शेती टिकली तरच लोकशाही टिकेल

भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना स्वातंत्र्यवीरांचा गौरव मनामनात दाटून येतो. त्याच पार्श्‍वभूमीवर कृषी क्रांतीचा इतिहास घडविणाऱ्या महाराष्ट्रातील कृषिवीर वसंतराव नाईक यांची आठवणही आज त्यांच्या ४३ व्या स्मृतिदिनी मनात ताजी झाल्याशिवाय राहत नाही.
Democracy will survive only if agriculture survives
Democracy will survive only if agriculture survivesAgrowon
Published on
Updated on

भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना स्वातंत्र्यवीरांचा गौरव मनामनात दाटून येतो. त्याच पार्श्‍वभूमीवर कृषी क्रांतीचा इतिहास घडविणाऱ्या महाराष्ट्रातील कृषिवीर वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांची आठवणही आज त्यांच्या ४३ व्या स्मृतिदिनी मनात ताजी झाल्याशिवाय राहत नाही.

Democracy will survive only if agriculture survives
Soybean Disease: सोयाबीन पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव कसा टाळाल ? | ॲग्रोवन

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा
कवी गोविंदाग्रज यांनी महाराष्ट्र देशाचे वर्णन आपल्या प्रसिद्ध अशा महाराष्ट्र गीतातून अगदी चपखलपणे केले आहे.
त्यांच्या या काव्यातील ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा...’ यासोबतच आज नव्याने ‘कृषी क्रांतीच्या देशा’ ही वास्तव प्रतिमा जोडण्याची आवश्यकता आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र देशाचा मंगल कलश संतांच्या पावन भूमीत आणला. त्यांना मनापासून साथ सोबत करत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पुरोगामी, कृषी-औद्योगिक महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने पायाभरणी व उभारणी केली. गहुलीसारख्या बंजारा तांड्यातील, भटक्या विमुक्त जातीतील वसंतराव नाईक हे राजकारणातील धीरोदात्त, वीर पुरुष. दूरदृष्टी व विजिगीषू वृत्तीच्या या नेत्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची तब्बल साडेअकरा वर्षे कमान सांभाळली. सुरुवातीचा काळ सोपा नव्हता. अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांनी भरलेला होता. पाक, चीन युद्ध, भूकंप, दुष्काळ अशा भल्या मोठ्या संकटांचे आव्हान त्यांनी लीलया पेलले. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या काळात पिण्याचे पाणी तर होते. मात्र, पोटाची भूक भागविण्यासाठी अन्नधान्य नव्हते. भूक आणि रोजगाराचा प्रश्‍न गहन बनलेला होता. तो सोडविण्यासाठी वसंतराव नाईक यांनी कृषी क्रांतीचा ध्यास घेतला.

Democracy will survive only if agriculture survives
Cotton : सामूहिक कापूस शेती फायदेशीर ः डॉ.मायी

‘‘दोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी फाशी घेईल,’’ असे पुणे येथील शनिवार वाड्यासमोरील जाहीर सभेत वसंतराव नाईक यांनी भीष्मप्रतिज्ञा केली. ती पूर्ण करणे एवढे सोपे काम नव्हते. कुठलीही क्रांती सहजासहजी होत नाही. महाराष्ट्राला सुजलाम् सुजलाम् करण्याचे कृषी व्रत संतवृत्तीच्या वसंतरावांनी स्वीकारले आणि कृषी क्रांतीच्या रणांगणात खरे युद्ध सुरू झाले. महाराष्ट्राला नव्हे, तर देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी शस्त्रांची नव्हे तर कृषी शास्त्राची गरज त्यांनी ओळखली. महाराष्ट्रभर सिंचनासाठी त्यांनी धरणे बांधली, बांध-बंधाऱ्यातून ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ हा कार्यक्रम राबविला. भरघोस उत्पादनाच्या संकरित वाणांचा स्वीकार केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भरघोस उत्पादन देणाऱ्या ‘हायब्रीड’ वाणांचा एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे झपाटल्यागत प्रसार-प्रचार केला. शेती तंत्रज्ञान पुरविण्यासाठी महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली. हायब्रीड ज्वारीचे स्वतः सेलूच्या शेतात प्रयोग केले. ‘आधी केले, मग सांगितले’ या युक्तीतून त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना भरपूर उत्पादनासाठी उद्युक्त केले. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रात हरितक्रांतीची पहाट झाली. महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. राकट आणि दगडांच्या देशासोबत महाराष्ट्र कृषिक्रांतीचा देश बनला. म्हणूनच आधुनिक महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक समृद्धीने नटलेल्या महाराष्ट्राचे कृषिवीर ठरले आहेत.

वसंतराव नाईक यांनी दुष्काळाच्या काळात कष्टकऱ्यांच्या हातांना रोजगार देणारी ‘रोजगार हमी योजना’ सुरू केली. वसंतराव नाईक दूरदृष्टीचे नेते होते. या रोजगार हमीच्या कामातून अनेक बंधारे उभे राहिले, असंख्य तलाव खोदण्यात आले. त्यातून सिंचनाची व्यवस्था उपलब्ध झाली. रस्ते बांधण्यात आले. व्यवस्थेला उभारी मिळाली. सोबत रोजगाराचा प्रश्न सुटला. कष्टकऱ्यांना त्यांच्या झोपडीत भाकरी मिळाली. ही योजना आताही तितकीच उपयोगी
ठरली आहे. केंद्र सरकारने ही योजना ‘मनरेगा’च्या स्वरूपात स्वीकारली आहे, यावरून वसंतराव नाईकांच्या दूरदृष्टी धोरणाला अर्थातच मान्यता मिळाली आहे. हा त्यांच्या धोरणाचा गौरव आहे. तळागाळातील कष्टकऱ्यांच्या जीवनाचा अभ्यास, शेतीत शेतकऱ्यांबद्दलची त्यांची कळकळ, त्यातून राज्य शासनाने राबविलेले निर्णय, तयार केलेली धोरणे महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही.
शेती, शिक्षण व रोजगार या त्यांच्या विचारांची पेरणी महाराष्ट्रात झाल्याने समृद्धीचे पीक आज पाहावयास मिळत आहे. भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना स्वातंत्र्यवीरांचा गौरव मनामनात दाटून येतो. त्याच पार्श्वभूमीवर कृषी क्रांतीचा इतिहास घडविणाऱ्या महाराष्ट्रातील कृषिवीर वसंतराव नाईक यांची आठवणही त्यांच्या स्मृतिदिनी मनात ताजी झाल्याशिवाय राहत नाही. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद या संस्थेनेही आठवण महाराष्ट्रातील कृषी वीरांच्या सत्कार सोहळ्यातून कायम जपली आहे. वसंतराव नाईक यांची प्रेरणा घेऊन राज्याच्या सर्व भागातील कर्तबगार शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करून समृद्धीत भर घातली आहे. कृषी क्रांतीचा वसा घेतलेल्या या कृषी वीरांचा प्रतिष्ठानच्या वतीने यंदा त्रेचाळिसाव्या स्मृतिदिन सोहळ्यात वसंतराव नाईक कृषी पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येत आहे.
वसंतराव नाईक यांनी ‘शेती टिकली तर लोकशाही टिकेल,’ हे काँग्रेसच्या अधिवेशनात ठणकावून सांगितले होते. त्यांनी आपल्या पंचायत प्रणालीतून लोकशाहीचा आविष्कार केला. आज पंचायत राज अंतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या त्रिस्तरीय व्यवस्थेमुळे लोकशाही अधिक बळकट झाली आहे. ग्राम विकासाची वाटचाल ग्रामीण भागात पोहोचली आहे. हे वसंतराव नाईक यांचं लोकशाहीला लाभलेलं देणं, कदापिही विसरता येणार नाही.
महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी त्यांनी राबवलेली ध्येय-धोरणे प्रत्यक्षात सिद्ध झाली आहेत. आजच्या अस्थिर बनलेल्या राजकीय परिस्थितीत वसंतरावाची आठवण सर्वच जण मोठ्या गौरवाने काढतात. विरोधी पक्षांचे बलाढ्य नेते असताना त्यांनी तब्बल साडेअकरा वर्षे महाराष्ट्राला स्थिर व सक्षम नेतृत्व दिले. विरोधी नेत्यांचा सन्मान राखला गेला. त्यांनी महाराष्ट्राचा चौफेर विकास केला. दीन, दलित, वंचित, कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी या घटकांच्या उत्थानासाठी सत्ता राबविली. त्याच वेळी औद्योगिक क्रांतीसाठी उद्योगपतींनाही संधी दिली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांच्याशी मुख्यमंत्री म्हणून आत्यंतिक सौहार्दाचे संबंध होते. केंद्र सरकारात महाराष्ट्र राज्याचा सन्मान होता. महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयांवर काही योजना स्वीकारल्या. तो जमाना ‘शायनिंग’चा नव्हता, मात्र महाराष्ट्राची प्रतिष्ठा अदबीने राखली जात होती. महाराष्ट्राच्या या चतुरस्र नेत्याला, कै. वसंतराव नाईक यांना आदरांजली!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com