गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा झेंडा फडकवायचा असा भाजपच्या नेत्यांनी बांधलेला चंग आता वास्तवात येताना पाहायला मिळत आहे. २९ महानगरपालिकांचे निकाल लागल्यानंतर भाजपच्या नेतृत्वाने पाहिलेले स्वप्न सत्यात उतरल्याचे स्पष्ट होत आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई काहीही करून ठाकरेंच्या हातातून काढून घ्यायची, या भाजपच्या प्रयत्नांना अखेर यश आले. मात्र फुटलेला पक्ष, पळून गेलेले नगरसेवक, पाठीमागे नसलेले कार्यकर्ते अशा विषण्ण अवस्थेतील उद्धव ठाकरे यांनी जे काही यश मिळविले ते पाहता मुंबईत काही प्रमाणात आपली ताकद असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपने मागील. निवडणुकीपेक्षा १५ हून अधिक जागा जिंकत केलेल्या मेहनतीला फळ आणले आहे. .‘जो हिंदू की बात करेगा वही महाराष्ट्र पर राज करेगा’, हा भाजपच्या विचारसरणी प्रमाणे दिलेला नारा आणि त्या विषयावर आणलेला प्रचार मुंबईत ठाकरे बंधूंनी मुद्द्यांवर आणला. परंतु त्यांना यश आले नाही हा भाग वेगळा! मात्र ठाकरेंच्या एका सभेने मुंबईसह राज्यातील निवडणुकीमध्ये रंग भरला. निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षाने घाऊक पद्धतीने अन्य पक्ष फोडून नेते आणि कार्यकर्ते भरती केले. एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील तब्बल ६२ माजी नगरसेवक पक्षात घेतले. तरीही त्यातील निम्म्याहून अधिक जणांना पराभव पत्करावा लागला आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये युतीची बोलणी सुरू असताना गाफील ठेवून मुंबई आणि ठाणे वगळता अन्य ठिकाणी शिंदेंना हुलकावणी देणाऱ्या भाजपने शिंदेंचा राज्यात विस्तार होऊ नये याची रीतसर काळजी घेतल्याचे निकालानंतर समोर येत आहे..Muncipal Election Result: पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची सरशी.मुंबई महानगरपालिका निवडणुकीभोवती केंद्रित झालेल्या या निवडणुकीत अन्य लहान मोठ्या घटकांकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. प्रारंभी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक उद्धव-राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणामुळे चुरशीची झाली. मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसने एकत्र लढणे अपेक्षित असताना अचानक स्वबळाचा नारा दिला. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन लढण्याचा निर्णय घेतला. मात्र अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांना उमेदवार देता आले नाहीत. काँग्रेस पक्षातील अनेकांनी महाविकास आघाडीतून लढण्याचा आग्रह धरला होता..मात्र नेत्यांच्या अहंकारामुळे पक्षाला स्वतंत्र लढणे भाग पडले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अनेक नेते मुंबईत येऊ शकले नाहीत, ते येऊ नयेत अशीच व्यवस्था मुंबईत केली गेली. ज्या गोष्टी वरवर दिसत असतात त्या बाबी अतिशय खोल असतात. दुसरीकडे काँग्रेसने अन्य ठिकाणी दिलेली लढत ही लक्षणीय आहे. कोल्हापूरमध्ये विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी एकाकी लढत दिली. चंद्रपूर, कोल्हापूर, अमरावती, भिवंडी, अकोला, मुंबई आदी ठिकाणी काँग्रेसच्या जागा चांगल्या निवडून आल्या आहेत. पक्षाला कोणताही चेहरा नसताना स्थानिक नेतृत्वाने दिलेली लढत ही लक्षवेधी म्हणावी लागेल. मुंबईत ठाकरेंमागे जाणारे मुस्लिम रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व नबाब मलीक यांच्याकडे दिले गेले. नवाब मलीक यांच्यासारखा नेत्याला स्वतःचा भाऊ निवडून आणता आला नाही..Muncipal Election Result: पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा ’.राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरजप्रत्येक निवडणुकीत सोईची भूमिका घ्यायची आणि लढायचे अशी भुमिका राष्ट्रवादी काँग्रेसला आता महागात पडत आहे. राज्यभरामध्ये झालेली अवस्था पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना आता आत्मचिंतनाची गरज आहे. पुण्यात भाजप विरोधात लढण्यासाठी दोन्ही गट एकत्र आले. मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई वगळता अन्य ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही वाताहत झाली आहे ती पाहता पक्षाला नव्या रणनीतीची गरज आहे. अजित पवार सध्या सरकारमध्ये असल्याने शरद पवार गटाच्या आमदारांच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आले होते. हे दोन्ही पक्ष एक व्हावेत असे शरद पवार गटातील काहींना वाटत असले तरी नेमके कसे एकत्र यायचे याची संधी मिळत नव्हती. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने ती आली होती..एकनाथ शिंदे यांचेही अस्तित्व पणालाशिवसेना पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पाठबळ देणाऱ्या भाजपने अलीकडच्या काळात खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये युती करण्यासाठी शेवटपर्यंत वाटाघाटी सुरू होत्या. अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी मुंबई, ठाणे, कोल्हापूर वगळता अन्य ठिकाणी भाजपने अर्ज भरत शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात सध्या जोरदार संघर्ष सुरू आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्याचे पडसाद उमटत असून, शिंदे गटाने तेथे भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांनी शिंदे यांना रोखण्यात यश मिळविले आहे. शिंदे यांना ठाणे महानगरपालिकेपुरते रोखण्याचा भाजपचा अजेंडा यशस्वी झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे..Muncipal Election: अखेरच्या टप्प्यात जोरदार चुरस.ठाकरेंसमाोर आव्हानउद्धव ठाकरे को जमीन दिखाओ, असे वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईतील एका बैठकीत केले होते. त्या वक्तव्याची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्यानंतर ठाकरेंनीही त्यांना आव्हान दिले होते. मात्र भाजपने शिस्तबद्धरीत्या ठाकरे यांना जमीन दाखविल्याचे महाराष्ट्राला मान्य करावे लागेल. विधानसभा निवडणुकीत केवळ २० जागांपर्यंत ठाकरेंना रोखले. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीकडे ठाकरेंनी लक्षच न दिल्याने तेथे लढती झाल्या नाहीत. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मुंबई आणि परभणी वगळता अन्य ठिकाणी पक्षाला दोन अंकी ही जागा मिळवता आल्या नाहीत..मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी असा सामना रंगल्याने तेथे जागा येणे अपेक्षित होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मुंबई ताब्यात येईल, असे वाटत होते मात्र तसे झाले नाही. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊन पक्ष फोडला आणि तो हळूहळू मुंबईपुरता सीमित केला हे पाहता शिंदे यांना हा इशारा आहे. मागील विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढलेली विधानसभा निवडणूक महायुतीने जिंकली होती..या निवडणुकीत भाजपच्या अनेक आमदारांना शिंदे यांनी हात सैल सोडून मदत केली. भाजपच्या जास्त जागा निवडून आल्यानंतर शिंदे यांना मागच्या बाकावर बसावे लागल्याची खंत आहे. शिंदे यांना काहीही करून पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यासाठी ते हर प्रकारे प्रयत्न करत आहेत. आणि ही गोष्ट भाजपच्या नेतृत्वाच्या नजरेतून सुटणारी नाही. त्यामुळे शिंदे यांना एका विशिष्ट सीमारेषेपर्यंतच खेळू देण्याची रणनीती सध्यातरी या निवडणुकीतून स्पष्ट झाली आहे.९२८४१६९६३४(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.