Farmer Accident Insurance Scheme : छळ नको, दिलासा हवा

अपघातग्रस्त कुटुंबावर आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. अशावेळी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा अनुदान मिळताना छळ व्हायला नको, ही काळजी नव्या योजनेत घेतली गेली पाहिजे.
Farmer
FarmerAgrowon
Published on
Updated on

Farmer Accident Insurance Scheme : महाराष्ट्र राज्यात शेतकरी अपघात विमा योजना बंद करण्यात आली असून, त्याऐवजी आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना (Gopinath Munde Farmers Accident Security Grant Scheme) लागू करण्यात आली आहे.

राज्यात २००५-२००६ पासून ‘शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा’ योजना सुरू होती. २०१५ मध्ये या योजनेचे ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ असे नामकरण करण्यात आले होते.

नावात बदल केला तरी योजना अंमलबजावणीत काहीही बदल झाला नव्हता. पीकविम्यात नुकसान भरपाईच्या (Crop Insurance) कवित्वाबाबत राज्यातील शेतकरी चांगलेच अवगत आहेत.

पिकाचे नुकसान झाले तरी भरपाई देण्याबाबत यंत्रणेकडून होत असलेल्या टाळाटाळीचा शेतकऱ्यांना चांगला अनुभव आहे.

शेतकरी अपघात विमा योजनेची गत यापेक्षा काही वेगळी नव्हती. अपघातग्रस्त एका शेतकऱ्याच्या मुलाची अत्यंत बोलकी प्रतिक्रिया या योजनेबाबत बरेच काही सांगून जाते.

‘‘शेतकरी अपघात विमा आमच्या दुःखावर मीठ चोळणारी आहे. वडिलाच्या निधनाच्या दुःखातून आमचे कुटुंब अजून सावरलेले नाही. मात्र मागील दोन वर्षांपासून आमचा प्रस्ताव मंजूर केला जात नाही.

Farmer
Farmer Accident Insurance Schemes : शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत

मी कृषी खात्यात गेल्यावर ते म्हणतात, सल्लागार कंपनीशी संपर्क साधा. सल्लागार कंपनी सांगते, विमा कंपनीशी संपर्क साधा. विमा कंपनी फोन उचलत नाही. शासनाकडे तक्रार केल्यावर शासनाचे उत्तर आले, की कृषी विभागाशी संपर्क साधा.

माझ्यासारख्या शेकडो लोकांचा असा छळ सुरू आहे.’’ या एका प्रतिक्रियेतून शेतकरी अपघात विमा योजनेचे चरित्र स्पष्ट होते. यातून या योजनेला कोणीही वाली नव्हता हेच दिसून येते.

त्यामुळे त्यास कमी प्रतिसाद मिळाला. त्यातही दाखल प्रस्तावांपैकी बहुतांश प्रस्ताव पडूनच राहत होते. शेतकरी अपघात विमा योजनेत मलिदा मिळत नसल्याने योजना कृषी खात्याने कंपन्यांच्या भरवशावर सोपविली.

विमा कंपन्यांकडे एकतर मनुष्यबळ नाही, यंत्रणा नाही. त्यामुळे या योजनेचा त्यांनी बोजवारा उडविला. आता नव्या योजनेद्वारा तरी अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळावा, एवढीच अपेक्षा!

सध्या शेतकऱ्यांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी रस्ता-रेल्वे अपघात, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून, खून, उंचावरून पडून, सर्प-विंचू दंश, नक्षलवाद्यांकडून हत्या, जंगली जनावरांचे हल्ले, दंगल आदी कारणांने शेतकऱ्यांना मृत्यू झाला अथवा अपंगत्व आल्यास कुटुंबाला नव्या योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळू शकतो.

आधीच्या योजनेत अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाचा होणारा छळ कमी करून तत्काळ लाभ मिळून देणे हेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा हेतू आहे.

Farmer
Farmer Accident Insurance Scheme : शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना लागू

असे असले तरी नव्या योजनेची अंमलबजावणी कृषी विभागाकडेच आहे, त्यामुळे हा विभाग या योजनेकडे किती गंभीरतेने पाहतो, यावरून या योजनेचे भवितव्य ठरणार आहे.

नवी योजना प्रत्येक दिवशी २४ तासांसाठी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कधीही अपघात झाला तरी कुटुंबीय मदतीस पात्र ठरणार आहे.

शेतकरी कुटुंबात कोणाचाही अपघात झाला तर त्यासाठीच्या उपचाराचा खर्च कुटुंब प्रमुखाला करावा लागतो. मुळात आर्थिक अडचणीतील बहुतांश शेतकरी हा भार उचलू शकत नाहीत.

त्यामुळे नव्या अपघात योजनेची व्याप्ती शेतकऱ्यांबरोबर त्याचे संपूर्ण कुटुंब (आई-वडील, पत्नी-लेकरे) अशी वाढवायला हवी. अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची प्रक्रिया साधी, सोपी, सरळ ठेवायला पाहिजेत.

प्रस्ताव मंजुरी प्रक्रियेत कमीत कमी मानवी हस्तक्षेप असायला हवा. प्रस्ताव पाठवून योजनेच्या लाभाबाबत पाठपुरावा करताना शेतकरी कुटुंबाला मनस्ताप होणार नाही, हेही पाहायला हवे.

अपघातग्रस्त कुटुंबावर आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. अशावेळी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा अनुदान मिळताना छळ व्हायला नको, ही काळजी देखील घेतली गेली पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com