Indian Farmer : शेतकरी दसरा...

Dussehra Festival : आपल्या भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सव भरपूर आहेत. प्रत्येक सण आणि उत्सव आपण सर्व भारतीय आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतो. दसरा हा हिंदू धर्मीयाचा एक प्रमुख सण आणि शुभ दिवस समजला जातो.
Indian Farmer
Indian FarmerAgrowon
Published on
Updated on

अरुण चव्हाळ
Indian Agriculture : आपल्या भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सव भरपूर आहेत. प्रत्येक सण आणि उत्सव आपण सर्व भारतीय आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतो. दसरा हा हिंदू धर्मीयाचा एक प्रमुख सण आणि शुभ दिवस समजला जातो. वास्तविक सर्वच दिवस आणि सर्वकाळ शुभच असतो. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी तथा दसरा म्हणतात.

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो; समाप्ती नवमीला होते. अष्टमी व नवमीला दोन प्रकारची परडी भरली जाते. ओली परडी-ज्वारीची भाकरी, मुगाचे मिरचू, राळ्याचा भात, गवार-भेंडी भाजीने भरली जाते व सुकी परडी शिधा देऊन भरली जाते व पारणे फेडतात.

शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासूर इत्यादी राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला व नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले. दशमीला महिषासुराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला, म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करतात. आश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी आकाशात तारका दिसू लागताच ‘विजय’ नावाचा मुहूर्त असतो व त्यावेळी जे काम हाती घ्यावे त्यात यश मिळते; असे पुराणांत सांगितले आहे.

पुराणांचे संदर्भ आपण चिकित्सेने तपासायला हरकत नाही. चैत्री पाडवा (चैत्र शुद्ध प्रतिपदा), अक्षय तृतीया (वैशाख शुद्ध तृतीया ), विजयादशमी व दिवाळीचा पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा, अर्धा मुहूर्त) या हिंदूंच्या साडेतीन विशेष शुभ मुहूर्तातील हा एक आहे.

Indian Farmer
Indian Farmer : शेतकरी रस्त्यावर का उतरत नाहीत?

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘भक्ती वैराग्य ज्ञान याहीं पूजियली अंबा वो/सद्रूप चिद्रूप पाहुनी प्रसन्न जगदंबा वो/एकाजनार्दनी शरण मूळकदंबा वो/’, असे संत एकनाथांनी देवीचे वर्णन केले आहे. ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ आणि ‘आई राजा उदो उदो’ या जयघोषाने देवीची मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून जातात.

अनेक ठिकठिकाणी देवीच्या दुर्गा-सरस्वती-कालिका-चंडिका-शारदा यांसह विविध रूपांत स्थापना करून जागरण आणि गोंधळही घातले जातात. आराध्याची गाणी ऐकू येतात. त्या गाण्यांतील गोडवा कर्णमधुर आणि काळीज मधुरही असतो.

नवरात्र हा देवीचा उत्सव असतो. बुद्धी, शक्ती, अर्थ, मातृ, लक्ष्मी, दया, परोपकारी, सृजनशाली आणि संयमधारी अशा नऊ स्वरूपाचं आपण सर्वजण स्वागत करतो. आदिशक्तीला आपण वंदन करून, यशस्वी जीवनाची प्रार्थना करतो. ‘या देवी सर्वभूतेषू बुद्धीरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः,’ ही आराधना आश्वासक आहे. नवरात्रीच्या काळात आपण घटस्थापना प्रारंभीच केलेली असते.

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत घटाला ज्ञान आणि विज्ञान लागू आहे. शेतातील थोडीशी माती घेऊन, त्यात धान्य टाकून, त्यावर पाण्याने भरलेला मातीचा कलश ठेवतात. त्यातील धन कसे उगवते? यातून सृजनाची-मातीच्या पीकमातृत्वाची आणि येणाऱ्या पिकातून जगाच्या जीवनाची हमी, या गोष्टी आपल्याला अनुभवता येतात. हे कृषिशास्त्र आहे. या नवरात्र उत्सवात अन्नदान आणि कुमारी पूजन केले जाते. अन्नदानामुळे सहभोजन आणि सहानुभूती, तसेच कुमारी पूजन केल्यामुळे भारतीय समाज जीवनात येणाऱ्या नवीन मुलींना संस्कार आणि स्वागत अनुभवास येते. देवीच्यासमोर रिंगण नृत्य किंवा गरबा खेळतात.

याचा महिलांना शारीरिक आणि मानसिक लाभ होतो. नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान केल्या जातात. रंगांचा आणि सौंदर्य शक्तीचा मनोहारी संगम पाहायला मिळतो. मात्र हे चित्र असे असले तरी, दुसरीकडे गडचिरोलीच्या बाया उन्हात तळून, आहे त्या साड्यांत सकाळपासून-संध्याकाळपर्यंत सोयाबीन कापणी करत आहेत. या शेतकरीदुर्गांचा गौरव आपण केला पाहिजे. मी एका टोळीला माझ्या शेतात सोयाबीन कापताना फराळाचे पदार्थ आणि केळी दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघण्यासारखे होते.

Indian Farmer
Indian Farmer : कर्ता बनण्यासाठी मनाचे सॉफ्टवेअर

नवरात्रात देवीच्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपात असलेल्या शक्तीची उपासना केली जाते. या जोडीने महाकष्टकरी महिलांची जाणीव आपण ठेवूयात. अंबाजोगाईची योगेश्वरी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता, वणीची सप्तशृंगी, कोल्हापूरची अंबाबाई, बासरची श्री ज्ञान सरस्वती या ठिकाणी आणि इतरत्रही धार्मिक कार्यक्रमांचे आणि आरोग्य शिबिरे, गरजूंना मदत, मार्गदर्शन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.


नवरात्रोत्सवानंतर दसऱ्याच्या दिवशी शमीची किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करतात. शमी वृक्षाजवळच भूमीवर अपराजिता देवीची मूर्ती रेखाटून तिचीही पूजा करतात. रावणाचा वध करण्यासाठी रामाने याच दिवशी शमीचे पूजन करून प्रस्थान केले.


अर्जुनाने अज्ञातवास संपवून याच दिवशी शमीचे पूजन केले व आपली शस्त्रे पुन्हा हातात घेतली. हा विजयोत्सव असल्याने राजांनी आपल्या घोड्यांना सुशोभित अलंकार घालावेत, निराजन नावाचा विधी करावा, शस्त्रशास्त्रांचे पूजन करावे व विजयासाठी प्रस्थान करावे, असे सांगितले आहे. कौत्सास चौदा कोटी सुवर्णमुद्रा देण्यासाठी रघुराजाने कुबेरावर स्वारी केली. त्यामुळे भयग्रस्त होऊन कुबेराने याच दिवशी शमीच्या झाडावर सुवर्णवृष्टी केली.

आवश्यक तेवढे सोने रघुराजाने कौत्सास देऊन बाकीचे त्याने नागरिकांना वाटले‌‌, अशी कथा स्कंदपुराणात दिलेली आहे. या दिवशी सोने लुटण्याच्या प्रथेचा संबंध या कथेशी आहे. शेतकऱ्यांना इतरांनी न लुटता त्यांच्या शेतीमालाला रास्त भाव देणे, एवढे जरी या कथेवरून स्वीकारले तरी बेहत्तर!


भारतात सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. उत्तर भारतात आणि अनेक ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात. कुलू खोऱ्यातील लोक आपल्या रघुनाथ या देवतेचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी साजरा करतात. रघुनाथाची रथयात्रा, नृत्य आणि बलिदान इत्यादी विधी करतात. आपल्या महाराष्ट्रात या दिवशी सीमोल्लंघन करून आपट्याची पूजा करतात व त्याची पाने ‘सोने’ म्हणून परस्परांना देतात. ऐतिहासिक काळात या दिवशी सीमोल्लंघन करून मराठा सरदार नव्या मोहिमेवर निघत. आता एक मोहीम भरात आहे. म्हैसूर संस्थानचा दसरा उत्सव भारतात प्रसिद्ध आहे. आपल्या मराठी माणसांचे महाराष्ट्रातील दसरा मेळावे अस्तित्व मेळावे म्हणून प्रसिद्ध होत आहेत. राजस्थानातही या दिवशी राजपूत राजे आपल्या गुरूच्या दर्शनास जात आणि तेथे शमीचे पूजन करत‌. ठाकूर स्त्रिया या दिवशी दसरा नृत्य करतात. या दिवशी अनेक वस्तूंचे पूजन केले जाते. शेतकरी आपल्या शेतात जाऊन कापूस, तूर, काऱ्हाळ, मका, बाजरी आदी पिकांचे शेंडे खुडून आणतात आणि त्याची पूजा करतात. सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

अरुण चव्हाळ, परभणी
७७७५८४१४२४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com