Impact of Loud Festival Music on Public Health: सण-उत्सव म्हणजे आनंदाची सामूहिक अभिव्यक्ती. माणसांना जोडणारी, समाजाला एकत्र आणणारी आणि परंपरेची वीण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणारी ती सांस्कृतिक व्यवस्था आहे. मात्र उत्सवाच्या आनंदाचे ‘डेसिबल’मध्ये काटेकोर मोजमाप करण्याची वेळ आता आली आहे. गणेशोत्सव असो, नवरात्र असो, ईद- ए- मिलाद असो, जयंती-मिरवणूक असो किंवा गावातील यात्रा, लग्न अथवा वाढदिवस; डॉल्बी, डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिवर्धकांशिवाय उत्सवच पूर्ण होत नाही, अशी विचित्र समजूत समाजात रुजली आहे. .पुण्यात नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत विद्यानंद बापट या सर्वसामान्य नागरिकाने ध्वनिप्रदूषणाविरोधात निर्भीडपणे आवाज उठविला. तिथे तर्कशुद्धतेबाबत बहिरेपण धारण केलेल्यांनी बहुमताच्या बडग्याखाली तो दडपण्याचाही प्रयत्न केला. परंतु, त्यांचा आवाज उत्सवी गोंगाटात दाबल्या गेलेल्या असंख्य नागरिकांचा आक्रोश म्हणून आता पुढे आला आहे. त्यांच्या भूमिकेला समाज माध्यमांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात काही नागरिक ‘डीजे’मुक्तीच्या मागणीसाठी थेट रस्त्यावरही उतरले..ध्वनी आणि ध्वनिप्रदूषण यातला फरक आपण सोईस्कररीत्या विसरलो आहोत. ढोलताश्यांना आपल्या उत्सवांच्या परंपरेत स्थान आहे. लेझीम, झांज आणि इतर लोकवाद्यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा समृद्ध केली आहे. ही परंपरा बंद करण्याचा प्रश्नच नाही; पण तिच्या नावाखाली कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाला नक्कीच पायबंद घातला पाहिजे. ‘आपला आवाज त्यांच्यापेक्षा मोठा हवा’ हे उत्सवाचे मोजमाप बनले, की संस्कृती मागे पडते आणि शक्तिप्रदर्शन बाह्या सरसावत पुढे येते. उत्सवातील भक्ती, आनंद आणि कलाविष्काराला हजारो वॅटच्या ध्वनिवर्धकांची गरज नसते..शहरांत तरी पोलिस, न्यायालयीन आदेश, ध्वनिमापक यंत्रे आणि नागरिकांच्या तक्रारींचा काही अंशी दबाव असतो. ग्रामीण भागात परिस्थिती अधिक गंभीर आहे. यात्रा, उरूस, जयंती, लग्न, वाढदिवस, राजकीय कार्यक्रम आणि मिरवणुकीत रात्री उशिरापर्यंत डीजेचा दणदणाट सुरू राहतो. गावात कुणी आजारी माणूस असेल, वृद्धांना विश्रांती हवी असेल, विद्यार्थ्यांची परीक्षा असेल, लहान बाळ असेल किंवा दुसऱ्या दिवशी पहाटे शेतात जाणारा शेतकरी असेल, याचा विचारच होत नाही. उत्सव चार तासांचा असतो; पण त्याचा आवाज संपूर्ण गावाला सक्तीने ऐकावा लागतो..हा केवळ ‘त्रासाचा’ मुद्दा नाही; तो सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. दीर्घकाळ मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्यामुळे कानातील पेशींवर परिणाम होऊन श्रवणशक्ती कायमची कमी होऊ शकते. ध्वनिप्रदूषणाचे परिणाम कानांपुरते मर्यादित राहत नाहीत. रक्तदाबात वाढ व हृदयाचे ठोके जलद होणे, झोप भंग पावणे, ताणात वाढ, तसेच मुलांच्या अध्ययन क्षमतेवरील परिणामांशीही अतिरिक्त आवाजाचा संबंध असल्याचे संशोधन समोर आले आहे. आवाज निर्माण करणाऱ्याने त्याचा आनंद घ्यायचा आणि ज्याचा त्याच्याशी संबंध नाही त्यानेही तो निमूटपणे सहन करायचा, ही सक्ती कुठल्या संवेदनशील समाजाच्या व्याख्येत बसते?.यावर उपाय म्हणजे उत्सवांवर बंदी नक्कीच नव्हे. उलट उत्सव अधिक सांस्कृतिक, कलात्मक आणि लोकाभिमुख करण्याची ही संधी आहे. मंडळांनी स्वतःहून ध्वनिमर्यादा पाळावी, ध्वनिवर्धकांच्या वापराची वेळ काटेकोर ठेवावी आणि रुग्णालये, शाळा तसेच निवासी परिसरांबाबत विशेष संवेदनशीलता दाखवावी..प्रशासनानेही नियमांवरील धूळ झटकून याबाबत सर्व मंडळे, धर्म, पक्ष आणि संघटनांना समान निकष लावले पाहिजेत. कायद्याच्या बडग्यापेक्षा सामाजिक स्वयंशिस्त नक्कीच अधिक परिणामकारक ठरेल. देवाला साद घालण्यासाठी कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाची गरज नसते आणि आनंद व्यक्त करण्यासाठी शेजाऱ्याची शांतता हिरावून घेण्याचाही अधिकार कुणाला नाही. उत्सव जरूर दिमाखात साजरा करूयात, पण तो दिमाख संस्कृतीचा असावा, डॉल्बीच्या भिंतींचा नव्हे!.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.