Indian Agriculture : मशागत पद्धतीत संभ्रम नकोच

Agriculture Cultivation : शेतकऱ्यांनी मशागत की शून्य मशागत अशा संभ्रवावस्थेत न राहता आपल्याला सुलभ, शक्य असेल त्या पद्धतीचा अवलंब करायला हवा.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Cultivation Method in Agriculture : येत्या खरीप हंगामात जमिनीची मशागत करून की शून्य मशागत पद्धतीने पिकांची लागवड अथवा पेरणी करायची, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कारण पेरणीपूर्वी जमिनीची उत्तम मशागत करा, असा सल्ला दिला जात असताना काही तज्ज्ञ मात्र शून्य मशागत तंत्राचा अवलंब करण्याचे सांगत आहेत.

अनेक शेतकऱ्यांना हे परस्पर विरोधाभाशी मार्गदर्शन वाटत आहे. परंतु हे विरोधाभासी नाही. कारण शेतकऱ्यांना पूर्वमशागतच करा किंवा शून्य मशागतच करा, असे सांगितले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे शक्य आहे, आपल्याला जे अधिक सुलभ आहे, अशा मशागतीचा अवलंब करायला पाहिजे. राज्यातील शेतकरी पूर्वापार जमिनीच्या खोल मशागत तंत्राचा अवलंब करीत आलेले आहेत.

यात प्रामुख्याने नांगरणी, वखरणी, ढेकळे फोडणे, जमिनीचे सपाटीकरण ही कामे केली जातात. अशा प्रकारच्या उत्तम मशागतीने पेरणी अथवा टोकन सुलभ होते. तण तसेच रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. याला शास्त्रीय आधारदेखील आहे. परंतु त्याचवेळी अशा प्रकारच्या मशागतीने अधिक पाऊसमान काळात माती वाहून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. ट्रॅक्टरद्वारे जमिनीचे घनीकरण होऊन मातीची सुपीकता कमी होत आहे.

त्यामुळे पीक उत्पादन घटत असल्याचेही समोर आले आहे. जमिनीची मशागत हे कष्टदायक आणि खर्चीक कामही आहे. हवामान बदलाच्या काळात तापमान वाढत असल्याने खोल मशागतीने कीड-रोगांच्या अवशेषांबरोबर उपयुक्त जिवाणूही प्रखर सूर्यप्रकाशात उघडे पडून त्यांच्या वाढीची प्रक्रियाही धोक्यात येत आहे. त्यामुळे हवामान बदलाच्या काळात मशागत पद्धतीचाही संशोधनातून पुनर्विचार व्हावा, असे मत राष्ट्रीय मृदा विज्ञान जमीन उपयोगिता संस्थेचे संचालक नितीन पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Indian Agriculture
Indian Agriculture : एकत्र या, शेती टिकेल

जमिनीची मशागत ते पिकांची काढणी-मळणीपर्यंत उत्तम व्यवस्थापन शेतकऱ्यांकडून केले जात असले, तरी त्यांना उत्पादन मात्र कमी मिळत आहे. याचे कारण अधिक पाऊसमान काळात मशागत केलेल्या जमिनीतील सुपीक मातीचा वरचा तर वाहून जात आहे. ट्रॅक्टरद्वारे मशागत-पेरणी केल्याने अतिरिक्त दाब पडून मातीचे घनीकरण होत आहे.

घनीकरणामुळे मातीची रचना बदलते, मातीमध्ये हवा-पाणी जाण्यासाठीची छिद्रे कमी होतात, पिकांच्या मुलांची वाढ कमी होऊन उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घटत आहे. तापमानही दिवसेंदिवस वाढत असताना त्याचा मातीत उपलब्ध उपयुक्त जीवजंतूंवर घातक परिणाम होत आहेत. परंतु याबाबत संशोधन अथवा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे हा अभ्यास होणे गरजेचे आहे.

Indian Agriculture
Indian Agriculture : एकत्र या, शेती टिकेल

यासाठी कृषी विद्यापीठांसह माती-पाणी यामध्ये काम करणाऱ्या संशोधन संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. हे करीत असताना शून्य मशागत तंत्राचा अवलंब राज्यात अनेक शेतकरी करीत असून, त्यांचे याबाबतचे अनुभवही चांगले आहेत. विशेष म्हणजे शेतात बियाणे पेरता यावे, पिकाला पाणी देण्यासाठी सऱ्या, वाफे करता यावेत, तण तसेच रोग-किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, या तीन मुख्य कारणांसाठी जमिनीची मशागत केली जाते.

नांगरणी न करता ही तिन्ही कामे आपण करू शकलो तर पिकाची वाढ, उत्पादन वाढ याकरिता मशागतीची आवश्यकता नाही. खरिपात बहुतांश पिकांना पाणी देण्याची गरज नाही. त्यामुळे वाफे करण्याचीही गरज नाही. मशागत न केलेल्या जमिनीत पेरणीऐवजी पाऊस पडल्यावर मऊ झालेल्या जमिनीत बियाणे टोकून घ्यावे.

तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर तसेच कीड-रोग नियंत्रणासाठी एकात्मिक नियंत्रण पद्धतीची अवलंब करता येतो. शून्य मशागत तंत्राला जोडून बीबीएफ तंत्राचा अवलंब केला तर पाऊस अधिक पडला अथवा खूपच कमी पडला तरी त्यात पीक तग धरून राहते. नैसर्गिक आपत्तीत शाश्‍वत उत्पादनाची हमी मिळते. या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांनी संभ्रमावस्थेत न राहता योग्य ती मशागत पद्धत निवडायला हवी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com