Rural Development : माळावरच्या वडासारखं घट्ट मनात रुतून बसलं गाव

राज्याने एक दोनदा प्रयत्न केले पण त्याला चढताच येईना. मग आम्ही हसायला लागलो. राज्याच्या कुऱ्हाडीला प्रचंड धार आहे. मेंढपाळाकडे असती तसली फर्सी कुऱ्हाड राज्याकडे आहे.
Rural Development : माळावरच्या वडासारखं घट्ट मनात रुतून बसलं गाव
Agrowon
Published on
Updated on

- संग्राम निकम

परवा गावी गेलेलो. विहिरीतील मोटरची वायर तुटलेली. वडील म्हणाले वायरमन बोलावून आन. वायरमनचे नाव झेंडे. वडील म्हणाले, झेंड्या काय म्हणतोय बघ. झेंड्या ला फोन केला तो काय उचलेनाच. मग मी आणि प्रशांत झेंड्याच्या घरी गेलो. झेंड्या जेवत होता. म्हणाला,चला जाऊयात. मग झेंड्या घेऊन आलो. त्याने इकडे तिकडे जोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाऱ्याने झाडाची फांदी थटून वायर तुटली होती.

झेंडे म्हणाला, आधी हे झाडाची फांदी तोडली पाहीजे. मग तिकडून राज्या आला. राज्याची बायको त्याला सोडून गेलेली आहे. तो अधून मधून पुण्याला तिच्याकडे चक्कर टाकतो. आणि त्यानंतरचे काही दिवस प्रचंड उदास असतो.तर राज्या आला. वडील म्हणाले, राज्या तुझ्याकडची कुर्हाड आण. राज्या मागारी जाऊन कुर्हाड घेऊन आला.

तेवढ्यात बामन काका, भैया कांबळे,रमण शेठ हे झाडाखालचा रमीचा डाव बंद करून आमच्याकडे आले. राज्या जाडा असल्यामुळे त्याला लिंबावर चढताच येईना. झाडाला येलतार खूप. येलतार म्हणजे, झाडावर वेल खूप. त्यामुळे गचपान तयार होते.

राज्याने एक दोनदा प्रयत्न केले पण त्याला चढताच येईना. मग आम्ही हसायला लागलो. राज्याच्या कुऱ्हाडीला प्रचंड धार आहे. मेंढपाळाकडे असती तसली फर्सी कुऱ्हाड राज्याकडे आहे. राज्याकडे खूप कसल्या कसल्या साठवलेल्या गोष्टी आहेत. त्याच्याकडे एक चाकु सुद्धा आहे. राज्याच्या घरात आसाराम बापूंचा फोटो असलेलं कॅलेंडर आहे.

शेवटी पश्याच लिंबावर चढला. अंगाकाटाने बारीक असलेल्या पश्या एलतार बाजूला करत अगदी शेंड्यात गेला आणि तारेला थटणारी मोठी जाड फांदी त्याने तोडायला सुरुवात केली. आम्ही खालून त्याला इकडची पण तोड आणि तिकडची पण तोड असं सांगून त्याच्याकडून ते करवून घेत होतो. शेवटी निम्म्यावर तोडत आल्यावर पश्याने फांदीवर पाय दिला आणि फांदी कडकड वाजत खाली आली.

आम्ही खाली उभे असलेल्या सर्वांनी मग दोरीला बांधून ती मोठी जाड फांदी ओढत ओढत वावरात आणली. भैया कांबळे म्हणाला, बांधावर टाका.वाळली की वस्तीवरच्या बायका घेऊन जातील.

झेंडे नंतर लांब लांब चालत जाऊन अजून कोणत्या ठिकाणी वायर तुटली आहेका बघत गेला आणि परत गळ्यात वारकर्यांसारखा पांढरा रुमाल टाकून चप्पल खेसटत आला.

झेंडेने अजून एक दोन फांद्या आमच्याकडून तोडून घेतल्या आणि स्वतः सिमेंटच्या त्या खांबावर सरासरा चढत वर गेला. आणि तिथल्या एका लोखंडी पट्टीवर माकडसारखा मावा चघळत बसला. तेव्हा बामन काका म्हणाले, जरा बेताने घ्या झेंडे साहेब. वायर आज नाही बसली तरी चालेल पण जीव सांभाळा. मग सगळ्यांनी या वाक्याला दुजोरा दिला.

एक तुटलेली वायर झेंडेने आधी जोडून घेतली.कसले कसले अवघड पीळ घातले वायरीला झेंड्याने काय बोलायलाच नको. झेंडे वर जाऊन मग आम्हाला तुटलेली वायर ओढायला सांगायला लागला. आता ही वायर दिसती तेवढी हलकी नसते हे मला पहिल्यांदाच कळलं. वायर चार माणसाने ओढून सुद्धा ओढत नव्हती. कोणीतरी म्हणाला, ट्रॅक्टर बोलवा. पण तेवढा वेळ झेंड्याकडे नव्हता. तो मावा थुकत आम्हाला इंस्पाईर करायला लागला. आणि ओढा जोरात म्हणायला लागला. मग सगळे जोर देऊन वायर ओढायला लागलो. तेव्हा आमच्या वडिलांनी काही विशिष्ट विनोद केले त्यावर आम्ही सगळे हसलो. मग झेंडे वरून हसताय काय ओढा हो जोरात असे म्हणायला लागले. शेवटी हात लाल झाले आणि झेंड्याने वर वायर व्यवस्थित रिंग मध्ये बसवली. आणि मोठ्याने वरूनच म्हणाला, बोला पांडुरंग हरी.

Rural Development : माळावरच्या वडासारखं घट्ट मनात रुतून बसलं गाव
Rural Development : ग्रामविकासात युवकांचा सहभाग महत्त्वाचा

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेवटी सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर परिपूर्णतेची खळी खुलली. तेवढ्यात वडील झेंड्याला म्हणाले, आता बटन दाबून बघू का? तेव्हा झेंडे वरूनच म्हणाले, बटन दाबा आणि मला डायरेक्ट वैकुंठात पाठवा. यावर सगळे हसले. झेंडे खाली उतरले. आणि गाडी घेऊन डेपोत फ्युजा जोडायला निघून गेले.आणि तिकडूनच त्यांनी वडिलांना फोनवर आता बटन दाबा असं सांगितलं. आणि परत पांडुरंग हरी असं म्हणून फोन ठेऊन दिला.

नंतर बटण दाबल्यानंतर मोटर सुरू झाली. आणि एकदमच गप्पाना रंग चढला. हसी मजाक झाली. राज्यावर लै ज्योक पडले. बामन काकांनी तर कुठले कुठले महाभारतातील रेफरन्स काढले. आणि अचानक कडूस पडायला सुरुवात झाली. उजेडामध्ये अंधार घुसायला सुरुवात झाली. आपट्याच्या झाडावर पक्षी जमायला लागले. शेवग्याच्या झाडावर भांडणासारखे साळुंख्या पक्षांचे आवाज सुरू झाले. वडिलांनी म्हशीला खायला टाकलं आणि सगळे पराक्रम केल्यासारखे गावात गाड्या घेऊन आले. सगकीकडे एकच चर्चा, तुटलेल्या वायरीची आणि नवीन आलेल्या झेंडे साहेबांची.

मला उद्या सकाळी परत निघायचं होतं. गावी आले की असं सगळं शेतीच अंगावर असतच. पण इकडे बर वाटतं. गावाकडे आपली माणसं असतात. कोणत्याही क्षुल्लक गोष्टीसाठी एकत्र येणारी, माहोल तयार करणारी. या माणसांच्या आवाजाचा मला फार आधार वाटतो.

हे गोतावळ्यातील आवाज कायम कानात असावेत असे वाटत राहते. सगळ्याच शक्यता चांगल्या असतात असं नाही. काही गोष्टींमुळे गाव नकोस वाटतं. पण या मातीतून पूर्ण मुक्ती नाही हे मी आता ओळखलं आहे. आपल्या आतून गाव पूर्णपणे काढण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते जाणार नाही. ते माळावरच्या वडासारखं घट्ट मनात रुतून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com