पॅकेज, मदत, सवलत, अनुदान अशा थातूरमातूर उपायांत कृतिदलाने अडकून न पडता शेती शाश्वत - आर्थिकदृष्ट्या किफायतशीर कशी ठरेल, याकरिताचे उपाय सुचवून त्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरायला हवा. .राज्यातील शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज सात शेतकरी आत्महत्या होत असल्याचा आकडा आता सरासरी आठवर गेला आहे. राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांबाबत उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने राज्य तसेच केंद्र सरकारला अनेकदा फटकारले आहे. त्यात त्यांनी अभ्यास, अहवालाऐवजी थेट कृतिवर भर देण्याचेही सांगितले. शेतकरी आत्महत्यांची कारणे आणि त्यावरील अल्प, दीर्धकालीन उपायांबाबतचे यापूर्वीचे अनेक अहवाल सरकार दरबारी धूळ खात पडून आहेत..Sustainable Farming: शाश्वत शेतीतून मिळविले आर्थिक स्थैर्य.अशा वेळी या उपाययोजनांवर थेट काम करणारे कृतिदल स्थापन करणे गरजेचे असताना कृषी आयुक्तालयाने कृतिदलाची स्थापना तर केली मात्र हा गट पुन्हा एकदा प्रामुख्याने शेतकरी आत्महत्यांमागच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक कारणांचाच अभ्यास करून उपाय सुचविणार असल्याचे कळते. अर्थात, थेट कृतीचा यातही अभाव असल्याने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी हे कृतिदल कितपत उपयुक्त ठरेल, याबाबत शंकाच आहे. एखाद्या समस्येचे कारण माहीत नसेल तर त्यावर उपाय करणे अवघड असते. परंतु शेतकरी आत्महत्यांची कारणे आणि त्यावरील उपायही स्पष्ट असताना त्या थांबत नसतील तर ही बाब अधिक खटकणारी असून हे शासन - प्रशासनाचे पूर्णपणे अपयश म्हणावे लागेल..शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक कुचंबणा हे आत्महत्यांमागील प्रमुख कारण आहे. राज्यातील ८२ टक्के जिरायती शेती क्षेत्र, कमी जमीन धारणा, नैसर्गिक आपत्तींनी होणारे पिकांचे नुकसान, पारंपरिक पीक पद्धतीतील घटत चाललेली उत्पादकता, अशाश्वत बाजार, अनिश्चित दर, वाढता उत्पादन खर्च, घटत चाललेला संस्थात्मक वित्त पुरवठा या सर्वांच्या परिपाक म्हणजे शेती व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. सातत्याने तोट्याच्या शेतीतून शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढत आहे..Sustainable Farming: शेतकऱ्यांचा खरा आधार बांधच.त्यातच आजारपण, लग्नकार्य, मुलाबाळांचे शिक्षण अशा कौटुंबिक गरजा भागविणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कठीण जात असल्याने आर्थिक गुंता वाढत जात आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत तुटत चाललेल्या सामाजिक आधाराने नैराश्य वाढत आहे. शेवटी वैफल्यग्रस्त शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. ही राज्याच्या शेतकऱ्यांची वस्तुस्थिती शेती तज्ज्ञासह राज्यकर्ते देखील जाणून आहेत. ज्या वर्षी शेतीतून चांगले उत्पन्न मिळाले (उत्पादन नव्हे) त्या वर्षी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटल्याचे एका अहवालातून पुढे आले आहे. असे असताना अभ्यासाऐवजी शाश्वत शेती आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीवर थेट कृती अपेक्षित आहे..पॅकेज, मदत, सवलत, अनुदान अशा थातूरमातूर उपायांत कृतिदलाने अडकून न पडता शेती शाश्वत - आर्थिकदृष्ट्या किफायतशीर कशी ठरेल, याकरिताचे उपाय सुचवून त्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरायला हवा. शेतीसाठी पाणी-वीज-रस्ते या पायाभूत सुविधा तर आवश्यकच आहेत. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शेतीपूरक व्यवसायाद्वारे शेतीतील जोखीम कमी करून पिकांची उत्पादकता वाढविण्यावर भर द्यायला हवा..शेतीचा संस्थात्मक वित्तपुरवठा सुरळीत करणे, सक्षम पीकविमा योजनेतून शेतीला सुरक्षा पुरविणे, निविष्ठांच्या किमतीवर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करणे, शेतीमालाला शाश्वत परवडणारा भाव मिळवून देणे, ग्रामीण शिक्षण- आरोग्याच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशा उपायांवर भर द्यायला हवा. शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि शेतीपूरक व्यवसायातून शेती शाश्वत अन् शेतकरी आर्थिक सक्षम होतील. सतत निराशा व जगण्याची उमेद हरविलेल्यास एकटं वाटू न देता त्याच्याशी संवाद साधला, संपर्क ठेवला तर आत्महत्या मोठ्या प्रमाणात कमी होतील, असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. शिवार संसद तसेच शिवार हेल्पलाइनद्वारे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यात आल्याने असे उपायही जरूर करायला हवे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.