मानव-मित्र ः मधमाश्या

माधमाश्या नाहीत तर परागीभवन नाही, परागीभवन नाही तर वनस्पती नाहीत, वनस्पती नाहीत तर प्राणीजीवन नाही, तर मानवी जीवनही नाही. आज जागतिक मधमाश्या दिनानिमित्त हा विशेष लेख...
Honey Bee
Honey BeeAgrowon

पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांती प्रक्रियेत अपुष्पिय वनस्पतींपासून पुष्पिय वनस्पती आणि गांधीलमाश्यांसारख्या कीटकांपासून मधमाश्या यांची निर्मिती एकाच कालखंडात सुमारे ८ ते १० कोटी वर्षांपूर्वी झाली. या दोन सजिवांची निर्मिती एकाच कालखंडात एकत्रितपणे होणे हा काही योगायोग नव्हता. त्यात निसर्गाची गरज आणि नियोजन होते. वनस्पतींची फुले आपल्या विविध आकार, रंग आणि गंध यांनी कीटकांना/मधमाश्यांना आपल्याकडे आकृष्ट करतात आणि त्यांना फुलांतील देठापाशी स्रवणारा गोड मकरंद देतात. फुलांमधील आपले हे खाद्य गोळा करताना मधमाश्यांच्या केसाळ शरीरावर फुलांतील असंख्य परागकण (पूं-बीज) अडकतात. हजारो फुलांवरून आपले खाद्य गोळा करताना मधमाश्यांच्या अंगावरील एका फुलातील परागकण त्याच जातीच्या दुसऱ्या फुलांतील मादी अवयवांवर सहजगत्या पडून पर-परागीभवनी (क्रॉस पॉलिनेशन) होते. अशा पर-परागीभवनामुळे फुलांचे रूपांतर जनुकीय विविधता असलेल्या उत्तम प्रतीच्या भरपूर बिया / फळांत होते. आणि पृथ्वीवरील त्यांचे अस्तित्व टिकविले जाते. फुलणाऱ्या वनस्पती आणि मधमाश्या यांचे हे परस्परावलंबित्व आणि सहजीवन गेली अनेक दशलक्ष वर्षे अव्याहत चालू आहे.

वनांमधील विविध वनस्पतींपासून मधमाश्यांना जवळजवळ वर्षभर त्यांचे खाद्य मिळते. मधमाश्यांतर्फे या वनस्पतींत परागीभवन होऊन वनांचे पुनरुज्जीवन आणि प्रसार होतो. शेतीमध्ये जगात एकूण घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी ७० ते ७५ टक्के पिके परागीभवनासाठी मधमाश्या आणि इतर परागसिंचक कीटकांवर अवलंबून असतात. या परागीभवनाच्या प्रक्रियेत मधमाश्यांचे ७५ ते ८० टक्के योगदान असते. शेतातील फुलांच्या संख्येनुसार शेतात पर्याप्त संख्येने मधमाश्या नसतील तर सर्व फुलांमध्ये परागसिंचन न होऊन काही फुले अफल राहतात आणि त्याच्यात बीजधारणा होत नाही. अमेरिकेत शेतकरी, बागाईतदार पिकांच्या फुलोऱ्याच्या काळात मधमाश्यापालकांकडून शेतात मधमाश्यांच्या वसाहती ठेवतात आणि या ‘परागीभवन सेवेसाठी’ मधपाळांना एका वसाहतीसाठी एका महिन्याला १०० ते १५० डॉलर्स सेवाशुल्क देतात. कॅलिफोर्नियातील बदाम बागाईतदार अशा सेवेसाठी मधपाळांना दरवर्षी सुमारे १५ कोटी डॉलर्स देतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अथक परिश्रम करून मधमाश्या लाखो किलो मध तर तयार करतातच आणि त्याच बरोबर परागीभवन करून वने समृद्ध करतात. अनेक शेतीपिकांच्या एकरी उत्पादनांत लक्षणीय वाढ करून देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालतात. एका मधमाश्यांच्या वसाहतीत १५००० मधमाश्या असतात. एक मधमाशी दररोज सुमारे ५०० ते ८०० फुलांवरून आपले खाद्य गोळा करते आणि जवळ जवळ तितक्याच फुलांमध्ये परपरागीभवन घडवून आणते. काय ही मानवसेवा!

आपल्या ऋषी-मुनींना गाईंच्या आणि मधमाश्यांच्या उपयुक्ततेची जाणीव होती. आमच्या नद्या दुधा-मधाने वाहोत अशा प्रार्थना वेदांत आहेत. दुधा-मधाचे वैपुल्य हे समृद्धी आणि प्रगतीचे लक्षण समजले जाई. ऋग्वेदात गाईंचा ‘दूध-गाई’ तर मधमाश्यांचा ‘मध-गाई’ असा उल्लेख आहे. वेद, रामायण, उपनिषदे यांत मधमाश्या आणि मध यांचे उल्लेख आहेत. कौटिल्याचे अर्थशास्त्रात

ज्याप्रमाणे फुलांना इजा न करता मधमाश्या फुलांतील मकरंद हळुवारपणे गोळा करतात, त्याप्रमाणे राजाने प्रजेला भार न होईल असा कर गोळा करावा आणि असा गोळा केलेला कर प्रजेच्या कल्याणासाठी खर्च करावा असा सल्ला राजांना दिला आहे.

जगात आज ५ कोटी मधमाश्यांच्या वसाहती पाळल्या जात आहेत. भारतात सुमारे २५-३० लाख मधमाश्यांच्या वसाहती पाळल्या जात असून, त्यांपासून सुमारे १ कोटी किलो मधाचे आणि २ लाख किलो मेणाचे उत्पादन होत आहे. भारतातील मधमाश्यांना उपयुक्त अशा वनांतील वनस्पती आणि शेतीपिकाखालील क्षेत्र लक्षात घेता भारताची २ कोटी मधमाश्यांच्या वसाहती पाळण्याची क्षमता आहे. भारतात घेतल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या पिकांमध्ये संपूर्ण परागीभवन करण्यासाठी किमान ७० लाख मधमाश्यांच्या वसाहतींची गरज असल्याचा भारतीय कृषी संशोधन संस्थेचा अहवाल आहे. मधमाश्यांची अपुरी संख्या त्यामुळे अपुरे परागसिंचन, हे भारतातील खाद्यतेल बिया आणि डाळी यांचे कमी उत्पादनाचे एक मुख्य कारण आहे. आपण सध्या दरवर्षी ८० हजार कोटी रुपयांचे खाद्यतेल आणि २५ हजार कोटी रुपयांच्या डाळी आयात करीत आहोत.

वनांतील बेसुमार वृक्षतोड आणि शेतीविभागात कीटकनाशकांचा स्वैर वापर यामुळे मधमाश्यांच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे. ५० वर्षांपूर्वी मिशेल कार्सन या पर्यावरणवादी विदुषीने Silent sprign (निःशब्द वसंत ऋतू) असे पुस्तक लिहून कीटकनाशकांच्या अतिवापराविरुद्ध आवाज उठविला होता. असे म्हणतात, की प्रो. अलबर्ट आइन्स्टाईन यांनी नोंद करून ठेवली आहे की ‘‘जर पृथ्वीवरील मधमाश्या लुप्त झाल्या तर केवळ ५ वर्षांत पृथ्वीवरील मानवी जीवनाचा शेवट होईल. माधमाश्या नाहीत तर परागीभवन नाही, परागीभवन नाही तर वनस्पती नाहीत, वनस्पती नाहीत तर प्राणीजीवन नाही, तर मानवी जीवनही नाही.’’

मधमाश्यांचे मानवी-जीवनातील महत्त्व जाणून राष्ट्रसंघाच्या आमसभेने २० डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या सभेत ‘२० मे हा जागतिक मधमाशी दिवस’ म्हणून जाहीर केला आणि सर्व राष्ट्रांना मधमाश्यांचे संरक्षण, संगोपन आणि वृद्धी करण्याचे आवाहन केले आहे. शेती उत्पादन वाढविण्यासाठी - आत्मनिर्भर भारतासाठी - परागीभवनासाठी मधमाश्या या निविष्ठेस (Input) पर्याय नाही. ज्या ज्या देशांत मधमाश्यांच्या भरपूर वसाहती पाळल्या जात आहेत ते देश (ब्राझील अर्जेंटिना, युक्रेन, न्युझिलंड इ. आणि इस्राईलसुद्धा) कृषी उत्पादनात स्वावलंबी तर आहेतच आणि निर्यातदारही आहेत.

(लेखक केंद्रीय मधुमक्षिका संशोधन संस्थेचे निवृत्त संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com