यशवंत कीर्तिवंत...

राज्यातील जनतेचे कल्याण हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून सतत अभ्यास, मनन वाचन, चिंतन, निरीक्षण आणि शील रक्षण असे उपजत गुण यशवंतराव चव्हाण यांनी अंगीकारले. अशा या लोकाभिमुख विकासाचे कार्य करणाऱ्या कीर्तिवंत व्यक्तिमत्त्वाचे स्मरण आज त्यांच्या जयंतीनिमित्त व्हायलाच हवे.
agrowon editorial article
agrowon editorial article

महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे दूरदृष्टी असलेले नेते होते. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून राज्याच्या कृषी, औद्योगिक, शैक्षणिक तसेच आर्थिक विकासाबरोबरच कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशा क्षेत्रांतही आपल्या कौशल्यपूर्ण कार्यपद्धतीतून भरीव कामगिरी केली आहे. 

लोकसंघटक लोकसंग्राहक यशवंतरावांनी राजकारणात लोकमान्य टिळकांचा वसा तर समाजकारणात आगरकर, छत्रपती शाहू महाराज व सत्यशोधक महात्मा फुले आदी महापुरुषांचा वारसा पुढे नेला. यशवंतराव खऱ्या अर्थाने लोकसंघटक होते, लोकसंग्राहक होते. संयम सौजन्य हे त्यांच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य. त्यामुळे नेहमी कार्यकर्त्यांचे मोहोळ स्वतःभोवती असे. विशेषतः त्यांचा दरबार कायम भरलेला असे. त्यांनीही कार्यकर्त्यांची कदर केली. ते स्वतः मोठे झालेच, पण हजारो कार्यकर्त्यांनाही त्यांनी मोठे केले. कार्यकर्त्यांचे गुण ओळखून प्रत्येकाला योग्य काम, योग्य संधी ते देत असत. त्यामुळे त्यांना लोकांचे अतोनात प्रेम मिळाले. त्यांची वृत्ती सर्वसंग्राहक होती. शांत, प्रेमळ, सरळ व सुस्वभावी यशवंतराव आपल्या जन्मभूमीचे निस्सीम पुजारी होते. माणूस मातीचा पुजारी असल्याशिवाय त्याला कोणाच्याच मातीच्या पूजेचा अर्थ कळणार नाही, असे कृष्णाकाठमध्ये ते म्हणतात.

जातिभेदरहित राजकारणाचा वारसा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचे ध्येय पूर्ण केल्यानंतर मुंबई, कोकण, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा भिन्न भौगोलिक आणि सांस्कृतिक प्रांतात विखुरलेल्या राज्याला एका सूत्रात बांधण्याचं प्रगतीतील महाराष्ट्र घडविण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य, गरीब, दुर्लक्षित घटकांना संधी लाभावी म्हणून विकास योजना आखताना संतुलित विकासाला प्राधान्य दिले. राज्यातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहित राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. 

सहकार चळवळीत मोठे योगदान त्यांनी सहकार चळवळ वाढीस लावण्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे. याशिवाय देश आर्थिक संकटात असताना अर्थ विभागाला न्याय देण्याचे कामही त्यांनी अतिशय अभ्यासपूर्वक केले. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सहकाराचा पुरस्कार करून सहकार चळवळ ग्रामीण भागात रुजविण्यावर त्यांनी भर दिला. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास व कृषी-उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कुक्कुटपालन, दुग्धविकास या क्षेत्रांत सहकाराचा प्रसार केला. खत कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाइपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात सहकारी तत्त्वावर सुरू केले. कृषी औद्योगिक धोरणाचे प्रणेते म्हणून त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला ज्ञात आहे. आज सहकार क्षेत्राची झालेली दुरवस्था पाहता त्यांचा सहकारी चळवळ एका अर्थाने सत्तेचे केंद्र आहे. सत्तेचे केंद्र मुरले म्हणजे लोकशाहीचा अंकुश त्यावर ठेवला पाहिजे. तसे न केल्यास अनियंत्रित सत्तेमुळे विकासाचे हे शस्त्र दुधारी ठरेल हा त्यांचा विचार आज बरेच काही शिकण्यासारखे आहे.

शेती व शेतकऱ्याविषयी जिव्हाळा शेती आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचेच विषय होते. त्यामुळे त्यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकी हक्काचा प्रश्‍न, भूमिहीनांचा प्रश्‍न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. ग्रामीण रोजगारनिर्मितीचे स्वप्न त्यांनी पाहिले व साकार केले. शेतीची प्रगती झाली तरच औद्योगिक उन्नती होईल. म्हणून शेतीला उद्योग धंद्यांची जोड हवी, अशी भूमिका घेत कृषी उद्योगांना प्रोत्साहन दिले. शेतजमिनींच्या कमाल धारणेवर मर्यादा आणण्याचा कायदा करून त्यांनी जमीन सुधारणेच्या दिशेने क्रांतिकारी पाऊल उचलून ‘कसेल त्याची जमीन’ या तत्त्वावर देशातील पहिला नवा कुळकायदा, राष्ट्रीय रोजगार हमी योजना अशा अनेक महत्त्वपूर्ण योजनाची अंमलबजावणी केली. या निर्णयांचा गरीब शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय राज्याचा औद्योगिक विकास घडू शकणार नाही, त्याचबरोबर भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे शेतीच्या विकासावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे आणि म्हणून अंधश्रद्धेला मूठमाती देत विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची आपण कास धरली पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

मातृभाषेतून शिक्षणास आग्रही विकास म्हणजे केवळ रस्ते, तलाव आणि इमारती बांधणे नव्हे, तर त्यासोबत माणसाची, पर्यायाने समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि भौतिक प्रगती करणे अभिप्रेत असते. म्हणून आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी शिक्षणविषयक धडाकेबाज निर्णय घेतले. ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये, कृषी व अकृषी विद्यापीठे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. याकामी पुढाकार घेणाऱ्या व्यक्ती, संस्थांना सर्वतोपरी साह्य केले. तसेच लोकशाही मजबूत करावयाची असेल तर शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतून, भाषेतूनच दिले पाहिजे. त्यातूनच आमची जनता शहाणी होईल आणि खऱ्या अर्थाने ती लोकशाहीचे रक्षण करेल. अशी त्यांची भूमिका होती. यामधून आजच्या धोरणकर्ते शिक्षण सम्राटांनी  बोध घेणे आवश्यक आहे.

एकंदरीतच यशवंतरावांची सुसंस्कृत, धोरणी, प्रगल्भ, व्यासंगी राजकारणी म्हणून कारकीर्द राहिली. मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी घेतलेले निर्णय, राज्याच्या जडणघडणीतील त्यांचे योगदान, दूरदर्शीपणा, सहकार चळवळीची उभारणी, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक अशा सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. अर्थात  शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजन इत्यादी बाबींवर प्रकर्षाने लक्ष केंद्रित करून राज्यातील जनतेचे कल्याण हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून सतत अभ्यास, मनन वाचन, चिंतन, निरीक्षण आणि शील रक्षण असे उपजत गुण अंगीकारले. अशा या लोकाभिमुख विकासाचे कार्य करणाऱ्या कीर्तिवंत व्यक्तिमत्त्वाचे स्मरण आज व्हायलाच हवे.

डॉ. नितीन बाबर  ८६०००८७६२८ (लेखक शेती, साहित्याचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com