Turmeric Crop : पिवळ्या सोन्याची वाढवा झळाळी

Turmeric Products : जगाच्या बाजारपेठेत आपली हळद आणि मूल्यवर्धित उत्पादने व्यवस्थित पोहोचविली, तर या पिवळ्या सोन्याची झळाळी वाढेल.
Turmeric
TurmericAgrowon
Published on
Updated on

Turmeric Market : भारतात प्राचीन काळापासून हळदीचे पीक घेतले जाते. जागतिक हळद उत्पादनाच्या ७५ ते ८० टक्के हळद आपल्या देशात उत्पादित होते. जागतिक बाजारात ६५ टक्क्यांहून अधिक वाटा भारतीय हळदीचा आहे.

आपल्यानंतर हळद निर्यातीत चीन, म्यानमार, नायजेरिया आणि बांगला देश यांचा क्रमांक लागतो. आपली हळद प्रामुख्याने बांगला देश, यूएई, इराण, अमेरिका, युरोपसह इतरही अनेक देशांत जाते. आपली हळद जागतिक बाजारात ‘भारतीय केशर’ (इंडियन सॅफ्रॉन) म्हणून ओळखली जाते.

हळद पित्तशामक, जंतुनाशक, रक्त शुद्ध करणारी असून, मूळव्याध, मधुमेह, कर्करोग अशा अनेक विकारांवर गुणकारी औषध म्हणून वापरली जाते. आयुर्वेदातील हळदीचे महत्त्व आणि मसाल्याचा एक प्रमुख घटक भारतीय हळदीला जगभरातून मागणी वाढतेय. कोरोना आणि त्यानंतरच्या काळात आपल्या हळद निर्यातीत वाढ होत आहे. दररोजच्या अन्न निर्मितीत हळद सर्वत्र वापरली जाते.

शिवाय हळदीवर प्रक्रिया करून अनेक उपयुक्त पदार्थ तयार केले जातात. औषध, अन्न प्रक्रिया, मसाले, सौंदर्य प्रसाधने आदी उद्योगांकडूनही हळदीला मागणी असते. त्यामुळे देशांतर्गतही हळदीला मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू हे हळद उत्पादनात आघाडीवरचे राज्ये आहेत. देशात एकूण २० राज्यांत हळद उत्पादन घेतले जाते. हळदीच्या ५३ हून अधिक जाती देशात प्रचलित आहेत.

Turmeric
Cotton Rate : पांढऱ्या सोन्याची झळाळी कायम

भारत आणि हळद हे नाते अतूट आहे. हळदीच्या पेटंटची लढाई जेव्हा आपण जिंकली, तेव्हा हे नाते अधिक ठळकपणे जगापुढे आले.
असे असले, तरी हळद लागवडीपासून ते प्रक्रिया, निर्यातीपर्यंत कशातच सुसूत्रता नाही. त्यामुळे मागणीनुसार हळदीचा पुरवठा नीट होत नाही. प्रक्रियेचेही तसेच आहे. दरातही सातत्याने चढ-उतार होत राहतात. यात उत्पादकांपासून ते निर्यातदार अशा सर्वांचेच नुकसान होतेय.

म्हणून महाराष्ट्र, तेलंगणासह इतरही हळद उत्पादक राज्यांनी हळदीसाठी राष्ट्रीय महामंडळ स्थापन करण्याची मागणी मागील सहा-सात वर्षांपासून लावून धरली होती. अशा ‘राष्ट्रीय हळद महामंडळ’ स्थापनेला नुकताच मुहूर्त लागला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे.

Turmeric
Turmeric : हळदीची झळाळी वाढणार की मंदावणार?

आता घोषणेप्रमाणे लवकर महामंडळ स्थापन करायला हवे. हे महामंडळ स्थापन करताना अध्यक्षांपासून ते सर्व प्रतिनिधी पदांवर योग्य व्यक्तींची निवड, नियुक्ती होईल, हे पाहावे. हळद महामंडळ हे देशातील हळद क्षेत्र, उत्पादन, प्रक्रिया आणि निर्यातीत वाढ या उद्दिष्टांवर पूर्ण क्षमतेने काम करेल, शिवाय मसाले मंडळासह इतर संबंधित संस्थांसोबत समन्वयातून विकासावर भर देईल, याची काळजीही घ्यावी लागेल.

आपल्याच देशातील कमी कालावधीच्या, अधिक उत्पादन आणि कुरकुमीनचे अधिक प्रमाण असलेल्या जातींवर संशोधन होऊन त्यांचा प्रसार-प्रचार इतर राज्यांत झाला पाहिजेत. देशपातळीवर हळद बियाण्यांमधील भेसळ कमी होऊन गुणवत्तापूर्ण बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजे. योग्य पीक नियोजनातून हळदीच्या उत्पादनात वाढ होऊ शकते.

हळद लागवड ते काढणी आणि प्रक्रिया या कामांत यांत्रिकीकरणाचा वापरही वाढला पाहिजेत. सध्या देशभरात कुकरमध्ये वाफेवर हळद शिजविली जाते. तैवान, डेन्मार्क या देशांनी कच्च्या हळदीवरच प्रक्रियेचे तंत्र विकसित केले आहे. अशा प्रक्रियेत हळदीतील कुरकुमीनचे प्रमाणही अधिक राहत असून, असे तंत्र देशातील हळद उत्पादकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. आपला बहुतांश व्यापार हा कच्च्या हळकुंडाचा आहे.

शेतकऱ्यांच्या पुढाकारातून हळदीच्या हळकुंडापासून ते क्रीम्स, खाद्यान्ने व औषधांपर्यंतच्या मूल्यसाखळ्या तयार होणे गरजेच्या आहेत. हळदीचे मूल्यवर्धन करून उत्पादनांची निर्यात वाढवावी लागेल. भारतीय हळदीचा ब्रॅण्ड जगात लोकप्रिय असून, त्यास चांगली मागणी पण आहे. जगाच्या बाजारपेठेत आपली हळद आणि मूल्यवर्धित उत्पादने व्यवस्थित पोहोचवली, तर या पिवळ्या सोन्याची झळाळी वाढेल. या दिशेने राष्ट्रीय हळद महामंडळाने काम केले तर उत्पादकांपासून ते निर्यातदार असे सर्वांचेच कल्याण होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com