
Farmers' Reactions : ‘सकाळ - ॲग्रोवन’चे भव्य ‘ॲग्री एक्स्पो - २५’ प्रदर्शन छत्रपती संभाजीनगर येथे १० ते १३ जानेवारी या कालावधीत पार पडले. या प्रदर्शनाला चारही दिवस राज्यभरातील शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. शेतीला लागणाऱ्या निविष्ठांपासून ते शेतीमाल विक्री, प्रक्रिया, निर्यात अशा सर्वच क्षेत्राला स्पर्श करणारे हे प्रदर्शन होते. निविष्ठांमध्ये पारंपरिक गोमय सेंद्रिय खतांपासून ते अत्यंत प्रगत नॅनो तंत्राने बनविण्यात आलेले नॅनो युरिया, नॅनो डीएपी अशा खतांपर्यंत, यंत्रांमध्ये छोट्या हायड्रॉलिक वखरापासून ते भव्य ऊस तोडणी यंत्रापर्यंत,
इलेक्ट्रिक बैल ते ड्रोनसारखे अद्ययावत तंत्रज्ञान तसेच महिला बचत गटांच्या घोंगडीपासून ते प्रक्रियायुक्त पदार्थ याबाबत माहिती आणि खरेदीचाही आनंद प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने भारतात प्रथमच ऊस शेतीत एआय (आर्टिफिशीयल इंटेलिजन्स) तंत्रज्ञान प्रयोग यशस्वीपणे राबविला. या प्रयोगाची माहिती देणारा दालन हे यंदाच्या ॲग्रोवन प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते. प्रदर्शनाला भेट देणारे शेतकरी ऊस शेतीत एआय तंत्रज्ञानाच्या या प्रयोगाची माहिती घेऊन भारावून गेलेले दिसले.
प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. त्या वेळी राज्यातील शेती समस्यांचे भीषण वास्तवही पुढे आले. कापसावरील गुलाबी बोंड अळी असो, की डाळिंबावरील तेलकट डाग रोग यांचे प्रभावी नियंत्रणाचे उपाय अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यात आता हवामान बदलाने नवनवे कीड-रोग अत्यंत घातक ठरत आहेत.
आले, मिरची, टोमॅटो या भाजीपाला पिकांवरील सड रोगावरही खात्रीशीर उपाय मिळत नाही. सड रोगाने माझे तीन एकर आले पूर्णपणे बसून गेले, ही प्रतिक्रिया आहे नायगाव, जि. छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी मच्छिंद्र गायकवाड याची! खरे तर हे कृषी शास्त्रज्ञांपुढील आव्हान असून घातक कीड-रोगांचे प्रभावी उपाय शेतकऱ्यांना मिळायला हवेत. दोन वर्षांपूर्वी कोटेशन भरूनही वीज जोडणी मिळाली नाही, अशी तक्रार रांजणगाव ता. पैठणचे शेतकरी दत्ता काळे करतात. मुळात राज्यातील वीज सर्वांत महाग आहे.
शेतीला तर भारनियमनामुळे दिवसा व रात्री अशी आलटून पालटून वीज मिळते. रात्री जीव धोक्यात घालून शेतीला सिंचन करावे लागते. त्यात पूर्ण क्षमतेने वीज मिळत नसल्याने आणि विद्युत बिघाडामुळे शेतकऱ्यांचे पंप, स्टार्टर खराब होऊन त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड बसतो. शेतकऱ्यांनी कोटेशन भरल्यानंतर शेतीला तत्काळ वीज जोडणी मिळायला हवी. विजेच्या इतर समस्याही कशा दूर करता येतील, हेही पाहावे.
एकीकडे पिकांचा उत्पादन खर्च वाढत असताना दुसरीकडे शेतीमालास हमीभावाचा देखील आधार मिळत नसल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतीमालास किमान हमीभावाचा आधार हा आज शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. परंतु हमीभावाचा कायदा करण्यात आला नसल्यामुळे बाजार समित्यांत हमीभाव मिळाला नाही तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येत नाही. केंद्र-राज्य सरकार खरेदी केंद्रे स्थापन करून कापूस, सोयाबीन, तूर आदी शेतीमाल हमीभावाने खरेदी करीत असल्याचे दाखविते.
परंतु तेथेही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. अशी खरेदी केंद्रे उशिराने सुरू होतात. नोंदणी ते खरेदी यात बराच वेळ थांबावे लागते. बारदान्यासह इतरही काही साधन सुविधांअभावी खरेदी प्रक्रिया रखडते. त्यामुळे हमीभावाने शेतीमाल खरेदी केंद्रांकडे शेतकरीच पाठ फिरवितात. दीडपट हमीभावाचा कायदा केल्याशिवाय शेतीमालास हमीभावाचा आधार मिळणार नाही, हे वास्तव स्वीकारून द्या दिशेने केंद्र-राज्य सरकारने विचार करायला हवा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.