FAO Smart Farming Conference: संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) ‘स्मार्ट फार्मिंग’ विषयाला वाहिलेल्या पहिल्यावहिल्या जागतिक परिषदेचे सूप नुकतेच इटलीतील रोम येथे वाजले. जागतिक अन्नव्यवस्थेला बळकटी देण्याकरिता कृषिक्षेत्रात विदा (डेटा) आणि तंत्रज्ञान यांचा अवलंब कसा करावा, याचा ऊहापोह या परिषदेत करण्यात आला. त्यासाठी या क्षेत्रातील दिग्गज शास्त्रज्ञ मंडळी येथे जमा झाली होती. त्यांच्या मुखातून अनेक गुरुमंत्रांचा गजर या तीनदिवसीय मंथनात्मक कार्यक्रमात झाला. त्यांची दखल भारतीय कृषिविश्वाने घेणे क्रमप्राप्त ठरते..भविष्याला खुणावणाऱ्या तंत्रज्ञानाधारित शेतीचे कल्पनाचित्र या परिषदेत उलगडून दाखविण्यात आले. आपल्याकडे ते वास्तवात आणण्याची निकड यासाठी, की भारतीय अर्थव्यवस्थेचा तब्बल १८ टक्क्यांचा डोलारा अद्यापही शेतीक्षेत्रानेच तोलून धरला आहे. सुमारे ४६ टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. सरासरी जमीनधारणा क्षेत्र सुमारे १.०८ हेक्टर इतके मर्यादित आहे..Farmer Producer Company: स्वप्नांची कंपनी, अपूर्ण प्रयोग.अल्प भूधारक अथवा सीमांत शेतकऱ्यांचे प्रमाण तब्बल ८६ इतके भलेथोरले आहे. सिंचितक्षेत्राचे प्रमाण अद्यापही ५२ टक्क्यांवरच अडकलेले आहे. अशा अडथळ्यांची पार्श्वभूमी असूनही आपण मागील वर्षी विक्रमी ३५० दशलक्ष टनांहून अधिक अन्नधान्य उत्पादन घेतले आहे. त्यात काढणीपश्चात नुकसानीचे प्रमाण सुमारे एक लाख कोटी रुपये किमतीचे होते. खतांचा सरासरी वापर प्रति हेक्टरी १७० किलोग्रॅम इतका आहे. त्यांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचा पोत बिघडण्याच्या समस्येने चिंताजनक रूप धारण केले आहे..तब्बल ३० टक्के शेतजमिनीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. तसेच देशातल्या नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या पाण्यापैकी एकूण ७० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. त्यातही भूजलाचा उपसा करणाऱ्या देशांत भारताचा क्रमांक सगळ्यात वरचा आहे. आपली पीक उत्पादकता विकसित देशांच्या तुलनेने दुपटी-तिपटीने कमी आहे. हा गोषवारा इथे मांडण्याचे कारण असे, की या सर्व प्रश्नांवरील उत्तरांचा ऊहापोह या परिषदेत विस्ताराने झाला..मर्यादित जमिनीतून अधिक उत्पादन, अचूक पाणी व्यवस्थापन, खते-कीडनाशकांचा संतुलित वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राच्या माध्यमातून पीकरोगांचा लवकर छडा लावणे, हवामानाधारित निर्णयक्षमतेत सुधारणा, पुरवठासाखळीत सुधारणा करून काढणीपश्चात नुकसान कमी करणे, शेतकऱ्यांना वित्तपुरवठ्याच्या संधींमध्ये सुलभता आणणे, दुर्गम आणि ग्रामीण भागांसाठी लहान व शाश्वत मशिन लर्निंग अशा क्षेत्रांच्या अनुषंगाने या परिषदेच्या माध्यमातून अनेक आशेचे किरण चमकले आहेत..Smart Farming: ‘स्मार्ट फार्मिंग’ पर्याय नसून काळाची गरज .त्यांच्या प्रकाशात आपल्या वाटा उजळवून घेणे, ही काळाची गरज आहे. शेतीमधील एआय तंत्राचा वापर यापुढील काळात अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बारामती येथील एआय आधारित काटेकोर ऊस शेतीचा प्रकल्प एफएओच्या या जागतिक व्यासपीठावर नावाजला गेला. या प्रकल्पातील निष्कर्ष जागतिक पातळीवर चाललेल्या संशोधनाचा विचार करता अधिक सरस ठरल्याची पावती जाणकारांनी दिली..तंत्रज्ञान हाच आगामी काळातील कळीचा मुद्दा ठरणार आहे. तंत्रज्ञानाच्या स्पर्शाने शेतीच्या प्रत्येक अंगाने स्वतःला पावन करून घेतले पाहिजे. भारतीय शेतीला दुर्दैवाच्या दशावतारांतून बाहेर काढण्याची क्षमता पूर्णांशाने नसली, तरी महत्त्वपूर्ण प्रमाणात तंत्रज्ञानात नक्कीच आहे. कारण एक देश म्हणून आपण अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता नक्कीच गाठली..पण शेतकऱ्याच्या उत्पन्नाला पडलेली ठिगळे मात्र उत्पादन स्वयंपूर्णतेच्या भरजरी वस्त्राआड लपता लपत नाहीत. कमी उत्पादकता, आक्रसलेले जमीनधारणाक्षेत्र, हवामानबदलाचे सावट, निविष्ठांचा अकार्यक्षम वापर आणि तंत्रज्ञानाबाबतची उदासीनता अशी आव्हाने आपल्यासमोर फणा काढून उभी आहेत. उत्पादकतेत सुधारणा आणि सद्यःकालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्याची लवचिकता यांची कास धरल्यास भविष्यातील प्रगतीचा मार्ग सुकर होईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.