लष्करी’ हल्ला
खरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने मोठ्या प्रमाणावर हल्ला चढविला आहे. ‘आठ एकर मका लागवड केली असून दहा दिवसांपूर्वी पोंग्यामध्ये सर्वत्र अळ्या दिसून आल्या. त्यावर तातडीने फवारणी केली, पण बऱ्याच ठिकाणी अळीपर्यंत कीडनाशक पोचू शकले नाही तेथे नुकसान दिसते आहे.’ ही प्रतिक्रिया आहे बुलडाणा जिल्ह्यातील गोपाल महाजन या शेतकऱ्याची! काहीशा अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया राज्याच्या सर्वच भागातून येत आहेत. आपल्या राज्यात अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचे हे तिसरे वर्ष आहे. खरीप २०१८ मध्ये पहिल्यांदा या किडीचा प्रादुर्भाव मका पिकावर दिसून आला. त्यानंतर २०१९ च्या खरीप आणि रब्बी हंगामात या किडीने मक्यासह ज्वारी, बाजरी, ऊस, कापूस, आले अशा विविध पिकांवर आक्रमण करून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. आशिया खंडात या किडीचा झालेला उद्रेक आणि त्यातून होत असलेले नुकसान पाहता ‘एफएओ’ने भारतासह संपूर्ण आशिया खंडातील अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते, असा स्पष्ट इशारा सुमारे दोन वर्षांपूर्वी दिला आहे. तरीही या किडींकडे कृषी शास्त्रज्ञांसह सर्वांचेच होत असलेले दुर्लक्ष अनाकलनीय अन् दुर्दैवी म्हणावे लागेल.
पावसाळ्यातील पोषक वातावरणात अमेरिकन लष्करी अळी अधिकच आक्रमक होते, हे माहीत असतानासुद्धा कृषी तज्ज्ञांसह कृषी विभागदेखील गाफील राहिला आहे. ही कीड बहुभक्षी आहे. या किडीचे प्रजनन आणि प्रसार फार झपाट्याने होतो. ही कीड पिकांवर रात्री हल्ला करून त्यांचा फडशा पाडते. या किडीच्या नियंत्रणासाठी जगभर रासायनिक नव्हे तर एकात्मित नियंत्रण प्रभावी दिसून आले आहे. तरीही याबाबत फारसे काम आपल्याकडे झालेले नाही. सध्या अमेरिकन लष्करी अळीसाठी एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा वापर करण्याबाबत सांगितले जात असले तरी त्यातील शिफारशी फारच सर्वसामान्य आहेत. पीक फेरपालट, सापळा पिके आणि मित्र किडींच्या प्रभावी वापराने चीन, तैवान, इस्त्राईल, स्पेन आदी देशांनी या किडीला चांगलेच नियंत्रणात ठेवले आहे. आपल्या देशात, राज्यात मात्र कामगंध सापळे लावा, असे सांगितले जाते. परंतू कधी, कुठे, किती आणि कसे सापळे लावायचे, वेगवेगळ्या किडींनुसार कोणता ल्यूर वापरायचा, तो कुठे मिळेल, हे मात्र सांगितले जात नाही.
मित्र कीटकांबाबतही असेच आहे. मित्र कीटकांबाबतही त्यांची ठरावीक प्रमाणात अंडी शेतात सोडावीत, असे सांगितले जाते. परंतू त्यातून नेमक्या किती मित्रकिडी बाहेर पडतात, त्यातील किती जगतात, त्यांचे संगोपन, संवर्धन कसे करायचे हे सांगितले जात नाही. वनस्पतीजन्य तसेच जैविक कीडनाशके बहुतांश ठिकाणी मिळत नाहीत. मिळाले तर त्यांच्या गुणवत्तेबाबत खात्री नसते. दोन-चार रासायनिक कीडनाशक सोडले तर या किडीसाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून अमेरिकन लष्करी अळीच्या खात्रीपूर्ण नियंत्रणासाठी कृषी शास्त्रज्ञांनी संशोधनाची दिशा ठरवायला हवी. पीकनिहाय स्थानिक सापळा पिके, स्थानिक मित्र कीटक शेतकऱ्यांना मिळायला हवेत.
राज्यात सध्या अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आलेले सर्व मका क्षेत्रे क्वारंटाइन करायला हवेत. अशा क्षेत्रावर प्रभावी एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा वापर करून या किडीचा प्रसार रोखायला हवा. असे केले तरच या किडीचा इतर पिकांवर प्रादुर्भाव होणार नाही आणि मका पिकातीलही नुकसान कमी होईल. सामूहिक नियंत्रणाचे या किडीचे प्रभावी नियंत्रण होते, हेही शेतकऱ्यांना सांगावे लागेल. कृषी विभागाने केवळ तोंडी अथवा कागदोपत्री प्रबोधन न करता प्रभावी एकात्मिक नियंत्रणाचे ‘डेमो प्लॉट’ तयार करून ते शेतकऱ्यांना दाखवायला हवेत. असे केले तरच हा ‘लष्करी’ हल्ला परतविण्यात आपण यशस्वी होऊ.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.