Food Security : देशावर अन्नसुरक्षेची टांगती तलवार का आहे?

गव्हाच्या उत्पादनात २०५० पर्यंत १९.३ टक्के तर २०८० पर्यंत ४० टक्के घट होण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी संसदेत सांगितले.
Food Security
Food SecurityAgrowon

Food Security : वातावरणातील बदलामुळे (Climate Change) (क्लायमेट चेंज) भविष्यकाळात देशातील गहू आणि तांदळाच्या उत्पादनात (Wheat Rice Production) जबर घट होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी नुकतेच संसदेत सांगितले.

गव्हाच्या उत्पादनात (Wheat Production) २०५० पर्यंत १९.३ टक्के घट होईल तर २०८० पर्यंत उत्पादन ४० टक्के घसरेल; सिंचनाची सुविधा असलेल्या भाताचे उत्पादन या कालावधीत अनुक्रमे ३.५ आणि ५ टक्क्यांनी कमी होईल, तर कोरडवाहू भाताच्या उत्पादनात (Paddy Production) मात्र अनुक्रमे २० आणि ४७ टक्के घट होईल, असा अंदाज कृषिमंत्र्यांनी व्यक्त केला.

देशातील शेतीवर वातावरणातील बदलाचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी देशभरात मूल्यांकन प्रकल्प राबविण्यात आला. त्याचे हे निष्कर्ष आहेत.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय शेतीला वारंवार वातावरणातील बदलाचा फटका बसू लागला आहे. भविष्यातील स्थिती आणखीनच गंभीर होण्याचा धोका या निष्कर्षांमुळे अधोरेखित झाला आहे.

गहू आणि भात ही पिके देशाच्या अन्नसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. मागच्या वर्षी गव्हाला उष्णतेच्या लाटांचा फटका बसला. तर यंदाही आधी उष्णतेच्या लाटा आणि नंतर गारपीट व अवकाळी पावसामुळे गव्हाला मोठा तडाखा बसला.

Food Security
Food Storage : एफसीआयकडे साठवण क्षमतेपेक्षा कमी धान्य साठा

दुसऱ्या बाजूला भाताच्या तुलनेत गव्हाची मागणी वाढत चालली आहे. देशात १९७० मध्ये गव्हाची मागणी २२० लाख टन, तर भाताची मागणी ४१५ लाख टन होती. पण आता हे चित्र बदलले आहे.

गेल्या वर्षी देशात पहिल्यांदाच गव्हाची मागणी ही भाताच्या मागणीपेक्षा अधिक राहिली. गव्हाला प्रामुख्याने उत्तर भारतातून जास्त मागणी असते तर भाताला पूर्व आणि दक्षिण भारतातून. जागतिकीकरणानंतर जीवनशैली बदलल्यामुळे गव्हाचे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले, तसेच उत्तर भारतात लोकसंख्यावाढीचा दर अधिक आहे.

त्यामुळे गव्हाच्या मागणीतील वाढीचा वार्षिक दर भातापेक्षा जास्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर गव्हाच्या उत्पादनातील संभाव्य घट चिंताजनक आहे. गव्हाचे उत्पादन वाढविण्यासाठी आधीच नैसर्गिक मर्यादा आहेत.

भाताप्रमाणे गहू तिन्ही हंगामात आणि सगळीकडे घेता येत नाही. गहू केवळ रब्बी हंगामातच होतो. तसेच गव्हासाठी थंडी आवश्यक असते. गव्हासाठी पोषक हवामान प्रामुख्याने उत्तर भारतातच आहे.

दक्षिणेकडील राज्यांत गव्हाचे पीक घेता येत नाही. गेल्या काही वर्षांत पावसाचे बदललेले वेळापत्रक, वाढते तापमान, पीकवाढीच्या अवस्थेत थंडीचे कमी झालेले प्रमाण आदी कारणांमुळे गहू पिकाला सातत्याने फटका बसत आहे.

Food Security
Food Storage Methods : अन्न साठवणीच्या आधुनिक पद्धती कशी असते?

हरितक्रांतीच्या काळात गहू आणि भाताच्या अधिक उत्पादनक्षम जाती उपलब्ध झाल्यामुळे या दोन पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे देशाच्या भूकेचा प्रश्न सुटला. परंतु आता मात्र असे कोणतेही ‘ब्रेक थ्रू़' संशोधन उपलब्ध नाही.

आता गरज आहे ती नवीन संकरित वाण विकसित करण्याची. परंतु या कामी सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी संसदेत सांगितले की वातावरणातील बदलाला तोंड देण्यासाठी हवामान अनुकूल शेती संशोधनावर सरकार भर देत आहे. परंतु या प्रयत्नांची गती आणि व्याप्ती अत्यंत तोकडी आहे.

बदलत्या ऋतुचक्रामुळे शेतीला बसणारा फटका जीवघेणा आहे. त्याला सरकारचा प्रतिसाद मात्र तोंडदेखला आहे.

वास्तविक ही आणीबाणीची स्थिती असल्याचे लक्षात घेऊन वातावरणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी कमी कालावधीत तयार होणारे, दुष्काळ आणि अतिवृष्टीमध्ये तग धरणारे, भारतातील हवामानाला पुरक असे पिकांचे वाण तातडीने विकसित करण्याची गरज आहे.

त्यासाठी धोरणात्मक पाठबळ, भरभक्कम निधी आणि राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. त्या आघाडीवरचे वास्तव असमाधानकारक असल्याने देशावर अन्नसुरक्षेची टांगती तलवार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com