cotton harvesting machine pros and cons: केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, (सीआयएई) भोपाळ ने कापूस वेचणी यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र भारतीय बनावटीचे ट्रॅक्टरचलित, टु-रो कॉटन स्ट्रिपर हार्वेस्टर या प्रकारचे असल्याचे मत संस्थेचे संचालक डॉ. सी. आर. मेहता यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर) नागपूर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यासह देशभरातील इतरही काही संस्थांमध्ये यांत्रिक कापूस वेचणीवर काम झाले..परंतु याबाबतचे बहुतांश संशोधनात्मक प्रयोग अर्धवटच गुंडाळण्यात आले. सन २०१५ दरम्यान ‘सीआयसीआर’ने एका खासगी कंपनीच्या माध्यमातून कापूस वेचणी यंत्र तयार करून लवकरच या बहुप्रतिक्षित यंत्राचे लोकार्पण करण्याचा दावा देखील केला होता. परंतु या यंत्राचे पुढे काय झाले, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो..Cotton Picking Machine: कृषी अभियांत्रिकी संस्थेने विकसित केले कापूस वेचणी यंत्र.२०११-१२ दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेन्सरवर काम करणारे कापसाची उमललेली बोंडे अलगद वेचणारे यंत्र विकसित केले होते. या यंत्राचे पेटंट घेण्यात आले, शेतकऱ्यांच्या शेतावर यंत्राचे प्रात्यक्षिकही झाले. परंतु हे यंत्रे बाजारात आणण्यासाठी व्यावसायिक मिळाले नाहीत. शिवाय या यंत्राने वेचणी करताना कचरा खूप येत असल्याने पुढे विद्यापीठाने देखील त्याचा पाठपुरावा केला नाही..परिणामी यंत्र बाजारात आले नाही. असे आत्ता विकसित यंत्राचे होणार नाही, ही काळजी घ्यावी लागेल. मजुरीचे दर प्रचंड वाढले आहेत. प्रतिकिलो वेचणीला १५ ते २० रुपये मोजले तरी कापूस वेचणीच्या कामास कोणी धजावत नाही. अशा वेळी कापूस वेचणी यंत्राची गरज किती आहे, याचा अंदाज आपल्याला यायला हवा. त्यामुळे ‘सीआयएई’ने विकसित यंत्राची व्यावसायिक निर्मिती होऊन ते देशभरातील कापूस उत्पादकांच्या शेतात शक्य तेवढ्या लवकर पोहोचतील, हे पाहावे लागेल..Cotton Farming: कापूस, कोरडवाहू शेती तोट्यात आल्याने अडचणी.आपल्याकडील वेचणी यंत्र विकासातील मुख्य अडसर हा एकवेळ सर्व कापूस वेचणीस येणाऱ्या फारशा जाती उपलब्ध नसणे हा आहे. ‘सीआयएई’ने विकसित केलेले यंत्र सुद्धा एकवेळ कापूस वेचणीस उपयुक्त आहे. राज्यात अथवा देश पातळीवर बहुतांश कापूस लागवड ही संकरित बीटी वाणांची आहे. या कापसाच्या चार ते पाच वेचण्या शेतकरी घेतात. त्यामुळे सध्या तरी केवळ सरळ वाणांच्या सघन लागवड पद्धतीतच, जी मुळात खूप कमी आहे त्यासाठी हे यंत्र अधिक फायदेशीर ठरणार आहे..म्हणून देशभरातील कापूस उत्पादकांची प्रतिक्षा या यंत्राने संपली असे म्हणता येणार नाही. त्यासाठी आपल्याला संकरित बीटी मध्ये एकवेळ काढणी करता येणाऱ्या जाती विकसित कराव्या लागतील. यांत्रिक कापूस वेचणीमध्ये पानगळतीसाठी उपयुक्त ठरणारे डिफॉलिएंट सीआयसीआर या संस्थेने सुमारे दोन वर्षांपूर्वी विकसित केले आहे..या डिफॉलिएंटचा थोडाफार उपयोग सीआयएईने विकसित केलेल्या यंत्राने कापूस वेचणीत होऊ शकतो. कापूस वेचणी यंत्रे आणि कापूस स्ट्रिपर्स हे दोन्ही कापूस वेचतात. मात्र कापूस वेचणी यंत्रामध्ये स्वच्छ करणारे घटक (क्लिनर) फिरक्यातील कापसाचे धागे काढू शकतात. स्ट्रिपर्स मुख्यतः दांड्यापासून सर्व भाग काढून घेत असल्यामुळे त्याद्वारे काढलेल्या कापसामध्ये जास्त कचरा येतो..हे यंत्रही स्ट्रिपर प्रकारातील असल्याने त्यात वेचणीनंतर किती कचरा येतो, हे पाहावे लागेल. कचरा जास्त येत असेल तर त्यावर अधिक काम देखील करावे लागणार आहे. या यंत्राने कापूस वेचणीसाठीचा खर्च हा मजुरांच्या तुलनेत बऱ्यापैकी कमी असला तरी यंत्राची सध्याची किंमत (१५ लाख) जास्त आहे. त्यामुळे वैयक्तिक कापूस उत्पादकांऐवजी गट, समूह, उत्पादक कंपनीने यंत्र खरेदी करून त्याचा भाडेतत्वावर वापर किफायती ठरू शकतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.