El Nino impact on Indian Monsoon: देशातील खरीप पेरण्यांनी दहा कोटी हेक्टरचा टप्पा ओलांडला आणि जुलैच्या सुरुवातीला २१ टक्क्यांपर्यंत असलेली पेरणीतील तूट एक टक्क्याच्या आत आली, या बातमीने दिलासा वाटण्यासारखी आजची परिस्थिती नाही. कारण देशातील मॉन्सूनची तूट १६ ऑगस्टपर्यंत १३ टक्क्यांवर पोहोचली असून, ‘एल निनो’चा प्रभाव वाढत गेल्यास सप्टेंबरमध्ये ही तूट आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही पार्श्वभूमी माहिती असूनही केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी (ता. १८) या बदलत चाललेल्या वातावरणाचा खरीप उत्पादनावर परिणाम होणार नाही, असे सांगितले. .असे करून सरकारने शेतकऱ्यांना खोट्या भ्रमात ठेवू नये. केवळ पेरणी झाली म्हणजे खरीप सुरक्षित झाला, असा त्यांचा निष्कर्ष कुठल्या राजकीय अपरिहार्यतेतून आला, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक! पण आता खरी कसोटी पिके जगविण्याची, उत्पादकता टिकविण्याची आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण कोसळू न देण्याची आहे. शेतीच्या पुढ्यातील प्रश्नांचा हा तिढा सोडविण्यासाठी सरकारने संवेदनशीलतेने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे..El Nino Challenges: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतीसमोरील आव्हाने.‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट्स’च्या अंदाजानुसार सध्याचा पावसाचा सक्रिय टप्पा ऑगस्टअखेरीस ओसरण्याची शक्यता आहे. ‘एल निनो’चा प्रभाव वाढल्याने सप्टेंबरमध्येही पावसाचा जोर कमी राहू शकतो. ‘स्कायमेट’ने यंदाचा मॉन्सून दीर्घकालीन सरासरीच्या ८५ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहण्याचा अंदाज देत ७० टक्के दुष्काळाची शक्यता वर्तविली आहे. अमेरिकेच्या ‘क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर’ने तर २०२६-२७ च्या हिवाळ्यात ‘एल निनो’ अत्यंत तीव्र होण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक असल्याचे म्हटले आहे..हे इशारे दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. देशातील ६,३६३ तहसील विभागांपैकी ४५ टक्क्यांहून अधिक तहसील सध्या पाऊसतूट अनुभवत आहेत. पूर्व आणि ईशान्य भारतात २७ टक्के, दक्षिण द्वीपकल्पात २१ टक्के आणि वायव्य भारतात १२ टक्के पावसाची तूट आहे. भाताचे क्षेत्र ३.७ टक्के, तर भरडधान्यांचे क्षेत्र २.४ टक्क्यांनी कमी आहे. अशा स्थिती असताना देखील केवळ एकूण पेरणी क्षेत्राच्या आकड्याने समाधान मानून घेणे धोकादायक ठरेल..Indian Monsoon: मॉन्सूनचा चांगला काळ संपला; तूट वाढणार.मॉन्सूनचा खंड हा पिकासाठी केवळ कमी पावसाची अवस्था नसते. त्याचा थेट पिकावर परिणाम होतो आणि हेक्टरी उत्पादकता घसरते. आधीच जुलैमध्ये देशात प्रमुख खतांची विक्री १३ टक्क्यांनी घटल्याचे चित्र आहे. पावसाची अनिश्चितता अशीच कायम राहिली, तर शेतकरी खत, कीडनाशके किंवा संरक्षित सिंचनावर खर्च करण्याबाबत हात आखडता घेऊ शकतो. परिणामी उत्पादनातील घट ही पेरणी क्षेत्रातील घटीपेक्षा अधिक गंभीर ठरू शकते. याचा दुसरा फटका शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला बसेल..बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि मशागतीचा खर्च शेतकऱ्याने आधीच केलेला आहे. आता पिके वाचविण्यासाठी विहीर, बोअरवेल किंवा उपलब्ध जलस्रोतांतून अतिरिक्त सिंचन करावे लागल्यास खर्च आणखी वाढेल. उत्पादन घटले आणि बाजारपेठेकडून त्याची भरपाई झाली नाही, तर शेतकऱ्याचे उत्पन्नही घसरेल. कर्जफेड, रब्बीसाठी भांडवल आणि कौटुंबिक खर्च या तिन्ही आघाड्यांवर त्याचा परिणाम जाणवेल..म्हणूनच सरकारने आताच सक्रिय होण्याची गरज आहे. पावसाची तूट असलेल्या तहसील विभागांचे गावनिहाय निरीक्षण, वाढीच्या अवस्थेनुसार आकस्मिक पीक नियोजन, संरक्षित सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन आणि शेतकऱ्यांना तातडीची कृषी सल्लाव्यवस्था व आर्थिक मदत अशा पातळ्यांवर प्रशासकीय उपाययोजना आखल्या जाव्यात. मॉन्सूनचे उरलेले काही आठवडे खरिपाचे भवितव्य ठरविणार आहेत. नैसर्गिक आपत्ती थांबविणे सरकारच्या हातात नसले तरी त्याची झळ कमी करण्यासाठी प्रयत्न करणे नक्की त्याच्याच हातात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.