Arra Grape : ‘आरा’चा दरारा

Grape Variety : प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीही अधिक उत्पादन आणि गोड चव ही या द्राक्षाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात.
Arra Grape
Arra GrapeAgrowon

Sahyadri Farmers Producer Company Grape Farming : मोहाडीच्या ‘सह्याद्री फार्म’ने सुमारे चार वर्षांपूर्वी ‘आरा’ या रंगीत द्राक्ष वाणाची आयात केली. त्यानंतर या वाणाच्या चाचण्या घेऊन त्याची शेतकऱ्यांच्या शेतावर लागवड केली. बाहेरून पेटेंटेड वाण आणण्याचे त्यांचे प्रयत्न नुकतेच फळास आले. सह्याद्री आळंदी झोन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे संचालक कैलास माळोदे यांच्या शेतातील ‘आरा’ या विदेशी वाणाचे द्राक्ष काढणीस प्रारंभ झाला आहे.

या द्राक्षांचा थेट शेतातच ऑनलाइन लिलाव करण्यात आला. त्यात प्रतिकिलो २०० रुपये दर मिळाला आहे. द्राक्षाच्या शिवार खरेदीत उत्पादकांना आत्तापर्यंत मिळालेला हा उच्चांकी दर ठरला आहे. शेतातच द्राक्ष लिलावाचा देखील हा देशातील पहिला प्रयोग मानला जात आहे. आपल्या राज्यातील द्राक्ष उत्पादक हे जगाच्या पाठीवरचे कोणतेही प्रगत तंत्र अवलंबण्यास कायम तयार असतात.

त्यामुळे राज्यातील द्राक्ष शेतीत सातत्याने प्रयोग सुरू असतात. यातून दर्जेदार द्राक्ष उत्पादन आणि त्यांच्या निर्यातीतून जागतिक बाजारातही आपल्या द्राक्षांनी चांगलाच ठसा उमटविला आहे. असे असले तरी द्राक्ष मण्यांची फुगवण, योग्य ब्रीक्स, गोड रसाळ चव आणि टिकाऊक्षमता आदी गुणवत्तेच्या अभावाने आपली निर्यात थोडी मार खात आहे. पेरू, नेदरलॅंड, चिली, इटली, अमेरिका हे देश त्यांच्या उत्तम द्राक्ष वाणांमुळे निर्यातीत आपला दबदबा टिकवून आहेत.

आपल्या येथील नाशिकची अनुकूल जमीन आणि वैविध्यपूर्ण हवामान यांच्या बळावर अनेक द्राक्ष उत्पादक उपलब्ध वाणांचे निर्यातक्षम उत्पादन घेत आहेत. अशा द्राक्ष उत्पादकांना सह्याद्री फार्मच्या माध्यमातून जागतिक पातळीवरील उत्तम गुणवत्तेच्या जाती आता उपलब्ध होतील.

Arra Grape
Grape Farming : बुलढाणा जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक निसर्गापुढे हतबल

कॅलिफोर्नियातील आरा द्राक्ष वाण जगप्रसिद्ध आहे. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीही अधिक उत्पादन आणि गोड चव ही या द्राक्षाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात. शिवाय साखर-ॲसिडचे उत्तम संतुलन, मोठा व टिकाऊ घड, चांगली मणी धारण क्षमता, कमी उत्पादन खर्चात येणारा आणि निर्यातीसाठी सर्वोत्तम असलेला हा वाण राज्यातील द्राक्ष उत्पादकांना फायदेशीरच ठरणार आहे.

‘सह्याद्री फार्म’च्या माध्यमातून हिरव्या द्राक्षांमध्ये आरा १५, ३०, ८ ए-१९+४, लाल रंगाच्या द्राक्षांमध्ये आरा १३, १९, २८, २९ आणि काळा रंगाच्या द्राक्षांत आरा २७, ३२, ए-१४ हे वाण राज्यातील द्राक्ष उत्पादकांना उपलब्ध होणार आहेत. ‘आरा’ची राज्यात लागवड आणि उत्पादनाच्या यशातील मुख्य मुद्दा हा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एक ताकद निर्माण केली. त्यामुळे जागतिक ब्रीडिंग कंपन्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे.

Arra Grape
Grape Farming : प्रयोगशील शेतीतून निर्माण केले वैभव

हे केवळ शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून साध्य झाले. जागतिक पातळीवरील ब्रीडिंग कंपन्यांना व्यवहार करण्यासाठीचा फ्लॅटफॉर्म सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून निर्माण झाला. त्यामुळेच बाहेरच्या द्राक्ष जाती भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला. अर्थात, जे काम एकट्या-दुकट्या शेतकऱ्यालाच काय तर सरकारला देखील शक्य नव्हते ते काम शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून साध्य झाले.

यावरून शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ देशात किती महत्त्वाची आहे, हे आपल्या लक्षात यायला हवे. पीक कोणतेही असो बदलत्या हवामानाच्या अनुषंगाने नवीन वाणांचे संशोधन असो की शेतीमाल विक्रीतील समस्या या वैयक्तिक शेतकरी आता सोडवू शकत नाही. त्यामुळे संशोधन संस्थांसह शासनाने या समस्या सोडविल्या पाहिजेत, असे आपण म्हणतो.

परंतु या दोन्ही पातळ्यांवर मागील अनेक वर्षांपासून काहीही होताना दिसत नाही. अशावेळी शेतकऱ्यांनी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एकत्रित येऊन संशोधनापासून ते मूल्यसाखळी विकासात गुंतवणूक करायला पाहिजेत.

असे झाल्यास कोणत्याही पिकांचे नवे वाणं शेतकऱ्यांना उपलब्ध होतील, विक्रीच्या पर्यायी व्यवस्था देखील उभ्या राहू शकतात, हे देखील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीने ‘आरा’ या द्राक्ष वाणाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. उत्पादक आणि प्रभावी तंत्रज्ञ (टेक्नोक्रॅट) यांनी हातात हात घालून काम केले तर देशातील शेतीचे चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com