INAPH : ‘इनाफ’ ः पशुधनाचे आधार कार्डच!

Livestock Records : पशुधनाबाबतच्या आवश्यक सर्व नोंदी या इनाफ प्रणालीवर करता येतील. त्यानंतर एकत्रित विदा गोळा होऊन पशू उत्पादकतेत वाढ होण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे आणि भविष्यातील नियोजनासह पशुपालकांना वैयक्तिक मार्गदर्शन करणे सुलभ होणार आहे.
INAPH
INAPH Agrowon
Published on
Updated on

डॉ. व्यंकटराव घोरपडे

INFORMATION NETWORK FOR ANIMAL PRODUCTIVITY AND HEALTH : पशुधनाबाबतच्या आवश्यक सर्व नोंदी या इनाफ प्रणालीवर करता येतील. त्यानंतर एकत्रित विदा गोळा होऊन पशू उत्पादकतेत वाढ होण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे आणि भविष्यातील नियोजनासह पशुपालकांना वैयक्तिक मार्गदर्शन करणे सुलभ होणार आहे.

राज्यातील एकही पशुपालक असा नसेल, की त्याला आधार कार्ड म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय, हे माहीत नाहीत. ‘इन्फोसिस’ कंपनीने ही दहा अंकी नंबर प्रणाली विकसित केली आहे. देशात प्रत्येक ठिकाणी आधार क्रमांक हा गरजेचा बनला आहे. बॅंका, मोबाइल कनेक्शन, रेशन कार्ड, आयकर भरणे, पेन्शन योजना यांसारख्या विविध सेवा आणि लाभाच्या योजनांशी तो जोडला आहे. त्यामुळे शासनाला सर्व सेवा, वितरण सुरळीत करता आले.

सोबत थेट लाभ देता आल्याने खर्च कमी झाला व भ्रष्टाचार कमी झाला. सर्व प्रक्रिया सुलभ झाल्याने आर्थिक फसवणूक टळली व सार्वजनिक वितरण प्रणाली बळकट झाली, हे आपण सर्व जाणतोच. त्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी आपला सहभाग नोंदवला व हे इतके मोठे उद्दिष्ट आणि आव्हान साध्य केले. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ, आनंद- गुजरात यांनी देशातील सर्व जनावरांची ओळख व नोंदणी व्हावी यासाठी याच इन्फोसिस कंपनीमार्फत ‘इनाफ’ संगणक प्रणाली विकसित केली आहे. याद्वारे कृत्रिम रेतन नोंदणी, दूध उत्पादन, पशू आहार, पशू उपचार, रोगनिदान, लसीकरण व रोग प्रादुर्भावाच्या नोंदीद्वारे पशुपालन विषयक सेवा, मार्गदर्शन देणे शक्य झाले आहे. यामुळे देशातील पशुपालन विषयक सेवा देणाऱ्या संस्थांना एकत्रित आणून भविष्यात पशुपालन व्यवसायाला ‘औद्योगिक दर्जा’ देता येणार आहे.

INAPH
Livestock Exhibition : प्रदर्शनात विविध जातींच्या पशुधनाचे मोठे आकर्षण

इनाफ प्रणाली क्षेत्रीय स्तरावर सर्वांना मोबाइल व अधिकाऱ्यांना मोबाइलसह संगणक, लॅपटॉप व नोटबुकद्वारे याची नोंदणी करणे शक्य केले आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाज केल्यावर आवश्यक नोंदी या इनाफ (Information Network For Animal Health And Productivity) प्रणालीवर संबंधित जनावरांच्या समोर करता येतील. त्यानंतर एकत्रित विदा (डाटा) गोळा होऊन पशू उत्पादकतेत वाढ होण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे, सुरू असणाऱ्या कार्यक्रमात सुधारणा करणे आणि भविष्यातील नियोजनासह पशुपालकांना वैयक्तिक मार्गदर्शन करणे सुलभ होणार आहे. उच्च पैदासक्षम वळूची निर्मिती करणेदेखील शक्य होणार आहे. खासगी पशुवैद्यक तज्ज्ञ व सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांचे संस्था प्रमुख यांच्या माध्यमातून ही माहिती संकलित करणे शक्य होणार आहे.

या ठिकाणी सर्वांत महत्त्वाची बाब कोणती असेल, तर बारा अंकी पशुधन ओळख क्रमांक बिल्ला, तो जनावराच्या कानात मारणे व त्याची इनाफ वर नोंद करणे. यावरूनच पुढे वर उल्लेख केलेल्या सर्व नोंदी करण्यात येऊन त्याचा वापर भविष्यातील नियोजन व धोरण निश्‍चित करण्याकरिता होणार आहे. बारा अंकी क्रमांकासह पशुधनाची नोंदणी झाल्यावर सोबत त्या जनावरांची जात, जन्म दिनांक, मालकाचे नाव, गाव, पत्ता याची नोंद होणार आहे. एखादा बिल्ला पडला तर नवीन बिल्ला मारून त्याची नोंद करायची सोय त्यामध्ये आहे. त्यामुळे यातून भविष्यात शासन व पशुसंवर्धन विभाग या सर्व बाबतीत ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमात सर्व पशुपालकांना त्यांच्या पशुधनासह जोडून येणारा स्पर्धेचा काळ त्यांच्यासाठी सुलभ करण्याचा प्रयत्न करणार आहे.

INAPH
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’च्या प्रादुर्भावामुळे जिल्‍ह्यातील पशुधनाचे बाजार बंद

यामध्ये सर्वांत महत्त्वाची जबाबदारी आहे ती पशुपालकांची! ती म्हणजे पशुपालकांनी त्यासाठी आपल्या जनावरांच्या कानात या १२ अंकी क्रमांकाचा बिल्ला मारून घेणे व त्याची काळजी घेणे, सर्व जनावरांचे हे क्रमांक सोबत मोबाइलमध्ये ठेवणे किंवा छोट्या वहीत कायम नोंदवून ठेवणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक पशुपालक याबाबत खूप उदासीन आहेत, असे जाणवते. भरपूर प्रमाणात पशुसंवर्धन विभागाने हे १२ अंकी बिल्ले राज्यातील सर्व दवाखान्यांत पुरवले आहेत, पण पशुपालक मंडळी हे बिल्ले मारून घेण्यास उत्सुक दिसत नाहीत. बिल्ला स्वतःकडे ठेवण्याचा आग्रह धरतात. आमचा फायदा काय, असे विचारतात. कानाला जखम होते, त्याखाली गोचीड होतात, चरायला गेल्यानंतर झाडाझुडपात बिल्ला अडकून कान फाटतात, तसेच बैलगाडी शर्यतीत पळणाऱ्या जनावरांना त्याचा त्रास होतो, बट्टा लागतो अशा एक ना अनेक तक्रारी आहेत.

या सर्व तक्रारी पशुवैद्यक जो बिल्ला मारायला गोठ्यात जातो त्याच्याकडे केल्या जातात. शंकांचे समाधान करण्याचा तो प्रयत्न करतो पण अजूनही पशुपालक सहकार्य करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांच्या काही तक्रारी रास्त असतीलही पण एक चळवळ म्हणून सर्वांनी ही प्रक्रिया मोहीम स्वरूपात राबवायला हवी. सर्व जिल्हाधिकारी हे पशुसंवर्धन विषयक अनेक योजनांचे अध्यक्ष आहेत त्यांनी याबाबत पुढाकार घेणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या माध्यमातून त्याचे महत्त्व पटवून देणे सोबत रेडिओ, टीव्ही, समाजमाध्यमातून प्रबोधन करणे, किंबहुना ‘ब्रँड अँबेसिडर’ नेमून त्यांच्या माध्यमातून वारंवार ही बाब निदर्शनास आणून त्याचे महत्त्व पटवून दिले, तर नक्कीच फरक पडू शकतो. मोहीम स्वरूपात सर्व विभागाच्या पुढाकारानेच हे शक्य होईल, असे एकूणच याबाबतीत कानोसा घेतला असता कळते.

पशुसंवर्धन विभागाने देखील बिल्ल्याचा आकार, त्यासाठी वापरलेले मटेरियल, सोबत बिल्ला मारण्यासाठी वापरावयाचे मशिन, त्यावरील क्रमांक वाचता येणे व जनावरांनी सुसह्य धारण करणे त्याचबरोबर क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अडचणींचा विचार करून त्या पद्धतीने संशोधन केल्यास अनेक समस्या आपल्याला कमी करता येतील. पशुमित्र नेमून त्यांच्यावर प्रत्येकी १००० जनावरांची जबाबदारी सोपवून या बाबींवर लक्ष ठेवणे, नोंदणी करणे सोबत इतर दैनंदिन नोंदणीसाठी स्थानिक पशुवैद्यकांना मदत करणे अशा बाबी जर अनुसरल्या तर त्याचे प्रमाण वाढल्याशिवाय राहणार नाही.

आता राज्यातील सर्व शेळ्या-मेंढ्यांना देखील अशा प्रकारचे इनाफ बिले मारण्याची मोहीम सुरू झालेली आहे. त्यामुळे या बाबींचा प्रकर्षाने आपल्याला विचार करावा लागेल. केरळसारख्या राज्यातील पठाणमथिट्टा जिल्ह्यात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चीपचा (RFID) वापर केल्याचे कळते, तेही ७५ हजार जनावरांवर त्याचा यशस्वी वापर केला आहे. त्यामुळे त्याचा देखील अभ्यास करून कमीत कमी शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात वापर करता येऊ शकेल का? याबाबत विचार विनिमय होणे आवश्यक आहे. जग आता संपूर्ण संगणकीय प्रणाली वापराकडे वळलेले आहे. मोठ्या प्रमाणात विदा गोळा करून त्याद्वारे निर्णय, नेमके अंदाज वर्तवून त्याचा फायदा करून घेत आहेत. आता ‘नॅशनल लाइव स्टॉक डिजिटल मिशन’ (NDLM) सारख्या योजना येत आहेत. अनेक राज्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ते आपल्यापेक्षा अनेक बाबतींत वरच्या क्रमांकावर आहेत, याचा सर्व पशुपालकांनी विचार करावा. या ठिकाणी राज्यातील बिल्ले मारलेल्या जनावरांची संख्या व नोंदणी केलेल्या जनावरांची संख्या नमूद करून मोठा संभ्रम निर्माण करण्याची इच्छा नाही. त्यामुळे सर्व पशुपालकांनी आपल्या सर्व जनावरांना बिल्ले मारून घ्यावे इतकेच या माध्यमातून आपल्याला विनंती करता येईल.

डॉ. व्यंकटराव घोरपडे, ९४२२०४२१९५
(लेखक पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त सहायक आयुक्त आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com