Drought Management Strategies: रशिया - युक्रेन तसेच आता अमेरिका-इस्राईल आणि इराण युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला बसत आहेत. व्यापार अथवा शुल्क युद्धाने देखील जागतिक बाजारपेठेवर मोठा विपरीत परिणाम केला आहे. या युद्धांबरोबर उन्हाच्या झळा देशवासीयांना तापदायक ठरत असतानाच आगामी मॉन्सूनमध्ये कमी पाऊस पडेल, असा अंदाज येऊन धडकला आहे.यंदाच्या मॉन्सूनवर ‘एल-निनो’चे सावट स्पष्ट होते, तसा अंदाज आंतरराष्ट्रीय संस्थांसह स्कायमेट या खासगी संस्थेने देखील व्यक्त केला होता. त्यालाच भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आपल्या दीर्घकालीन अंदाजाद्वारे पुष्टी मिळाली आहे..यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत देशाच्या सरासरीच्या (८७० मिलिमीटर) ९२ टक्के पावसाचा अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तविला आहे. देशात मागील सलग पाच ते सहा वर्षांपासून चांगला पाऊस पडत आहे. असे असताना देशाच्या अनेक भागांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे..Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट.कमी पाऊसमान काळात तर महाराष्ट्रासह देशभर तीव्र पाणीटंचाईच्या झळा शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य नागरीकांना बसतात. भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे आणि भारतीय शेती मॉन्सूनच्या पावसावर! शिवाय भारत हा काही प्रमुख शेतीमालाच्या बाबतीत अनेक देशांचा मोठा आयातदार तसेच निर्यातदार देश देखील आहे. त्यामुळे मॉन्सूनचा हा अंदाज भारताबरोबर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही..सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सर्वसाधारण मानला जातो. यंदा मात्र ६६ टक्के शक्यता ही या सरासरीपेक्षा कमी पावसाची आहे. त्यातही ३५ टक्के शक्यता ९० टक्क्यांहून कमी पावसाची आहे.महत्त्वाचे म्हणजे सध्याची स्थिती तटस्थ असून, जागतिक मॉडेलनुसार मॉन्सून हंगामात ‘एल-निनो’ स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. एल-निनो ही मॉन्सूनवर परिणाम करणारी प्रशांत महासागरावरील एक समुद्री व वातावरणीय प्रक्रिया आहे. असे असले तरी एल-निनो हा मॉन्सूनला ताब्यात ठेवणारा एकमेव नियंत्रक नाही..Solapur Water Crisis: उजनी धरणातील पाणीसाठा आला निम्म्यावर.इतर काही घटकही आहेत जे एल-निनोविरुद्ध आणि मॉन्सूनच्या वतीने कार्य करीत असतात. देशात यापूर्वी अनेकदा एल-निनो काळात चांगला पाऊस, तर ला-निनामध्ये कमी पाऊस झाला आहे. १९५१ ते २०२२ पर्यंतच्या नोंदीनुसार ४० टक्के ‘एल-निनो’ वर्षांत मॉन्सूनचा पाऊस सर्वसाधारण झाला आहे. पाऊस किती पडतो यापेक्षा पावसाचे असमान वितरण हा अधिक चिंतेचा विषय आहे..हवामान बदलाच्या काळात हे वितरण खूपच असमान होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एल-निनोमुळे कमी पाऊसमानाची चिंता करीत बसण्यापेक्षा पाणीटंचाईचा सामना नेमका कसा करायचा यावर चिंतन होणे गरजेचे आहे. पूर्व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ हा दुष्काळी पट्टा आहे. नेमका या भागात कमी पाऊस झाला तर दुष्काळाच्या झळा वाढणार आहेत..या सर्व बाबी विचारात घेता पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे योग्य नियोजन सर्वांनाच करावे लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना कमी पाऊसमानावर चिंता व्यक्त करीत पिण्यासाठी पाणी राखून ठेवणार, जलयुक्त शिवार, जलसंधारण योजना तसेच वैरण विकास कार्यक्रम राबविणार असल्याचे स्पष्ट केले. संभाव्य दुष्काळ अथवा पाणीटंचाईचा सामना करताना त्रोटक नाही तर माथा ते पायथा जल संवर्धन, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर तसेच पीक पद्धतीत आवश्यक बदल असे एकत्रित उपाय करावे लागतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.