Hapus Mango : हापूसची थेट विक्री मूल्यसाखळी उभारा

Mango Production : बाहेर राज्यातील तुलनात्मक कमी दर्जाचा हापूस ग्राहकांना स्वस्तात मिळत असल्याने देवगड, रत्नागिरीच्या हापूसची मागणी घटून उत्पादकांना दर कमी मिळतोय.
Hapus Mango
Hapus MangoAgrowon

Mango : हवामान बदलामुळे राज्यातील हापूस आंबा बागायतदार समस्येच्या गर्तेत बुडाले आहेत. या हंगामातील प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे आंब्याचे सर्वसाधारण उत्पादन मिळविण्यासाठी उत्पादकांना कीडनाशके, खते यांवर वाढीव खर्च करावा लागतोय. या वर्षी कोकणातील हापूससाठी सुरुवातीला वातावरण अनुकूल आहे, असे वाटत होते. त्यामुळे यंदा हापूस आंबा लवकर सुरू होईल, उत्पादनही चांगले मिळेल, अशी भाकिते वर्तविली होती. परंतु हापूसला मोहर लागल्यानंतर सततच्या ढगाळ वातावरण आणि आता वाढत्या उष्णतामानाने फळगळ होतेय. फळाची वाढ आणि पक्वतेतही अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच या वर्षी हापूस आंबा लवकर येऊनही उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नाही.

दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र हापूसचे दर वाढलेलेच आहेत. अर्थात, ग्राहक पातळीवर होणाऱ्या अधिक दराचा फायदा हा मधस्थ, व्यापाऱ्यांच्या खिशात जातोय. हापूसला योग्य दर न मिळण्यामागे कर्नाटक, गुजरात येथून येणारा हापूस आंबादेखील आहे. बाहेरील राज्यांतून येणाऱ्या या तुलनात्मक कमी गुणवत्तेच्या हापूस आंब्याचा धुडगूस पणनच्या उत्पादक ते ग्राहक थेट हापूस आंबा महोत्सवात पण पाहायला मिळतो. एवढेच नाही तर पुणे, मुंबई या शहरांबरोबर आता अलिबाग, रत्नागिरी, चिपळूणपर्यंत बाहेरचा हापूस जाऊन पोहोचला आहे. बाहेरील राज्यांतील हापूस स्वस्तात मिळत असल्याने देवगड, रत्नागिरीच्या हापूसची मागणी घटून त्यास दरही कमी मिळतोय. समस्या केवळ हापूस आंबा फळविक्रीतच नाही, तर कॅनिंगमध्ये देखील आहे.

Hapus Mango
Hapus Mango Market : ऐन हंगामात हापूसची आवक घटली

गेल्या वर्षी राज्यात हापूस आंब्याचे उत्पादन कमी होते. त्यामुळे आंब्याचे तसेच पल्पचे दरही अधिक होते. या वर्षी मात्र हापूस आंब्याचे उत्पादन अधिक असल्याने दर कमी आहेत. त्यामुळे पल्पचे दरही कमी होत आहेत. त्यातच गेल्या वर्षीचा २५०० कंटेनर पल्प शिल्लक असल्याने कॅनिंग व्यावसायिकांना तो कमी दरातच विकावा लागतोय. आंबा पल्प प्रामुख्याने आंबा बर्फीसह इतरही प्रक्रियायुक्त उत्पादनांना वापरला जातो. बाजारात आंबा बर्फीचे दर वाढले असून, ते काजू कतलीबरोबर आले आहेत. ग्राहक आंबा बर्फीऐवजी काजू कतलीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे आंबा बर्फीची पर्यायाने पल्पची मागणी घटली आहे. असेच आंब्याच्या प्रत्येक प्रक्रियायुक्त पदार्थांबरोबर झाले आहे. त्यामुळे हापूस आंबा प्रक्रिया उद्योजक, कॅनिंग व्यावसायिकांचे अर्थकारणही कोलमडले आहे.

हापूस आंबा पल्पची मोठ्या प्रमाणात निर्यातही होते. निर्यातीतही पुन्हा कर्नाटक, गुजरातच्या हापूसचा पल्प कमी दराने उपलब्ध होतोय. बाहेर देशातील ग्राहक रत्नागिरी, देवगड हापूसचा पल्प का कर्नाटक-गुजरातच्या हापूसचा पल्प एवढे बारकाईने पाहत नाहीत. त्यांना फक्त आंबा पल्प हवा असतो. म्हणून कर्नाटक-गुजरातच्या हापूस आंबा पल्पची निर्यातही वाढत आहे. कोकणात पल्पच्या माध्यमातून हजार कोटींच्या वर उलाढाल होत असताना त्यासही चांगलाच फटका बसत आहे. एकंदरीत काय तर रत्नागिरी, देवगड हापूसचा गोडवा कायम ठेवायचा असेल तर कर्नाटक, गुजरात येथून येणाऱ्या आंब्याची सरमिसळ थांबविली पाहिजे. कर्नाटक, गुजरात येथून राज्यात आंबा यायला हरकत काही नाही. परंतु त्याची ओरिजनल हापूस म्हणून राज्यात होत असलेली विक्री थांबली पाहिजेत. यासाठी कृषी, पणन विभागासह राज्य शासनाने काळजी घेतली पाहिजे. याशिवाय कोकणातील हापूस आंबा उत्पादकांनी बागेवरील आपला उत्पादन खर्च कमी करायला हवा. त्याचबरोबर जीआय मानांकनप्राप्त

रत्नागिरी आणि देवगड हापूसची थेट विक्री तसेच मूल्यवर्धन साखळी उत्पादकांनीच विकसित करायला हवी. असे केल्यास यात होत असलेली भेसळ कमी होऊन हापूसचा प्रिमीयम दर उत्पादकांच्या हातात पडणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com