Maharashtra Flood Condition: कायमस्वरूपी दुष्काळी अशी ओळख असलेल्या मराठवाड्यात यंदा अतिवृष्टी होऊन भयंकर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी पंजाबला बसलेला महापूराचा वेढाही अभूतपूर्व असाच होता. उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह पूर्वोत्तर राज्ये तसेच जम्मू आणि काश्मीर, लडाख या भागांमध्ये भूस्खलनाचे प्रमाणही फारच वाढले आहे. महापूर, भूस्खलनासह दुष्काळ, वादळे, थंडी-उष्णतेच्या लाटा, विजा, भूकंप, त्सुनामी अशी आपत्तींची ही मालिका लांबत असून यामध्ये अपरिमित अशी जीवित व वित्तहानी होत आहे. .विविध नैसर्गिक आपत्तींमुळे २०२३ मध्ये भारताचे तब्बल एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे एका विमा कंपनीच्या अभ्यासातून पुढे आले आहे. तर २०२४-२५ मध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे तीन हजार लोकांना प्राण गमवावे लागले असून हा मागील अकरा वर्षांतील उच्चांक आहे. ह्या आपत्ती आपण नैसर्गिक म्हणत असलो तरी निसर्गातील मानवाचा अवास्तव हस्तक्षेपामुळे त्यांचे प्रमाण, व्याप्ती आणि तीव्रताही वाढत आहे. या आपत्तींचा थेट संबंध हवामान बदलाशी आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने विविध मंत्रालये आणि विभागांना आता कामाला लावले आहे..Maharashtra Flood: पावसामुळे १५ जिल्ह्यांत हाहाकार.हवामान बदलाने भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला विळख्यात घेतले आहे. असे असले तरी हवामान बदलाचे सर्वाधिक गंभीर परिणाम आशियायी देशांना त्यातही भारताला भोगावे लागतील, असे अनेक जागतिक अभ्यास संस्था मागील दशकभरापासून सांगत आहेत. परंतु हवामान बदलाचा अभ्यास म्हणा की त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती म्हणा त्यांचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांकडे आपण फारसे लक्ष दिले नाही. त्याचेच अतिगंभीर परिणाम देशाला आज भोगावे लागत आहेत..आत्ता संरक्षण, पृथ्वी विज्ञान, आरोग्य आणि कुटुंब, कृषी आणि शेतकरी कल्याण, जलशक्ती, गृह निर्माण, पर्यावरण वने आणि वातावरण बदल आदी मंत्रालयांकडे नैसर्गिक आपत्ती विभागून दिल्या आहेत. त्यामध्ये पण संबंधित नैसर्गिक आपत्तींवर लक्ष ठेवून पूर्वसूचना देणे एवढ्यापुरतेच हे काम मर्यादित असल्याचे दिसते. अशा प्रकारच्या पूर्वसूचनेने संभाव्य जीवित व वित्तहानी कमी करता येऊ शकते. परंतु ह्या आपत्ती टाळण्यासाठी, त्यांची व्याप्ती व तीव्रता कमी करण्यासाठी त्यांच्या मूळ कारणांचा शोध घेतला गेला पाहिजे. आणि असे झाले तरच या आपत्तींपासून दिलासा मिळणार आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे..Maharashtra Flood: मंत्रिमंडळ पाहणी दौऱ्यावर.पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे होत असलेल्या तापमान वाढीचा परिणाम म्हणजेच हवामान बदल होय. प्रदूषणामुळे हरितगृह वायू उत्सर्जन वाढले असून, त्यातून तापमान वाढ होत असल्याचे पुरावे नवनव्या संशोधनातून पुढे येत आहेत. तापमानवाढीने समुद्र, महासागरातील पाण्याचेही तापमान वाढत असल्याने त्यातूनच वादळे, अतिवृष्टी, सुनामीसारख्या आपत्ती वाढत आहेत. दुसरीकडे देशभर रस्ते तसेच विविध विकास प्रकल्पांच्या नावाखाली वृक्षतोड सुरू आहे..पश्चिम घाटापासून ते हिमालयापर्यंत संवेदनशील अशा पर्वतरांगांमध्ये कुठे पर्यटनाच्या नावाखाली, कुठे खाणकामांसाठी तर कुठे जलविद्युतसह इतरही प्रकल्पांसाठी वृक्षतोड, खोदकाम सुरू आहे. नैसर्गिक आपत्ती कमी करण्यासाठी हा विनाशकारी विकास आधी थांबवावा लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला हवामान बदलाशी समायोजन करावे लागणार आहे. या समायोजनात हवामान बदलाचा सामना करण्यासाठीचा आराखडा तयार करून त्यानुसार कृती करावी लागेल. या आराखड्यात गावखेड्यापासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्वांचा समावेश असायला हवा. असे झाले तरच हवामान बदलाच्या अनुषंगाने वाढलेल्या आपत्तींचा आपण मुकाबला करू शकणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.