
If you tell a big enough lie and tell it frequently enough it will be believed.
- Adolf Hitler, Ex Chancellor of Germany
सोमवार ३० एप्रिल १९४५. बरोबर ७७ वर्षांपूर्वीची गोष्ट. जर्मन राजधानी बर्लिनच्या रस्त्यांवर रशियन रणगाडे धडाडत होते. रेड आर्मीच्या गोळीबारापासून बचावासाठी बर्लिनवासीयांची पळापळ सुरू होती. चॅन्सेलरीच्या बंकरमध्ये मात्र स्मशानशांतता पसरली होती. दुपारी साडेतीन वाजता शयनगृहातून गोळी झाडल्याचा आवाज आला. जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटणाऱ्या क्रूरकर्मा ॲडाल्फ हिटलरनं तोंडात पिस्तुलाची नळी सरकवून आत्महत्या केली होती. सोफ्यावर त्याच्या शेजारीच त्याची दीर्घकालाची प्रेयसी आणि एका दिवसाची पत्नी इव्हा ब्राऊनचं निष्प्राण कलेवर पडलं होतं. तिनं सायनाइड खाऊन इहलोकीची यात्रा संपवली होती.
अवघ्या जगावर युद्धाचा वरवंटा फिरवणाऱ्या या टोकाच्या राष्ट्रवादी योद्ध्यानं आपलं जीवन अशा पद्धतीनं संपवलं आहे याची भनक बाहेर कोणालाच लागली नव्हती. ज्यू द्वेषानं पछाडलेल्या आणि जर्मन वंशश्रेष्ठत्वाच्या अघोरी कल्पनेसाठी अवघ्या जर्मनवासीयांमध्ये युद्धज्वराचा वणवा पेरणाऱ्या या नेत्याचा छप्पन्नाव्या वर्षी असा झालेला अंत त्याच्या कल्पनेतल्या योद्ध्याला मुळीच शोभणारा नव्हता. हिटलरला दीर्घकाळ साथ देणारा आणि कुख्यात गोबेल्स प्रचार नीतीचा जनक डॉ. जोसेफ गोबेल्स, बोरमन बाहेर उभे होते. हिटलरनं मृत्यूपूर्वी दिलेल्या सूचनांप्रमाणं या दोघांनी बंकरबाहेर आणून हिटलर आणि इव्हाच्या मृतदेहांवर गॅसोलिन ओतून दहन केले. हो, हिटलरला मृत्यूनंतर आपल्या देहाची विटंबना होऊ द्यायची नव्हती. दोनच दिवसांपूर्वी त्याचा युद्धातील साथीदार इटलीचा हुकूमशहा बेनितो मुसोलिनीची प्रेयसीसह हत्या करून त्यांचे मृतदेह मिलानच्या चौकात उलटे लटकावले गेले होते. तिथल्या साम्यवादी कार्यकर्त्यांनी या देहांची यथेच्छ विटंबना केली होती.
दुसऱ्या महायुद्धानं लक्षावधी जिवांचा बळी गेला. पुरता युरोप बेचिराख झाला. पुढे टंचाई आणि महागाईच्या झळा जगभराला दीर्घकाळ सोसाव्या लागल्या. अमेरिकेनं जपानमधील नागासाकी व हिरोशिमा शहरांवर अणूबाँब टाकून आपल्या ताकदीची प्रचिती जगाला आणून दिली. तो पुढं आकाराला आलेल्या अमेरिका आणि रशियातील शीतयुद्धाचा प्रारंभबिंदू होता. खरं तर इटली आणि जर्मनीच्या पाडावानंतर युद्ध संपल्यात जमा होतं, पण अमेरिकी शास्त्रज्ञांना अणूबाँबची चाचणी घ्यायची होती. म्हणून जपानला प्रयोगशाळा बनवण्यात आल्याचा आरोप नंतर केला गेला. त्यात कितपत तथ्य आहे, हे अमेरिकाच जाणो. पण अवघी माणुसकी महायुद्धात होरपळली. साठ लाख ज्यूंचे छळछावण्यांमध्ये शिरकाण झाले. महिलांवर अनन्वित अत्याचार झाले. कोवळ्या मुलांचीही निर्घृणपणे कत्तल करण्यात आली.
विचारी माणसांपुढं तेव्हा काही प्रश्न उभे राहिले आणि आजही ते उनुत्तरित आहेत; ते म्हणजे, ‘युद्ध कशासाठी? युद्ध कोणासाठी? आजवरच्या युद्धांनी जगाचं काय भलं झालं? आणि या युद्धांना जबाबदार कोण?...जनता की राष्ट्रवादाची, अतिरेकी देशप्रेमाची झूल पांघरूण जनतेला हुलीवर घालणारे नेते? दोन महायुद्धांचा अनुभव पदरी असूनही आज एकविसाव्या शतकात जगभरात युद्धगर्जना सुरू आहेत. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळं जग पुन्हा एकदा संघर्षाच्या टोकावर उभं आहे. हे सारं पाहता, मानवजातीला सर्वांत बुद्धिमान प्राणी हे बिरुद मिरविण्याचा काडीचा अधिकार नाही, असं आपल्याला वाटत नाही का?
सारं जग दुसऱ्या महायुद्धासाठी केवळ हिटलरला जबाबदार धरतं. ते बव्हंशी खरंही आहे. नाण्याला दुसरीही एक बाजू असते. ती खरी की खोटी हे ठरवता येईल. कारणमीमांसा न करताच न्यायाचे तराजू तोलणं योग्य नाही. अर्थात, याचा अर्थ हिटलर ग्रेट होता असा अजिबात नाही. त्याच्या अमानवी ‘कर्तृत्वाचं’ समर्थन करता येणार नाही. त्याचं गतआयुष्य तपासून हा साधासुधा माणूस जगाचा कर्दनकाळ कसा बनला, हे पाहणं नक्कीच औत्स्युक्याचं ठरावं. त्यासाठी त्याचं ‘माइन काम्फ’, अर्थात ‘माझा लढा’ हे आत्मचरित्र वाचावं लागेल. माझ्या माहितीनुसार किमान तीन प्रकाशकांनी ते मराठीत प्रसिद्ध केलं आहे. आता एवढ्या वाईट माणसाचं चरित्र कशासाठी वाचायचं आणि या लेखमालेत अशा पुस्तकाचा परिचय करून देण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. चांगली पुस्तकं आपल्याला प्रेरणा देतात, आनंद देतात, जगणं समृद्ध करतात. त्याचबरोबर चांगलं, ‘चांगलं’ का आहे हे समजून घ्यायचं असेल तर वाईटाची थोडीफार ओळख करून घ्यावीच लागते. जग एकांगी कधीच नसतं, ते एकरेषीयही नसतं. पांढऱ्याला काळी किनार असतेच. माणसानं कसं असावं हे ठरवताना कसं नसावं हेही तपासून घेतलं पाहिजे. त्यासाठी ‘माझा लढा’ उपयुक्त ठरावा.
हिटलरच्या क्रौर्याची मुळं त्याच्या बालपणापर्यंत पोहोचलेली आढळतात. त्याच्या वडिलांच्या तिसऱ्या लग्नसंबंधांतून जन्मलेला हा तिसरा मुलगा. आई आणि वडिलांच्या वयात २५ वर्षांचं अंतर. वडील व्यसनी. ते आईचा अनन्वित छळ करायचे. मुलांपुढं करू नये ती बळजोरी तिच्यावर करायचे. त्याचा हिटलरच्या मनावर सखोल परिणाम झाला. त्याचं शिक्षण यथातथाच झालं. चित्रकलेत रस होता. पण प्राथमिक शिक्षण अपुरं राहिल्यानं कला महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला नाही. पुढं हा ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात पोहोचला. तिथं पडेल ती कामं करून जगत राहिला. इतिहासाची प्रचंड आवड आणि जाज्वल्य राष्ट्रप्रेम त्यानं तरुणपणातच अंगीकारलं. तिथंच जर्मन लोकांचं शोषण करून जगणाऱ्या ज्यू सावकारांचं दर्शन त्याला झालं. जर्मन तरुणींना पैशासाठी शरीरविक्रीच्या व्यवसायात ढकलणारे ज्यू पाहिले आणि त्याच्यातील ज्यू द्वेषाला अधिकच धार आली. राजद्रोहाच्या आरोपाखाली त्याला तुरुंगावास भोगावा लागला. बंदिवासातच त्यानं आपलं आत्मचरित्र ‘माइन काम्फ’ लिहिलं. त्यामुळं तो सत्तारूढ होण्याच्या आधीचा जडणघडणीचा काळ यात आला आहे. या पुस्तकात आपल्या गरिबीविषयी त्यानं लोणकढी थापा मारल्याचा आक्षेप घेतला जातो. त्याच्या मृत्यूनंतर मूळ पुस्तकात काही बदल करून त्याचं उदात्तीकरण केल्याचा आरोपही केला जातो. या पुस्तकात हिटलर सत्तेच्या सोपानापर्यंत कसा पोहोचला याचं वर्णन आलं आहे. सत्तेवर आल्यानंतर जो काही कहर त्यानं केला त्याची नोंद नाही. शिवाय हे त्याचं आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा राजकीय चरित्रच - तेही अर्धच - ठरतं.
जर्मनीच्या जनतेच्या मनावर ताबा मिळवण्यासाठी हिटलरनं मानसशास्त्राचा चांगलाच उपयोग करून घेतला. पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर दोस्त राष्ट्रांनी व्हर्सायच्या तहाच्या माध्यमातून अपमानास्पद अटी लादल्यानं साऱ्या जर्मनीभर संतापाची लाट पसरली होती. त्याचा उपयोग सत्तासोपान चढण्यासाठी त्यानं खुबीनं करून घेतला. जनता कह्यात आली तर तिला हवं तसं वळवून चुकीच्या गोष्टीही उदात्तीकरणाच्या माध्यमातून तिच्या गळी उतरवता येतात. त्यासाठी बुद्धिभेदाचं अमोघ अस्र त्यानं वापरलं. वक्तृत्वकलेत तो बाप होता. उच्चरवात हातवारे करीत जनतेला हवं ते बोलण्याची मेख त्याला सापडली होती. शिवाय जनतेला काय हवंय हेही त्यानंच ठरवून आधीच तिच्या गळी उतरवलं होतं. त्यामुळं काम आणखीनच सोपं झालं. प्रसार माध्यमही ताब्यात ठेवली गेली.
हिटलरची काही प्रसिद्ध अवतरणं...
- प्रचारतंत्राचा चतुराईने आणि कौशल्यपूर्णरीत्या वापर केला तर लोकांना स्वर्गसुद्धा नरक असल्याचं आणि अगदी खालच्या दर्जाचं आयुष्य स्वर्गासमान असल्याचं भासवता येतं.
- ज्ञानाविरुद्धच्या लढ्यापेक्षा श्रद्धेविरुद्धचा लढा अधिक कठीण असतो.
- विचार न करणाऱ्या लोकांवर राज्य करणारी सरकारे भाग्यशाली असतात.
- सर्वाधिक खोटे बोलणारे लोक महान जादूगारही असतात.
- मानवतावाद म्हणजे मूर्खपणा आणि भ्याडपणाचं आविष्करण होय!
- जर तुम्ही एखादी खोटी गोष्ट सांगितली आणि ती सतत सांगत राहिलात तर लोक तीवर विश्वास ठेवतात.
जनतेला भावणारं शुद्ध जर्मन वंशाचं हत्यार हीटलरकडं तयार होतंच. शिवाय त्याला ज्यू द्वेषाच्या माध्यमातून काल्पनिक शत्रूही तयार केला गेला. साम्यवादालाही (कम्युनिझम) हीटलरचा कडवा विरोध होता. त्यातून त्यानं आणि मुसोलिनीनं स्पॅनिश यादवी युद्धात तिथल्या साम्यवादी सरकारला उलथवण्यासाठी विरोधी गटाला मदत केली होती. लोकांच्या मनात हवं तेच पेरण्यासाठी प्रचार मंत्री जोसेफ गोबेल्सनं प्रभावी कामगिरी बजावली. खोटं खरं भासवण्यासाठी त्यानं अवलंबलेलं तंत्र गोबेल्स नीती म्हणून पुढं प्रसिद्ध पावलं आणि मानसशास्त्रालाही त्याची दखल घ्यावी लागली. परंपरागत ज्ञान-विज्ञान नाकारण्याची मोहीम सुरू केली गेली. त्यातून १० मे १९३३ रोजी ग्रंथालयांतील २५ हजार पुस्तकांची होळी करण्यात आली. त्यासाठी जमलेल्या समुदायापुढं बोलताना गोबेल्सनं घोषणा केली, ‘ही पुस्तकं राष्ट्रविरोधी आहेत. जर्मन माणूस पुस्तकी किडा बनायला नको, तो चारित्र्यवान असला पाहिजे.’ अशा वातावरणात जीव घुसमटलेल्या अल्बर्ट आइनस्टाइनसारख्या ज्यूवंशीय शास्त्रज्ञाला आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन जर्मनीतून पलायन करावं लागलं. त्याला देशद्रोही ठरवण्यात आलं आणि त्याच्या हत्येसाठी रोख इनामही जाहीर केलं गेलं. एका टप्प्यावर, तर साऱ्या अनिष्ट गोष्टींपासून मुक्ती मिळविण्यासाठी आणि शुद्ध जर्मनांचे साम्राज्य साकारण्यासाठीच हिटलरचा जन्म झाला असून, तो अवतारी पुरुष असल्याचे भासवण्याचे प्रयोग सुरू झाले. येशू ख्रिस्ताशीही त्याची तुलना केली गेली. तशी पुस्तके लिहून प्रसिद्ध करण्यात आली. अशा उन्मादी वातावरणात विवेकाला थारा कसा मिळावा? बुद्धिमान जर्मन समाज या प्रचारतंत्राला भाळला आणि तिथंच तिसऱ्या महायुद्धाचं बिजांकुरण झालं.
अंध, अपंग, लुळे, पांगळे, दुर्बल यांच्यापासून निपजणारी संतती कमकुवत असेल. त्यामुळं अशा लोकांना संपवलं पाहिजे, अशी हिटलरची धारणा होती. तसं तो जाहीरपणे सांगायचाही. मानवता आणि हिटलर यांचं जणू वैरच होतं. नफरत त्याच्या नसानसांत भरली होती. त्याची जडणघडण, त्याची सारी कारकीर्द, दुसऱ्या महायुद्धाचा तपशीलवार इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वि. ग. कानिटकर यांनी लिहिलेलं ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक जरूर वाचलं पाहिजे. सन १९६५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाची एकोणतिसावी आवृत्ती सध्या बाजारात आहे. यावरून या पुस्तकाच्या लोकप्रियतेची कल्पना यावी.
हिटलरकडे काही आश्चर्यकारक आणि वाखाणण्यासारखे गुणही होते. तो शाकाहारी होता. मांसाहार पूर्ण वर्ज्य होता त्याला. मद्यपान, धूम्रपान तो करीत नसे. महिलांमध्येही त्याला फारसा रस नव्हता. इतर हुकूमशहांप्रमाणे त्याने संपत्तीचा संचय केला नव्हता. या अर्थाने तो पुरुषोत्तम मानावा लागेल. सगळ्या युद्ध आघाड्यांवर पराभवाचा डंका वाजायला सुरुवात झाल्यावर शेवटच्या काही दिवसांत त्याची अवस्था दयनीय झाल्याचं नंतर त्याच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या जबान्यांमधून स्पष्ट होतं. या काळात हिटलर खचत गेला. त्याच्या वाणीतला जोष हरपला. खांदे झुकलेले, चेहऱ्यावर सूज, हाताला कंपवात, चेहऱ्यावर सुरकुत्या, अडखळती चाल असं त्याचं या दिवसांतलं वर्णन केलं जातं. साऱ्या जगाला रणांगणात खेचून रक्ताचे पाट वाहवणारा हा हुकूमशहा पराभवाचे नगारे वाजायला लागल्यावर चॅन्सेलरीतल्या बंकरमधून बाहेर यायलाही कचरत होता.
पुढं अनेक संवेदनशील लेखकांनी लिहिलेल्या युद्ध कहाण्यांतून माणुसकीचा गहिवर व्यक्त होत राहिला. युद्धातील दोस्त राष्ट्रांच्या यशस्वी मोहिमांवर हॉलिवूडपट निघाले. युद्धपट हा नवाच प्रकार जन्माला आला. काही तद्दन व्यावसायिक चित्रपट होते, तर ‘शिंडलर्स लिस्ट’सारख्या काही चित्रपटांनी जगाला माणुसकीचे दर्शन घडवले; युद्धापेक्षा मानवता श्रेष्ठ, हा संदेश बुलंद केला. ‘डायरी आॅफ ॲन फ्रँक’ हे हिटलरच्या छळाला बळी पडलेल्या षोडषेचं आत्मकथन वाचून अनेकांच्या काळजाला घरं पडली. शांतता काळात अशा हजारो युद्ध कहाण्या प्रसिद्ध झाल्या. खुद्द हिटलरवर जगभरात लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची संख्या काही हजारांवर आहे. मानसशास्त्रज्ञानांही त्याचं चरित्र ना खुणावतं तर आश्चर्य! त्याची मनोभूमिका, नाझींच्या छळाचे तंत्र, मानव इतका क्रूर कसा बनू शकतो, असे एक ना अनेक विषय मानसशास्राच्या अभ्यासकांना खुणावू लागले. कुख्यात छळछावण्यांमध्ये ज्यूंना कसं हालहाल करून मारण्यात आलं. त्यासाठी कोणकोणते विकृत मार्ग वापरण्यात आले, हा स्वतंत्र लेखाचा नव्हे तर जाडजूड पुस्तकाचा विषय ठरावा. अर्थात, त्या विषयावरची पुस्तकही आंग्ल भाषेत उपलब्ध आहेत. स्टॅन्ले मिलग्राम या मानसशास्त्रज्ञानं लिहिलेलं ‘ओबिडियन्स टू ॲथॉरिटी’ हे पुस्तक खूपच गाजलं. एखाद्याचा जीव घेणं सोपं काम नाही. पण युरोपच्या समरभूमीवर लक्षावधी ज्यूंचं शिरकाण करण्याचं धाडस जर्मन सेनाधिकाऱ्यांच्या अंगी कसं एकवटलं, या विषयाचा चक्रावून टाकणारा अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष या पुस्तकात मांडण्यात आले आहेत.
ज्ञानपीठ विजेत्या संवेदनशील लेखिका अमृता प्रीतम जर्मनीच्या दौऱ्यावर गेल्या असताना एक हृद्य प्रसंग घडला. अमृताजींनी त्यांच्या ‘रसिदी टिकट’ या आत्मचरित्रात त्याचा उल्लेख केला आहे. त्या बर्लिनमधील युद्ध स्मारक पाहात असताना तिथं एक जर्मन युवती आली. तिनं त्यांचा हात पकडला. डोळे पाणावले होते तिचे. ‘जग आम्हा जर्मनांना कधीच माफ करणार नाही का हो?,’ तिनं रुद्ध स्वरात प्रश्न विचारला. तिच्यासारखं सगळ्याच जर्मनांना त्यांच्या चुकांचं भान आलं की नाही हे कळायला मार्ग नाही. पण सध्या जर्मनीत हिटलरच्या ‘माइन काम्फ’चा खप पुन्हा वाढत असल्याचं वृत्त आहे. आपल्याकडंही काहींना हिटलरभक्तीची उबळ आली आहे. इतिहासाची अशी आवर्तनं मानवाला कुठं घेऊन जाणार आहेत ठाऊक नाही. या आवर्तनांत कुठं समजूतदारणाचा थांबा असणार आहे की नाही याचंही भाकीत करता येत नाही. शहाण्या माणसांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना शहाणं करणं, सावध करणं एवढंच करता येण्यासारखं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे, ‘धर्मावरील भक्ती मानवाच्या मुक्तीचा मार्ग बनू शकते, मात्र राजकारणात भक्ती किंवा नेत्याचा उदो उदो करणे म्हणजे पतनाच्या मार्गावर जाण्याचा आणि हुकूमशाहीला निमंत्रण देण्याचा पक्का रस्ता आहे.’
लोकहो, आपल्या भवतालाचा अदमास घ्या. आपली विचारसरणी तपासा. त्याचबरोबर हिटलरच्या ‘कार्यकर्तृत्वावरून’ आणि दुसऱ्या महायुद्धाच्या फलनिष्पत्तीवरून आपण काही बोध घेणार आहोत की नाही, या प्रश्नाचं उत्तरही शोधा.
(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.