Farmers Advised: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक पद्धतीविषयी अचूक आणि व्यवहार्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे. .भारतीय हवामानशास्त्र विभागाने मे महिन्याचा अंदाज नुकताच जाहीर केला. त्यानुसार महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक उष्ण लाटांची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढणार आहे. सर्वांत जास्त उत्सुकता आहे ती एल निनोबद्दल. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सध्या तटस्थ (एन्सो न्यूट्रल) पातळीवर आहे. मॉन्सून मिशन प्रारूपानुसार मॉन्सून हंगामात एल निनो स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत..Farmers Demand: लोखंडी बैलगाडीला ७० टक्के अनुदान देण्याची मागणी.हवामान विभागाच्या १३ एप्रिल रोजीच्या पहिल्या अंदाजात एल निनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अवतरेल असे म्हटले होते. पण अनेक जागतिक हवामान माॅडेल्सनी एल निनोचे आगमन यापेक्षा लवकर होण्याची शक्यता वर्तविली आहे. एल निनोबद्दल स्पष्टता येण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. परंतु सध्याच्या प्राथमिक अंदाजानुसार एल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पाऊसमान कमी राहील. जूनमध्ये मॉन्सून वेळेवर येईल, असे संकेत मिळत आहेत. जूनमध्ये चांगला पाऊस झाला, तर शेतकऱ्यांचा एल निनोच्या अंदाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलेल. .शेतकरी काहीसे निर्धास्त होतील आणि एल निनोचा अंदाज खोटा ठरेल, अशी शक्यता त्यांना मनोमन वाटत राहील. पिकांची निवड आणि उत्पादकतावाढीसाठी खर्च या दोन मुद्यांच्या बाबतीत त्यांची निर्णयप्रक्रिया बदलेल. पण हा गाफीलपणा ठरेल. सुरुवातीला पावसाने चांगली वर्दी दिल्यानंतर हंगामाच्या उत्तरार्धात एल निनोचे आगमन झाले, तर शेतकऱ्यांची मोठी गोची होईल. थोडक्यात, ढोबळ चित्र पाहता मागील दोन वर्षांप्रमाणे यंदा पाऊसकाळ राहणार नाही, हे जवळपास स्पष्ट झालेले आहे. .Climate Change Agriculture: बदलत्या हवामानाला अनुसरून नव्या संशोधनाची गरज.तसेच पावसाचे वितरण कसे राहते, हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. पावसाने सरासरी भरली, परंतु वितरण असमान असेल तर शेतीला त्याचा मोठा फटका बसतो. ऐन पेरणीच्या वेळी पावसाने दडी मारली आणि पीक काढणीच्या वेळी पावसाने धुमाकूळ घातला, की शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, याचा अनुभव आपण गेल्या काही वर्षांत वारंवार घेतलेला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये एल निनो आला होता, तेव्हा हवामान विभागाने ९६ टक्के पावसाचा अंदाज दिला होता. पण प्रत्यक्ष माॅन्सून हंगामात ९४ टक्के पाऊस पडला होता. आणि पावसाचे वितरण खूपच असमान होते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत पावसात खंड पडला होता..या पार्श्वभूमीवर यंदाही एल निनोचे सावट असल्यामुळे शेतकऱ्यांची आणि कृषी विभागाची कसोटी लागणार आहे. शेतकऱ्यांनी यंदा कमी खर्चाच्या, कमी कालावधीच्या, पावसाचा ताण सहन करणाऱ्या पिकांना पसंती देणे योग्य ठरेल. चाऱ्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता चारापिकांची लागवड वाढवावी लागेल. जल व मृदा संधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याची निकड आहे. कृषी विभागाने यंदा शेतकऱ्यांनी कोणती पीक पद्धती निवडावी यासाठी प्रदेशनिहाय सल्ला देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. .त्यासाठी कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांची मदत घेणे क्रमप्राप्त आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एल निनोबद्दल जनजागृती करण्याचे आदेश दिल्यामुळे कृषी विभागाची यंत्रणा कागदावर तरी सक्रिय झाल्याचे दिसत आहे. परंतु ही यंत्रणा एल निनोला सामोरे जाण्यासाठी जो शेतीसल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे, त्याच्या गुणवत्तेविषयी शंका उत्पन्न होत आहेत. एका ठरावीक साच्यातली माहिती कॉपी-पेस्ट केली जात आहे का, असा संशय घेण्यास वाव आहे. उदाहरणादाखल सातारा तालुक्यात शेतकऱ्यांना चक्क कापसाचे पीक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे अव्यवहार्य आणि अशास्त्रीय सल्ले दिले जात असतील, तर शेतकऱ्यांच्या लेखी त्यांची विश्वासार्हता उरणार नाही. त्यामुळे या आघाडीवर सरकारी यंत्रणेने अधिक गांभीर्याने आणि युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.