Technology: तंत्रज्ञान वापरात सर्वांचे हित

देशातील काही निविष्ठा उत्पादक कंपन्यांनी ऑनलाइन विक्री (Online Sell) सेवा वाढविल्या आहेत. त्यामुळे राज्यातील काही निविष्ठा विक्रेते संतप्त झाले आहेत.
Technology
TechnologyAgrowon

निविष्ठांच्या ऑनलाइन विक्रीला विरोध करून चालणार नाही, तर या नव्या व्यवस्थेत आपण काय सेवा देऊ शकतो, असा विचार निविष्ठा विक्रेत्यांनी करायला हवा. देशातील काही निविष्ठा उत्पादक कंपन्यांनी ऑनलाइन विक्री (Online Sell) सेवा वाढविल्या आहेत. त्यामुळे राज्यातील काही निविष्ठा विक्रेते संतप्त झाले आहेत. निविष्ठांची ऑनलाइन विक्री थांबविण्याबाबत २० ऑगस्टपूर्वी कंपन्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आम्ही गावपातळीवरील विक्री बंद करू, असा इशारा विक्रेत्यांच्या राष्ट्रीय संघटनेने दिला आहे.

विक्रेत्यांच्या संघटनेची अशी भूमिका चुकीचे असल्याचे कंपन्यांना वाटते. खरे तर आता प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत ऑनलाइन खरेदी-विक्रीचा जमाना आहे. ही उत्पादक आणि ग्राहक अशा दोन्ही घटकांची गरज सुद्धा आहे. या नव्या व्यवस्थेत आपण काय सेवा देऊ शकतो, असा विचार निविष्ठा विक्रेत्यांनी आता करायला हवा. ऑनलाइन विक्रीत मध्यस्थ वगळले जाणार असल्याने शेतकऱ्यांना थोड्या स्वस्तात निविष्ठा मिळू शकतात. सध्या निविष्ठांचे दर वाढत असताना त्या थोड्या स्वस्तात मिळू लागल्या तर तो शेतकऱ्यांना थोडाफार दिलासाच ठरेल.

विक्रेते निविष्ठा विक्री करताना कोणत्या निविष्ठा कधी, कशा वापरायच्या याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, हे खरे आहे. परंतु त्याचवेळी अनेक विक्रेते त्यांच्याकडे ज्या निविष्ठा उपलब्ध आहेत, अथवा कंपनीने ज्यावर अधिक नफ्याचे मार्जिन दिले तोच माल खपवतात, असेही आहे. रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वापरामध्ये शास्त्रीय शिफारस आणि विक्रेत्यांचा सल्ला यात अनेक वेळा तफावत दिसून येते.

ऑनलाइन विक्रीत नकली माल, भेसळ वाढू शकते, असा विक्रेते करीत असलेला दाव्यातही तथ्य वाटत नाही. कारण सध्याच्या ऑफलाइन निविष्ठा विक्रीतही नकली माल तसेच भेसळीचा सुळसुळाट आहेच ना! ऑनलाइन विक्री थेट कंपन्या करणार असून त्यात हाताळणीवर मर्यादा येत असल्याने भेसळ अथवा नकली मालाची शक्यता कमी दिसून येते.

खरेतर आता मानवाच्या विविध आजारांवरील औषधे ऑनलाइन मिळत असताना कृषी निविष्ठांच्या ऑनलाइन विक्रीत काहीच अडचण नाही. औषधी डॉक्टरांच्या सल्ल्याने (प्रिस्क्रिप्शन) दिली जात असली तरी काही औषधे रुग्ण मागवितो आणि ती त्याला मिळतात. निविष्ठांच्या बाबतीतही ज्याची शेतकऱ्यांना माहिती आहे, अशा निविष्ठा ते थेट ऑनलाइन मागू शकतात. यामध्ये रासायनिक खते नेमक्या कोणत्या पिकासाठी, आणि कीडनाशके नेमक्या कोणत्या कीड-रोगासाठी शेतकरी खरेदी करतोय याची खात्री कंपन्यांनी करायला हवी.

तसेच त्यांची नोंदही ठेवावी. शेतकऱ्यांनी सुद्धा रासायनिक खते आणि कीडनाशके यांची ऑनलाइन खरेदी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करायला हवीत. असे झाले तर उलट ऑफलाइन खरेदीत शेतकऱ्यांची होणारी दिशाभूल टळू शकते. कंपन्यांनी ऑनलाइन निविष्ठा विक्रीत निविष्ठांमध्ये भेदभाव करू नये. बियाणे, रासायनिक-सेंद्रिय खते-कीडनाशके अशा सर्व निविष्ठांची ऑनलाइन विक्री करायला हवी. काही कंपन्या एजंटकडून ऑनलाइन निविष्ठा विक्री करीत असतील तर त्यांनी नकली-दुय्यम दर्जाचा माल, तसेच त्यात भेसळ होणार नाही, ही काळजी घ्यायला हवी.

तसेच घरपोच निविष्ठा मिळतील, अशा सबबीपायी दर वाढणार नाहीत, हेही पाहावे. कीडनाशके ऑनलाइन विकताना ‘केंद्रीय कीटकनाशके बोर्ड’च्या (सीआयबी) परवानगीने आणि त्यांच्या नियमावलीनुसार म्हणजे पॅकींग-वाहतूक-हाताळणी याबाबतचे निकष पाळले जातील, हेही पाहावे. सध्या बऱ्याच वस्तु-उत्पादनांची खासकरून शहरांमध्ये ऑनलाइन विक्री होत असताना ऑफलाइन विक्रीवर थोडाफार परिणाम झाला असला तरी दुकानेही चालूच आहेत. कृषी निविष्ठांची गरज तर प्रामुख्याने ग्रामीण भागात अधिक आहे.

ग्रामीण भागात ऑनलाइन खरेदी-विक्रीत तर याबाबतच्या सोयीसुविधांपासून ते शेतकऱ्यांच्या मानसिकतेपर्यंत अनेक अडचणी आहेत. त्यामुळे काही कंपन्या ऑनलाइन निविष्ठा विक्रीत उतरल्या तर निविष्ठांची दुकाने बंद होतील, अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. तंत्रज्ञानाचा वापर सर्व क्षेत्रात होत असून त्याचा फायदाही त्या त्या क्षेत्राला झाला आहे. अशावेळी शेती-शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाच्या वापराला विरोध करणे योग्य नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com