Food Security : अन्नसुरक्षा की जीवनसुरक्षा

देशात अन्नसुरक्षेआधी आता प्रश्‍न शेतकऱ्यांच्या जीवनसुरक्षेचा निर्माण झाला आहे. शेतकरी जगला तर शेती टिकेल आणि शेती टिकली तरच पूर्ण अन्नसुरक्षाही लाभेल, हे लक्षात घेतले पाहिजे.
Food Security
Food SecurityAgrowon


शेतकऱ्यांना पिकवायचे कसे हे शिकवावे लागत नाही, तर त्यांना विकायचे कसे हे शिकवावे लागणार आहे, असे अलीकडच्या काळात शेती क्षेत्रातील जाणकारांकडून बोलले जात आहे. परंतु हे पूर्णसत्य आहे का नाही? याची कोणीही पडताळणी करताना दिसत नाही. विशेष म्हणजे अनेक प्रगत देशांच्या तुलनेत आपल्या बहुतांश पिकांची उत्पादकता चार ते पाच पटीने कमी आहे. डाळी, खाद्यतेल हे आपल्या आहारातील तृणधान्यानंतरचे दोन प्रमुख घटक. परंतु देशात गरजेएवढे यांचे उत्पादन होत नसल्याने हे दोन्ही घटक आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो. बदलती हवामान आणि जागतिक व्यापार परिस्थितीत अन्नधान्य (तृणधान्ये - भात, गहू आदी) स्वयंपूर्णतेसाठी देशातील शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असताना पिकांच्या उत्पादकता वाढीबाबत शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होतेय, ही बाब गंभीरच म्हणावी लागेल. महाराष्ट्रात भात, तूर आणि कापूस ही पिके वगळता इतर सर्वच पिकांच्या उत्पादकतेत सहा ते ३३ टक्क्यांपर्यंत घट होणार असल्याचे कृषी विभागाच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रतिकूल हवामानाचा फटका भात, तूर, कापसाला देखील मोठ्या प्रमाणात बसत असताना त्यांच्या उत्पादकतेत वाढीचा अंदाज कशाच्या आधारावर दाखविण्यात आला हे मात्र स्पष्टता नाही. देशपातळीवर डाळी, तेलबियांसह एकूणच शेतीमाल उत्पादनात घटीच्या अंदाजाने केंद्र सरकारला महागाई आणि अन्नसुरक्षेची चिंता लागलेली आहे.

देशात अन्नसुरक्षेआधी आता प्रश्न शेतकऱ्यांच्या जीवनसुरक्षेचा निर्माण झाला आहे. पिकांची कमी उत्पादकता आणि शेतीमालास मिळणाऱ्या कमी दराने शेती तोट्यात जात आहे. शेती तोट्यात जात असल्याने शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढतोय. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी जगला तर शेती टिकेल आणि शेती टिकली तर तो अन्नसुरक्षा लाभेल, हे शासन-प्रशासनाने लक्षात घेतले पाहिजे. शेतकऱ्यांनी मरण पत्करून देशातील जनतेचे पोट भरविले पाहिजे, ही मानसिकता आता बदलायला हवी. पीक उत्पादकता वाढीसाठी आपण हरितक्रांतीपासून प्रयत्न करतो. हरितक्रांती काळात आलेल्या यशानंतर मात्र यांत फारसे काही आपण साध्य करू शकलो नाही. पिकांची उत्पादकता वाढली म्हणजे देशाचे अन्नधान्य तसेच एकूणच शेतीमाल उत्पादनही वाढेल, हे करीत असताना शेतकऱ्यांचे उत्पन्नदेखील वाढले पाहिजे, ही काळजी घ्यावी लागेल. सध्या वाढत्या नैसर्गिक आपत्तीने पिकांची उत्पादकता घटत असली तरी पाणी, वीज, रस्ते या मूलभूत सुविधांसाठी शेतकऱ्यांना आजही झगडावे लागते. पीक उत्पादकता वाढीत दर्जेदार निविष्ठांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही.

Food Security
Food Security : फुकटच्या धान्यातून कोणाची अन्नसुरक्षा?

परंतु महाराष्ट्रासह देशभर बियाणे, रासायनिक खते, कीडनाशके यांच्या पुरवठ्यात जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला जातो. निविष्ठांची लिंकिंग आणि त्यातील भेसळीने जगभरातील शेतकरी त्रस्त आहेत. शेतीला मूलभूत सुविधा आणि दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा झाला तरी सध्याच्या पीक उत्पादकतेत दुपटीने वाढ होऊ शकते. जागतिक पातळीवर उत्पादकतावाढीबरोबर पिकांचे पोषणमूल्यवाढीवर बरेच काम झाले. यात आपण मात्र खूपच मागे आहोत. बदलत्या हवामानास पूरक तसेच पोषणमूल्यवृद्धीसाठी जीएम वाणांची गरज असल्याचे यातील जाणकार सांगत आहेत. परंतु याबाबत धोरणात्मक निर्णयच होत नसल्याने जीएम वाणांच्या संशोधनात आपण खूप मागे पडलो आहोत. शेतीत अत्याधुनिक यंत्र-तंत्राचा वापर आणि काटेकोर नियोजनाने देखील जोखीम

कमी करून उत्पादकता वाढविता येते. पिकांची उत्पादकता आणि शेतीचे उत्पादन वाढल्यानंतर शेतीमालास रास्त दरही मिळायला हवा. शेतीमाल विक्रीतील लूटही थांबली पाहिजेत. निविष्ठांचे दर नियंत्रित पाहिजेत. अशा काही उपायांनी शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल, शेती किफायतशीर ठरेल आणि शेतकरी आत्महत्या कमी होतील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com