‘‘महाराष्ट्र राज्यातील विविध शासकीय कामकाज पूर्णपणे मराठी भाषेत झाले आणि खासगी कामकाजात मराठी भाषेच्या वापरासाठी सूचना आणि प्रोत्साहन दिले गेले, तर मराठी भाषेची जाण असलेल्या व मराठी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या असंख्य उमेदवारांना रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होतील. मराठी भाषा ही स्वतंत्र भाषा असून, तिला व्यापक व गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेस साजेसे स्थान मराठी भाषेला जगाच्या पटलावर मिळू शकेल. जगात आज मराठी भाषा दहाव्या क्रमांकावर असून, मराठी भाषाविषयक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीनंतर ही भाषा जगातील अधिक प्रभावी व व्यापक भाषा बनेल. जगातील प्रथम प्राध्यान्याची भाषा बनण्याची क्षमता मराठी भाषेत असून, त्यात स्पर्धेसाठी पुढील काळात मराठी भाषा सक्षम ठरेल.’’ हे अर्थपूर्ण भाकीत महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार समितीने सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये जो मराठी भाषाविषयक धोरणाचा मसुदा ६४ पानांत तयार केला होता, त्यामधील आहे.
‘देशामधील जवळपास एक दशांस लोकांची मातृभाषा मराठी आहे.’ या विधानापासून सुरू होणारा मराठी भाषा धोरणाचा मसुदा मराठीचे ममत्व आणि मराठीचे असलेले व्यापकत्व अधोरेखित करणारा आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब अशी, की ज्यांची मातृभाषा पक्की असते, अशांना कोणतीही भाषा उत्तम रीतीने अवगत करायला उशीर लागत नाही. हा विचार मातृभाषेचे जतन करण्याच्या अनुषंगाने समर्पक ठरतो. कारण कोणत्याही मानसाला जन्मापासून मनीमानसी रुजलेली भाषा त्यांच्या जीवनाला शिवाय जगण्याला वळण देते. आकारही प्राप्त करून देते. मुळात भावनांचा आविष्कार आणि विचारांचे आदानप्रदान यांच्या अभिव्यक्तीसाठी मातृभाषेइतके इतर कुठल्याही दुसऱ्या भाषेचे घट्ट नाते असू शकत नाही.
१९६० नंतरच्या दशकांत मराठीत जी आत्मकथने प्रकाशित झाली, वाचन संस्कृतीला मनापासून आवडली, अशी आत्मकथने संख्येने दोनशेपेक्षा अधिक असतील. ही सर्व आत्मकथने समाजातील जनममुहांच्या बोली भाषेत लिहिली आहेत. लेखकांसह आपल्या सभोवतालच्या समाजाची दुख, त्यांच्या वेदना, संघर्ष, त्यांचा समाज, त्यांची संस्कृती, त्यांच्या परंपरा, यांना प्रकट करत आपल्या बोलीभूगोलासह सर्व आत्मकथेने आपापल्या मातृभाषेला सन्मानित करत साहित्य संस्कृतीमध्ये स्वतंत्र ओळख स्थापित करतात. मराठी मातृभाषेच्या अनुषंगाने तसेच समाज आणि प्रांत यांच्या अनुषंगाने हा मराठी आत्मकथनांचा दाखला बोलका आणि महत्त्वाचा आहे. यास जोडून एक मुद्दा भाषा आणि संस्कृती संदर्भात समजून घेता येणारा आहे. मराठी भाषा आणि संस्कृती यांचा वसा आणि वारसा समृद्ध आहे. ज्या मराठीमध्ये वारकरी संस्कृती भरून आहे किंवा ज्या मराठीमध्ये अनेक संत कवी, कवयित्रींचे जीवन आणि लेखन भरून आहे, या सर्व परंपरेने मराठीचे वैभव शतकानुशतके फुलविण्याचे कार्य केले आहे.
प्रदीर्घ काळापासून मराठीत असलेली संत, पंत, तंत ही परंपरा साहित्य संस्कृती आणि समाज संस्कृती यांच्यात गौरवाचे चिन्ह ठरलेली आहे. याशिवाय स्वातंत्र्यासाठी झालेले संग्राम, न्याय्य हक्कासाठी झालेल्या चळवळी अनेक प्रकारची झालेली आंदोलने, भाषेच्या अस्मितेसाठी झालेले लढे आणि आमची सुधारकांची परंपरा या सगळ्या ऐतिहासिक घटना आणि घडामोडी समाजभाषा आणि संस्कृती यांना महत्त्वाचे स्थान देणाऱ्या आहेत. थोडक्यात काय, तर जशी मानवमुक्ती महत्त्वाची समजली जाते, त्यासोबतच आम जनतेची भाषिक अस्मितासुद्धा अतिशय महत्त्वाची समजली जाते. त्याचे कारण भाषा आणि माणूस यांचे नाते केवळ कोरडे नसते, तर हे नाते अतिशय जिवंत, अतिशय तरल आणि अतिशय संवेदनशील अशा स्वरूपाचे असते. म्हणूनच मराठी भाषेचा धोरणात्मक आणि धारणात्मक विचार करताना वर नमूद केलेली बाब दुर्लक्षित करता येत नाही. इतिहास असे सांगतो, की कोणत्याही भाषेसाठी ती जतन करण्यासाठी कुणीतरी रक्त सांडलेले असते, अशा या भाषेची जपणूक जनसमूहाच्या भावनांचा भाग असतो. तसाच तो त्यांच्या अस्मितेचाही भाग असतो. अशा भाषेकरिता आणि त्याभाषेला जोडून असणाऱ्या माणसांकरिता देशात मुक्तीचे संग्राम उभे राहिलेले आहेत, हा इतिहास आपल्या समोर आहे. थोडक्यात काय, ‘माणूस किंवा संस्कृती समाज आणि मुक्ती’ यांना केंद्रवर्ती ठेवून बोलणारा माणूस आणि माणसांची भाषा या दोघांचेही रक्षण करणे ही भाषिक अस्मितेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब ठरते. म्हणूनच महाराष्ट्र राज्यामध्ये तयार करण्यात आलेल्या मराठी भाषाविषयक धोरणाची उद्दिष्टे अतिशय महत्त्वाची ठरतात. या एकूण उद्दिष्टांमध्ये कळीच्या, परंतु अतिशय महत्त्वाच्या विषयांना हात घातलेला आहे. व्यक्ती आणि समाज, भाषा आणि वर्तमान, संधी आणि भाषा, माणूस आणि भवितव्य या अशा अनेक घटकांचा विचार मराठी भाषाविषयक धोरणात आणि त्यांच्या उद्दिष्टांमध्ये केलेला आढळून येतो. या उद्दिष्टातील काही निवडक उद्दिष्टांचा उल्लेख या ठिकाणी आवर्जून करायला हवा.
- समाजमानसात मराठी भाषेविषयी आत्मीयता उत्पन्न करणे
- सर्व विद्या शाखांमध्ये मराठी हा विषय अनिवार्य करणे
- महाराष्ट्रातील विविध बोलींचे सर्वेक्षण करणे
- विविध लोककथा, लोकगीते, लोककला यांच्या संहिता संकलित करून त्या प्रकाशित करणे
- सर्वसामान्यांना समजेल अशी प्रशासकीय व्यवहाराची मराठी भाषा विकसित करणे
- जनमानसातील मराठी भाषेविषयीचा न्यूनगंड दूर करणे
- मराठी भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी ठिकठिकाणी भाषेच्या प्रयोगशाळा उभारणे
- नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने मराठी भाषेचा जगभर प्रसार करणे
- हस्तलिखितांचे, शिलालेखांचे आणि ताम्रपटांचे संकलन करून ते प्रकाशित करणे
- सर्व बॅंकांमधील व्यवहार मराठी भाषेमध्ये कसे होतील, हे कटाक्षाने पाहणे
मराठी भाषा धोरणातील या निवडक उद्दिष्टांवर नजर टाकली असता असे ध्यानात येते, की मराठी भाषेचा ठेवा आणि ही भाषा बोलणारा माणूस यांचा अतूट असा सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक अनुबंध आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. या सर्व गोष्टीसोबतच अनेक अभावांमधील आणि अनेक संघर्षामधील कुठेतरी दूर उभा असलेला एक माणूस आहे आणि त्या माणसाचा समाज आहे. त्यांचीही भाषा त्यांच्या माणसांसह जपणे महत्त्वाचे ठरते. मराठी मातृभाषा आणि त्या मातृभाषेसोबत मानवी समूहाची संस्कृती सांभाळली जाणे गरजेचे आहे, यातच खरा आनंद आणि खडे आव्हानही सामावलेले आहे.
डॉ. केशव सखाराम देशमुख ९४२२७२१६३१ (लेखक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख आहेत.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.