देशाच्या कृषिक्रांतीचे पाईक म्हणून ज्यांचा अभिमानाने उल्लेख करता येईल अशी महाराष्ट्रातील त्रिमूर्ती म्हणजे डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख, मा. अण्णासाहेब शिंदे आणि पुढच्या काळातील सर्वांत प्रभावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे शरद पवार! पद, पैसा, पक्ष आणि प्रतिष्ठा दुय्यम लेखून भारतातील कृषिक्रांतीचा यज्ञ या महाराष्ट्रातील त्रयींनी सातत्याने प्रज्वलित ठेवला आहे. शेतकऱ्यांना कृषी शिक्षणाची आणि अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती असल्याशिवाय देशाची अन्नसुरक्षा होऊ शकणार नाही. या उद्देशाने ११ डिसेंबर १९५९ ते २९ फेब्रुवारी १९६० अशा दीर्घ कालावधीचे ११८ एकर क्षेत्रावर विस्तारित प्रथम जागतिक कृषी प्रदर्शन नवी दिल्ली येथे प्रगती मैदानावर डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वात भरविण्यात आले होते. डॉ. देशमुख त्या काळी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री होते. शंभरच्या वर देशांचे विविध तंत्रज्ञानांचे स्टॉल या ठिकाणी होते. देशातील लक्ष-लक्ष शेतकऱ्यांनी हे प्रदर्शन पाहिले, मनात भरविले आणि शेती ही जगाची कल्पतरू ठरू शकते हे अंतर्मनात बिंबवले. जगातील विकासात्मक शेती व तंत्रज्ञान पाहून शेती परिवर्तनाला सर्व स्तरांवर सुरुवात झाली. कृषी परिवर्तनाची मुहूर्तमेढ या प्रदर्शनाने रोवली हे मात्र खरे! ‘भुकेपासून मुक्तता’ ही संकल्पना खूप गाजली.
अन्नधान्य परिस्थिती हलाखीची असलेले ते १९६० चे दशक होते. अण्णासाहेब शिंदे यांनी याच काळात म्हणजे १९६२ ते १९७७ पर्यंत देशाच्या अन्नसुरक्षेची समस्या सोडविण्यासाठी अथक प्रयत्न केले. सलग १५ वर्षे कृषी मंत्रालयात मंत्री म्हणून राहण्याचा मान त्यांना मिळाला. डॉ. एम. एस. स्वामिनाथन या नामवंत कृषी शास्त्रज्ञाच्या मदतीने पहिल्या हरितक्रांतीचा पाया याच काळात रचला गेला. भारतातील कृषी विद्यापीठांच्या निर्मितीत याच काळात सुरुवात झाली. ‘आयसीएआर’ची (भारतीय कृषी संशोधन परिषद) पुनर्रचना १९६६ आणि १९७२ मध्येच करून अधिक कार्यप्रवण केले. कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येत असताना जनतेची भूक बऱ्याच प्रमाणात भागविता आली. अन्नधान्य उत्पादनात वाढही झाली. अन्नधान्य तुटवडा कमी करण्यात यश संपादन होत गेले. शेतकरी राजालाही काही प्रमाणात का होईना स्थैर्यही लाभले होते. कृषिमंत्री सी. सुब्रह्मण्यम, राज्यातील मुख्यमंत्री वसंतराव नाईक, कृषी शास्त्रज्ञ, शेतकरी, नीती निर्धारक, प्रशासक यासह कृषी संस्थांचे या पहिल्या हरितक्रांतीत योगदान आहेच. देशाची भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध अन्नधान्य याचा वेध आणि नियोजन यांचा परस्पर उचित मेळ न बसल्यामुळे कदाचित २००४ मध्ये पुन्हा एकदा अन्नधान्य टंचाईचा सामना देशासमोर उभा ठाकला होता. अशा या बिकट प्रसंगी देशाच्या कृषी मंत्रालयाची धुरा शरद पवार यांनी कृषिमंत्री म्हणून स्वीकारली. हे आव्हान त्यांनी निर्णयक्षमता, शीघ्र कार्यवाही, राज्यातील कृषिमंत्री व नंतर मुख्यमंत्री असतानाचे अनुभव आणि शेतकऱ्यांच्या आणि देशातील जनतेच्या प्रेमापोटी एका दशकाच्या कालखंडात पूर्ण करीत ‘दुसरी सदाहरित क्रांती’ घडविण्यात यशस्वी झालेत. २००४ ते २०१३ असे एक दशक ते देशाचे कृषिमंत्री होते. भारतीय शेतीतून देशाच्या अर्थकारणात मजबुती आणण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण योजना आणून नवीन प्रयोगांची संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यात त्यांचा सातत्याने पुढाकार राहिला आहे. भविष्याचा वेध घेत वर्तमानात जगणारे आणि जागविणारे असे सर्वमान्य नेतृत्व पवार यांचे आहे. शेती अव्यवस्थेचे चटके स्वतः अनुभवल्यामुळे त्यावरील उपाययोजना हिमतीने राबवून महाराष्ट्रासह देशालाही कृषी महासत्तेत रूपांतर करणारे हे नेते आहेत. अनेक पिढ्यांना त्यांच्या ‘ट्रान्स्फॉर्मिंग अॅग्रिकल्चर, ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया’ या इंग्रजीतील तीन खंडांतून प्रकाशित झालेल्या १९२ प्रमुख भाषणांतून या कृषी कर्मयोग्याचे वास्तव दर्शन घडते. त्यातील काही प्रमुख भाषणांचे त्यांचे ‘दुसरी हरितक्रांती’ हे मराठी भाषेतील पुस्तक भविष्यातील समस्यांच्या सोडवणुकीसाठी मार्गदर्शक ठरावे असेच आहे.
कृषिमंत्रिपदाच्या दहा वर्षांच्या काळात देशाने पहिल्यांदाच २६५ दशलक्ष टन अन्नधान्याचे विक्रमी उत्पादनाचे लक्ष्य गाठले. भारताला फलोत्पादन आणि भाजीपाला उत्पादनात जगात दुसऱ्या स्थानावर पोचविले. तांदळाचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश म्हणून आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेने भारताचा गौरव याच काळात केला होता. भारतीय कृषी व्यवस्था एका खंबीर भक्कम पायावर उभी करण्यात पवारांचे योगदान मोलाचे आहे. अन्नधान्यातील स्वयंपूर्णता असो की देशव्यापी कृषी शिक्षण-प्रशिक्षणाची सोय, आयसीएआरची व्याप्ती वाढवून अधिक कार्यप्रवण करण्यात सहभाग अशा कितीतरी मूलभूत बाबींवर बारकाईने लक्ष देऊन पवारांनी देशाला कृषी महासत्तेकडे वाटचालीचा महामार्ग दाखविला आहे. शेतकऱ्यांचे कर्जाचे वाढत चाललेले ओझे कमी करून त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ७१ हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात पुढाकार घेतला. या सर्वांवर कळस म्हणजे आयसीएआरने ‘प्रभावी कृषिमंत्री’ म्हणून केलेला शरद पवार यांचा गौरव! जगातील १०० देशांना आज होत असलेली अन्नधान्य, फळे, भाजीपाला, कृषीचा कच्चा माल, प्रक्रिया केलेला कृषिमाल तसेच मसालावर्गीय शेतीमालाची निर्यात हे सदाहरित क्रांतीचे यश आहे. जगात तांदळाच्या निर्यातीत भारत प्रथम क्रमांकावर आहे. अमेरिकेसारख्या देशात १४०० कोटींच्या बासमती तांदळाची निर्यात आपला देश करतो आहे. यंदा चीनसारख्या देशालासुद्धा तांदूळ निर्यात करण्यास आपला देश सज्ज आहे. जगातील करोडो लोकांच्या ‘भुकेपासून मुक्ती’साठी आपला देश आज सज्ज असून, त्यांची भूक भागवीत आहे. ही किमया ज्यांच्या नेतृत्वगुणांच्या मूलभूत पायांवर पक्की झाली आणि ज्यांच्यामुळे घडली त्यांना ‘जीवेत शरदं शतम्’ ही शुभेच्छा!
डॉ. शरद निंबाळकर : ९४२२१६०९५५ (लेखक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.