Soyabean Crop : सोनेरी दाण्यांची झळाळी कशी वाढेल?

Soyabean Production : गोल्डन बीन म्हणून ओळखल्‍या जाणाऱ्या सोयाबीनची शेती तोट्याची ठरतेय. या पिकात उत्पादकता ते उत्पन्नवाढ असे काम राज्यात झाले पाहिजे.
Soyabean Rate
Soyabean Rateagrowon
Published on
Updated on

Soyabean Harvesting : कमी लागवड खर्च, कमी मेहनत, बऱ्यापैकी उत्पादन आणि मिळकतही या सर्वांच्या परिणामस्वरूप राज्यातच नव्हे, तर देशात अल्पावधीतच सोयाबीन हे मुख्य नगदी पीक म्हणून पुढे आले. कमी कालावधीच्या या पिकावर रब्बी दुसरे पीक घेता येते, हेही एक कारण सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात वाढीचे आहे.

महाराष्ट्रात तर खरिपात तूर-सोयाबीन आंतरपीक लागवड आणि त्यातीलच सोयाबीनच्या काढणीनंतर हरभरा अथवा गहू अशी तीन पिके काही शेतकरी घेतात. परंतु मागील काही वर्षांपासून या पिकात वाढत्या तणाचा आणि विविध कीड-रोगांच्या प्रादुर्भावाने उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. मागील तीन-चार वर्षांपासून तर या पिकाबाबत चांगले काही ऐकूच येत नाही. या वर्षी जून-जुलैमधील अतिवृष्टीने अनेक ठिकाणचे सोयाबीन वाहून, खरडून गेले. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमधील पावसाच्या मोठ्या खंडाने पिकाची वाढ खुंटली. फुले-कळ्या कमी लागल्या. त्यातच येलो मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावाने फुलगळ झाली, शेंगा भरल्या नाहीत.

Soyabean Rate
Soybean MSP : सोयाबीन विकले जातेय आधारभूत किमतीच्याही खाली

विदर्भ-मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांनी तर रोगग्रस्त सोयाबीनवर रोटाव्हेटर फिरविला. अशा संकटातून आता सोयाबीन पीक काढणीला आले असता त्यासाठी मजूर मिळत नाहीत. मजूर उपलब्ध असतील तर त्यांनी काढणीचे दर खूपच वाढविले आहेत. सोयाबीन काढणीसाठी कंबाइन हार्वेस्टरचा वापर केला जातो. परंतु त्यांची संख्या कमी आहे. त्यांचेही दर परवडणारे नाहीत. अनेक शेतांत हार्वेस्टर जात नाही. काही शेतकरी नुकसान होते म्हणून हार्वेस्टऱ वापरत नाहीत. त्यामुळे बहुतांश शेतकरी मजुरांकडूनच सोयाबीनची काढणी करतात.

या सर्व दिव्यातून सोयाबीनची काढणी केली तर आधीच्या भाकिताप्रमाणे उत्पादन कमी मिळत आहे. काढलेले सोयाबीन बाजारात न्यावे, तर त्यास हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय. सोयाबीन लगेच न विकता साठवून ठेवावे, तर त्यातील ओलाव्याच्या अधिक प्रमाणामुळे खराब होण्याची भीती आहे. अनेक शेतकऱ्यांकडे साठवणुकीला जागा नाही. काही शेतकऱ्यांकडे साठवणुकीला जागा आहे, ओलाव्याचे प्रमाणही कमी आहे. परंतु आर्थिक चणचणीमुळे सोयाबीन विकल्याशिवाय पर्याय नाही.

या सर्व अडचणी पाहता राज्यात गोल्डन बीन (सोनेरी दाणे), मॅजिकबीन म्हणून नावारूपाला आलेले सोयाबीन आता शेतकऱ्यांना परवडेनाशे झाले आहे, सोयाबीनची शेती तोट्याची ठरतेय. एकरी आठ ते १० क्विंटलचा उतारा आला तर सोयाबीनमध्ये खर्च - मिळकतीची तोंडमिळवणी होते. परंतु बहुतांश शेतकऱ्यांना एकरी तीन ते चार क्विंटलच्या पुढे उत्पादन मिळत नाही. सुमारे चार वर्षांपूर्वी रॅंडी डाऊडी या जॉर्जिया येथील शेतकऱ्याने सोयाबीनमध्ये एकरी ५१.७७ क्विंटल उत्पादन नोंदवून जागतिक उच्चांक स्थापित केला होता. डाऊडी यांनी घेतलेले विक्रमी सोयाबीन उत्पादन जागतिक सरासरीच्या पाच पट अधिक, तर आपल्या राज्यातील सरासरी सोयाबीन उत्पादनाच्या जवळपास १३ पटीने अधिक आहे. अशावेळी सोयाबीन उत्पादकता ते शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ अशा दोन्ही पातळ्यांवर राज्यात काम झाले पाहिजे.

Soyabean Rate
Soybean Market: हमीभावाने सोयाबीन विक्री शेतकऱ्यांना परवडेल का? | Agrowon | ॲग्रोवन

शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम वाणांचा, त्यांच्या दर्जेदार बियाण्याचा पुरवठा झाला पाहिजेत. बीबीएफ तंत्राद्वारे सोयाबीनमध्ये तणांचा बंदोबस्त, आपत्तीत नुकसान कमी आणि उत्पादकतेत वाढ आढळून येते. सोयाबीन उत्पादकांकडून या तंत्राचा वापर वाढायला हवा. सोयाबीनला कधीच हमीभावापेक्षा कमी भाव मिळणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. केंद्र-राज्य सरकारने सोयाबीन बाजारात दर पाडण्यासाठी हस्तक्षेप करू नये. सोया दूध, तेल, पेंड याबरोबरच प्रोटीन पावडर, पौष्टिक पूरक आहार, पशुपक्षी खाद्य अशा विविध प्रक्रिया पदार्थांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे. अशावेळी सोयाबीनवरचे प्रक्रिया उद्योग वाढवून मूल्यवर्धित उत्पादने जगभर पोहोचतील, हेही पाहावे लागेल. असे झाले तरच या सोनेरी दाण्यांची झळाळी वाढेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com