच गाडगीळ सर वेताळ टेकडीवर पक्षिनिरीक्षण करायला लागले आणि त्यातूनच त्यांनी श्रेष्ठ पक्षितज्ज्ञ सालीम अली यांना पत्र लिहिले. सालीम अलींकडून मिळालेल्या उत्तराने आपण आयुष्यभर पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे, असे त्यांनी लहानपणापासूनच ठरवून टाकले होते..लहानपणी वडिलांच्या सोबतच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या इरावती कर्वे, त्यांच्या घरी नियमित भेटायला येणाऱ्या भाऊराव पाटील यांच्यासारख्या विद्वानांच्या प्रभावात त्यांची जडणघडण झाली. फर्ग्युसन महाविद्यालयात सुरुवातीचे शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण मुंबईच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये झाल्यावर त्यांनी अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश घेतला. सत्तरच्या दशकात जेव्हा जीवशास्त्र हे केवळ वर्णनात्मक मानले जाई, तेव्हा गाडगीळ यांनी हावर्डमध्ये गणिताचा आणि संगणकाचा वापर करून जीवशास्त्रीय कोडी सोडवली..Dr. Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे ८३ व्या वर्षी निधन.प्राण्यांच्या वागणुकीचा अभ्यास करून ‘गेम थिअरी’च्या गणितांवर आधारित शोधनिबंध लिहिले. हावर्डमध्ये ते आयबीएम फेलो म्हणूनही एक वर्ष होते. त्यांना तिथे प्राध्यापकपदावर कायम स्वरूपाची नेमणूक मिळत असताना व्हिएतनाम युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या धोरणांना विरोध म्हणून त्यांनी तिथे न राहता भारतात येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ते पुण्याच्या ‘महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी’मध्ये रुजू झाले व पुढे बंगळूरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये त्यांची कारकीर्द बहरली. तेथेच त्यांनी पर्यावरण अभ्यासकेंद्र स्थापन केले आणि या केंद्राच्या माध्यमातून भारतभर निसर्गाचा, पर्यावरणाचा, पर्यावरणावर आधारित समाजांचा अभ्यास केला..माझी सरांशी ओळख झाली ती २००८मध्ये. त्याआधी त्यांचे नाव, त्यांचे कर्तृत्व, त्यांचे देवराई विषयातील योगदान याविषयी मी ऐकून होतो. पण नशिबाने त्यांच्यासोबतच काम करायची संधी मिळाली. ‘महाराष्ट्र जीन बँक’ नावाच्या राज्यशासनाच्या ‘राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगा’च्या प्रकल्पातून त्यांना महाराष्ट्रभर काम करायचे होते, त्या प्रकल्पावर मी ‘आघारकर संशोधन संस्थे’मध्ये संशोधन सहायक म्हणून रुजू झालो आणि माझे आयुष्य बदलून गेले..Dr. Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्र संघाचा पुरस्कार जाहीर.तोवर वनस्पती वर्गीकरण शास्त्राचे चाकोरीबद्ध शिक्षण घेतलेल्या मला, गाडगीळ सर सांगत असलेल्या अनेक संकल्पनाही एकदम नव्या होत्या. पुढची तीन वर्षे त्यांच्यासोबत महाराष्ट्रभर भटकण्यात घालवली. या भटकंती दरम्यान मी सरांना अनेक प्रश्न विचारत राहिलो आणि त्यांनी मोठ्या औदार्याने माझी तहान भागवली. अनेक पुस्तके मी त्यांच्यामुळेच वाचली. जेबीएस हाल्डेन, एडवर्ड विल्सन, जॅरेड डायमंड या मंडळींची महती कळाली. आणि तोवर अभ्यासक्रमाने आमच्यापासून ‘एकार्थे’ लपवून ठेवलेल्या उत्क्रांतिशास्त्राची गोडी लागली..‘सह्याचला' आले नऊ भाषेतमहाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पानंतरही बऱ्याच गोष्टी मी सरांसोबत एकत्र केल्या. आम्ही गोव्याच्या खाणींवर आधारित एक संशोधन प्रबंध लिहिला. ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये आम्ही कालिदासाच्या रघुवंशातील चौथ्या सर्गातल्या निसर्ग आणि भूगोलावर आधारित एक लेख लिहिला. आकाशवाणी किंवा इतर माध्यमांसाठी मी त्यांच्या अनेक मुलाखतीही घेतल्या. पण माझ्यासाठी त्याहीपलीकडे मोलाची संधी म्हणजे त्यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘सह्याचला आणि मी : एक प्रेमकहाणी’ या ग्रंथाचे संपादन करण्याची अद्भुत संधी..River Pollution : धनदांडग्यांचे प्रदूषण लपविण्यात प्रदूषण मंडळाच्या यंत्रणा गुंतल्या ; डॉ. माधव गाडगीळ यांचा आरोप ; पहिला राम नदीसेवक पुरस्काराचे वितरण.हे पुस्तक केवळ त्यांचे आत्मचरित्र नसून भारताच्या पर्यावरणाचा गेल्या सात आठ दशकाचा आढावा घेणारा ग्रंथ आहे. ‘सह्याचला’ हे नाव त्यांनी कालिदासाच्या ‘रघुवंश’ वरूनच घेतले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात स्वतःला मिळालेल्या पुरस्कारांची यादी घेण्याऐवजी आपले अनुभव आणि निसर्गाकडून काय शिकलो, हे सांगणे त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले आहे. एकाच वेळी हे पुस्तक नऊ भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाले आहे आणि हा विक्रमच आहे. या पुस्तकाच्या लिखाणादरम्यान मला या पुस्तकातल्या पर्यावरणाच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी त्यांच्याकडून समजून घेता आल्या, अनेक गोष्टी त्यांनी मला सविस.बांबूवर विशेष प्रेमगाडगीळ सरांचे बांबूंवर विलक्षण प्रेम होते. डॉ. तेताली सरांच्या प्रेरणेतून मेस नावाच्या एका शास्त्रीय नाव नसलेल्या बांबूला आम्ही ‘सुडोऑक्सीटेनानथेरा माधवी’ असे गाडगीळ सरांचेच नाव दिले आहे. सरांना कवितांची, मराठी साहित्याची विलक्षण आवड होती. गेली दहा पंधरा वर्षे ‘सकाळ’मध्ये नियमाने प्रकाशित होणाऱ्या त्यांच्या लिखाणाची वाट पाहणाऱ्या वाचकांना त्यांच्या या पैलूचा चांगलाच परिचय आहे. मराठी साहित्याविषयी त्यांच्याशी केलेल्या अगणित चर्चा मला खूप समृद्ध करून गेल्या आहेत..भारतीय पर्यावरण या विषयाला गेली अनेक वर्षे समांतर शब्द असणाऱ्या प्रा. माधव गाडगीळ नावाच्या एका युगाचा हा अंत आहे. वैज्ञानिक केवळ हस्तिदंती मखरात राहून काम करतात असा एक आरोप वारंवार होत राहतो. मात्र आयुष्यभर स्थानिक समाज, आदिवासी, ग्रामवासी यांच्यामध्ये राहून, त्यांच्या भूमिका, त्यांच्या समस्या लक्षात घेत गाडगीळांनी निसर्गाधारित विज्ञानाची जी मांडणी केली आहे ती आजघडीला पर्यावरण ऱ्हासाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मोलाची आहे.(लेखक आघारकर संशोधन संस्थेत कार्यरत आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.