Climate Change and El Nino Impact on Agriculture: ‘एल निनो’ आता केवळ हवामानशास्त्राचा विषय राहिलेला नाही; तर शेती, अन्नसुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता अधोरेखित झाली आहे. जागतिक हवामान संघटनेने २०२६ मध्ये एल निनो झपाट्याने तीव्र होत असून, २०२७ च्या फेब्रुवारीपर्यंत तो टिकण्याचा इशारा दिला आहे. .अतिवृष्टी, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक अन्नसुरक्षेचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. आफ्रिका, आशिया-पॅसिफिक आणि लॅटिन अमेरिका-कॅरिबियनमध्ये लाखो लोकांच्या शेती आणि अन्नसुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा अन्न व कृषी संघटना (एफएओ) आणि विश्व अन्न कार्यक्रम (डब्ल्यूएफपी) या संस्थांनी दिला आहे..जागतिक पातळीवर या संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र काही अंशी बदलत असल्याचे जाणवत आहे. आपत्ती आल्यानंतर मदत करण्याऐवजी आपत्ती येण्यापूर्वी कृती करण्याच्या ‘Anticipatory Action’ पद्धतीकडे जग वळत आहे. एफएओ आणि डब्ल्यूएफपीने २२ उच्च जोखीम देशांतील ८८ लाख लोकांचे जीवन, उपजीविका आणि अन्नसुरक्षा सुरक्षित करण्यासाठी २०२ दशलक्ष डॉलर्सचा संयुक्त निधी उभारण्याचे आवाहन केले आहे..Rain Deficit: पुढ्यातील तिढा.पिके नष्ट झाल्यानंतर मदत करण्याऐवजी हवामानाचा अंदाज, पीकस्थिती आणि जोखीम लक्षात घेऊन आधीच बियाणे, चारा, पाणी, रोख मदत आणि इतर साधने उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. आफ्रिकेतील इथिओपिया, केनिया, सोमालिया, दक्षिण सुदान, झिम्बाब्वे, मोझांबिक, मादागास्कर यांच्यासह अफगाणिस्तान, पाकिस्तान, फिलिपिन्स, तिमोर-लेस्ते आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांना प्राधान्य देण्यात आले आहे..एफएओने उपग्रह आणि हवामानविषयक आकडेवारीच्या आधारे कृषी दुष्काळाचा धोका असलेले प्रदेश निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पशुधनाचे संरक्षण, चारा व पाणी, बियाणे, सिंचन, रोख मदत आणि स्थानिक अन्नव्यवस्था सुरक्षित करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत..El Nino Impact: 'एल निनो'चं सावट; 'निलगिरी'तील चहाच्या मळ्यांना तीव्र दुष्काळाचा फटका, उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट? .भारतासाठी या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यंदाच्या मॉन्सूनमध्ये पावसाचे असमान वितरण, दीर्घ खंड आणि वाढते तापमान यामुळे खरीप पिके अडचणीत आले आहेत. यंदा जूनमध्ये पाऊस ३५ टक्क्यांनी कमी झाला, ऑगस्टमध्येही पावसाची कमतरता राहिली आणि सप्टेंबरमधील पावसाबाबतही चिंता कायम आहे. कापूस, सोयाबीन, मका, भात, ऊस या पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो..सप्टेंबरमधील जमिनीतील ओलावा कमी राहिला, तर गहू, हरभरा, मोहरी यांसारख्या रब्बी पिकांच्या पेरणीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. एकंदर अन्नधान्य, डाळी, खाद्यतेल, साखर आणि पशुखाद्याच्या उपलब्धतेवर परिणाम होऊन आयातीचे प्रमाण वाढू शकते. जागतिक बाजारातही त्याचे पडसाद उमटतील. या पार्श्वभूमीवर भारताने अन्नसुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्याची आवश्यकता आहे..त्या दृष्टीने देशात आधी प्रदेशनिहाय अन्नसुरक्षा आराखडा तयार करण्याची गरज आहे. शेतकऱ्याच्या पातळीवरही पिकांची व वाणाची निवड आणि शेती पद्धती यासंदर्भात फेरविचार करावा लागेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अन्नसुरक्षेचा प्रश्न सोडवायचा असेल तर शेतकऱ्यांना सक्षम आणि भक्कम करावे लागेल..ग्राहकाला स्वस्त अन्न मिळावे म्हणून आयात वाढवून देशात शेतीमालाचे भाव पाडणे आणि त्याचवेळी आत्मनिर्भरतेची भाषा करणे, ही विसंगती ठरेल. अन्नसुरक्षेच्या प्रश्नावर जागतिक पातळीवर मोठी घुसळण सुरू आहे. तिमोर-लेस्तेसारख्या देशांनी एल निनोच्या संकटात राष्ट्रीय धान्यसाठा वाढवणे, अन्नाची पूर्वसाठवण आणि शेतकऱ्यांसाठी पाणी व शेतीविषयक उपाययोजना यांना प्राधान्य दिले, असे ‘डब्ल्यूएफपी’ने नमूद केले आहे. भारताने यापासून धडा घेऊन भविष्यवेधी रणनीती आखली पाहिजे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन ही पूर्वअट आहे, याचा विसर पडता कामा नये..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.