Pravin Tarde : अभिनेते प्रवीण तरडेंची राज्यातील शेती, गावांबाबतची तळमळ

Food Production : औद्योगिक विकास कितीही झाला तरी अन्न उत्पादनासाठी शेतीला पर्याय निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे सध्या शेतीला वाईट दिवस असले, तरी भविष्यात चांगले दिवस येणारच आहेत.
Pravin Tarde
Pravin TardeAgrowon
Published on
Updated on

Director Pravin Tarde : लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांची राज्यातील शेती, शेतकरी, गावांबाबतची तळमळ नेहमीच दिसून येते. कधी ते आपल्या गावी शेताची चिखलणी करून भात लावताना दिसतात, तर कधी लंडनच्या मंडईमधील मराठी फळे-भाजी-धान्य विक्रेत्याच्या थेट गोदामात जाऊन त्यांनी तिथे कसा व्यवसाय उभारला, विस्तारला याची ओळख जगाला करून देताना दिसतात.

एवढेच नव्हे तर त्यांचे बहुतांश चित्रपटसुद्धा एकतर शेतीवर आधारित, नाही तर मराठ्यांच्या पराक्रमांच्या गाथेवर आधारित ऐतिहासिक असेच आहेत. यावरून त्यांची नाळ येथील शेती-मातीशी कशी जुळलेली आहे, हेच स्पष्ट होते. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील मांदेडे गाव ‘प्राज’ कंपनीने ग्रामविकासासाठी दत्तक घेतले आहे.

या संकल्पनेत प्रवीण तरडे स्वतःहून तर सहभागी झालेच शिवाय विकासाच्या प्रक्रियेत गावे ओस पडत आहेत, ती पुन्हा समृद्ध करायची असतील तर आता कलाकारांनी पुढे यायला हवे, अशी साद त्यांनी घातली आहे. आज आपण पाहतोय, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेत जमिनी पडीक आणि गावे ओस पडत आहेत.

अनेक शेतकरी आपली शेती पडीक ठेवून नाही तर विकून पोट भरण्यासाठी शहरांचा रस्ता धरत आहेत. विकासाच्या नावाखाली गावांना ओरबाडण्याचे काम सुरू आहे. या विकासांत बांधकाम व्यावसायिक, शासन-प्रशासनाची अभद्र युती दिसून येते.

त्यामुळे आम्ही आमच्या परिसरातील शेतजमिनी, डोंगरे ओरबाडू देणार नाही आणि असे कोणी करीत असेल तर त्यांची कॉलर पकडण्याची धमक माझ्यात आहे, असा सज्जड दम तरडे यांनी भरला आहे.

Pravin Tarde
Agriculture Product : शेतीमालाच्या किमतीवरील सरकारी नियंत्रणाने शेतकरी आर्थिक संकटात

मनुष्यप्राणी जिवंत राहण्यासाठी अन्न (धान्य-फळे-भाजीपाला) गरजेचे आहे आणि ते कुठल्याही कारखान्यात निर्माण करता येत नाही तर ते शेतीतच पिकवावे लागते. असे असले तरी शेतीकडे दुर्लक्ष करीत सर्वजण औद्योगिक विकासाच्या मागेच धावत आहेत. परंतु औद्योगिक विकास कितीही झाला तरी अन्न उत्पादनासाठी शेतीला पर्याय निर्माण होऊ शकत नाही.

त्यामुळे सध्या शेतीला कितीही वाईट दिवस आले असले, तरी भविष्यात शेतीला चांगले दिवस येणार आहेत. म्हणून तर शेती इकायची नसते, शेती राखायची असते, असा मोलाचा संदेश प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून तरुणांना दिला. अशाच आशयाची त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आणि त्यास चांगला प्रतिसादही मिळाला आहे.

विशेष म्हणजे ते बाहेरच्या देशांत गेल्यावर तेथील मराठी उद्योजकांना आवर्जून भेटतात. त्यांची राज्यातील शेती संलग्न उद्योगात असलेल्या तरुण-तरुणींना काही मदत होते का, यासाठी पण ते प्रयत्न करतात.

या त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे. त्यांनी साद घातल्याप्रमाणे काही प्रशासकीय उच्च पदस्थ अधिकारी सेवानिवृत्तीनंतर तसेच काही कलाकार हे आपल्या गावच्या शेतीसह एकंदरीतच विकासासाठी एकत्र आले तर त्याचे चांगले परिणामही दिसून येतील. सध्या काही अधिकारी तसेच कलाकार आपल्या गावात विकासाची कामे करीत आहेत.

परंतु हे प्रमाण खूपच कमी आहे. अधिकाधिक सेवानिवृत्त अधिकारी तसेच कलाकारांनी ग्रामविकासासाठी पुढे आले पाहिजे. विकासाला विरोध करण्याचे कारण नाही, परंतु तो पर्यावरणपूरक असायला हवा. सध्याच्या विनाशकारी विकासात गाव परिसरातील नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण हे गावकऱ्यांनी स्वतः करायला हवे.

राज्याच्या कला, सांस्कृतिक, चित्रपट क्षेत्रांत अनेक कलावंत ग्रामीण भागातून आलेली आहेत. गावनिहाय दोन-चार निवृत्त अधिकारीही असतातच. या सर्वांनी आपापल्या भागात पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल्स उभे करायला हवेत. अशा मॉडेल्सचे जवळपासच्या गावांत अनुकरण होईल, हेही पाहायला हवे. असे झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागाचे चित्र बदलायला वेळ लागणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com