Ethanol Production : इथेनॉलकरिता गोड ज्वारीचा वाढवा गोडवा

Jowar Cultivation : कोरडवाहू शेती किफायतशीर करून इंधनावर खर्च होणारे परकीय चलन वाचविण्यासाठी इथेनॉलकरिता गोड ज्वारी लागवडीला प्राधान्य द्यायला हवे.
Jowar Update
Jowar UpdateAgrowon
Published on
Updated on

Ethanol production Update : इथेनॉलच्या उत्पादनवाढीसाठी केंद्र सरकारने गोड ज्वारीची लागवड वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रीय साखर संस्थेने देखील यासाठी पुढाकार घेतला आहे. ऊस लागवड करताना उसाच्या दोन सरींमध्ये गोड ज्वारी आंतरपीक घेण्याबाबत उत्तर प्रदेशात प्रयोग देखील सुरू आहेत.

ऊस व गोड ज्वारीच्या एकत्रित शेतीतून ऊस उत्पादकांना चांगला नफा मिळू शकेल, असा आशावाद केंद्र सरकारला आहे. ऊस पिकाचा कालावधी १२ ते १४ महिन्यांचा असल्याने यात अनेक शेतकरी आंतरपिके घेतात. उसात घ्यावयाची आंतरपिके ही कमी कालावधीची तसेच कमी उंचीची असायला हवीत.

त्यामुळे सर्वसाधारणपणे हिरवळीची खते तसेच कोबी, कांदा, बटाटा अशी भाजीपाला पिके उसात आंतरपिके म्हणून घेतली जातात. गोड ज्वारी हे पीक चार महिने कालावधीचे असून बऱ्यापैकी उंच वाढते. त्यामुळे उसात आंतरपीक म्हणून हे पीक कितपत यशस्वी होतेय, हे पाहावे लागेल.

शिवाय इथेनॉल निर्मितीसाठी गोड ज्वारी घ्यायची असल्यास ते ऑक्टोबर ते एप्रिल या ऊस गळीत हंगामातच उपलब्ध झाले पाहिजेत. गोड धाटाची ज्वारी खरीप, उन्हाळी आणि रब्बी अशा तिन्ही हंगामात घेतली जात असली तरी हे पीक खरीप आणि उन्हाळी हंगामात चांगले येते.

इथेनॉलकरिता गोड ज्वारी आंतरपीक म्हणून घ्यायचे असेल तर खरिपात थोडे उशिरा आणि उन्हाळी हंगामात थोडे लवकर घ्यावे लागेल. असे केले तरच गळीत हंगामात इथेनॉलकरिता गोड ज्वारी उपलब्ध होईल.

गोड ज्वारीत इथेनॉलचे प्रमाण वाणनिहाय आठ ते अकरा टक्के असून प्रतिहेक्टर इथेनॉलची उत्पादकता दोन हजार लिटर आहे. ऊस (६५०० लिटर प्रतिहेक्टर) आणि शर्कराकंद (६००० लिटर प्रतिहेक्टर) यांच्या तुलनेत गोड ज्वारीची इथेनॉल उत्पादकता कमी आहे. परंतु गोड ज्वारी पिकाचा कालावधी कमी आहे.

Jowar Update
Ethanol Production : इथेनॅालवाढीसाठी उसात गोड ज्वारी घेण्याचे प्रयत्न

शिवाय पाणी, रासायनिक खते आदी निविष्ठा तसेच गोड ज्वारीचा उत्पादन खर्च ऊस, शर्कराकंदापेक्षा खूप कमी असल्याने हे पीक इथेनॉलसाठी किफायतशीर ठरू शकते. महत्त्वाचे म्हणजे गोड ज्वारी उसात आंतरपीक म्हणून घेतल्यास इथेनॉलचे बोनस उत्पादन पर्यायाने उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे.

उसात आंतरपीक म्हणूनच नव्हे तर इथेनॉल उत्पादनवाढीसाठी गोड ज्वारीच्या सलग लागवडीवरही भर द्यायला हवा. सध्या इंधनावर देशाचे मोठे परकीय चलन खर्च होत आहे. तर दुसरीकडे कोरडवाहू शेती तोट्याची ठरतेय. अशावेळी कोरडवाहू शेती किफायतशीर करून इंधनावर खर्च होणारे परकीय चलन वाचविण्यासाठी इथेनॉलकरिता गोड ज्वारी लागवडीला प्राधान्य द्यायला हवे.

गोड ज्वारीच्या धाटापासून रस काढल्यावर उरणारा चोथा हा गुरांसाठी दर्जेदार चारा म्हणून वापरता येईल. त्यामुळे राज्यातील चारा टंचाईची समस्या काही अंशी निकालात निघून दुग्धव्यवसायाला चालना मिळू शकते. गोड ज्वारीच्या रसापासून काकवीही तयार होते.

गोड ज्वारीचे धाटे रस काढण्यापूर्वी साफ करावे लागतात. हे काम श्रमप्रदान असल्यामुळे यातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढू शकतात. गोड ज्वारीचा एकदा रस काढल्यानंतर इथेनॉल बनविण्यासाठी कारखान्यांना फारशी वेगळी काही गुंतवणूक करावी लागत नाही.

भारतात अनेक संस्था मागील ४-५ दशकांपासून गोड ज्वारीवर प्रयोग करत आहेत. परंतु आत्तापर्यंत हे पीक व्यावसायिक लागवडीत का आले नाही? हा खरा प्रश्न आहे. पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रणासाठी सध्याच्या उत्पादनात दुपट्टीने वाढ करावी लागेल.

राज्यात उसापासून तसेच शेतीतील इतरही टाकाऊ पदार्थांपासून इथेनॉल निर्मितीला मर्यादा आहेत. अशावेळी गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मिती हा चांगला पर्याय आहे. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन वाढवून गोड ज्वारी लागवडीसाठी प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com