खरीप नियोजन : कपाशीतील असमतोल वाढ, तणनियंत्रण उपाययोजना

कपाशीतील असमतोल वाढ, तणनियंत्रण उपाययोजना
कपाशीतील असमतोल वाढ, तणनियंत्रण उपाययोजना
Published on
Updated on

गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी लागवड समस्यांत वाढ होत आहे. अशा स्थितीमध्ये आपल्या विभागातील दरवर्षी जाणवणाऱ्या समस्या नेमकेपणाने जाणून घेत त्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.

अतिरिक्त अथवा असमतोल वाढ :

  • ओलिताचा मुबलक वापर व रासायनिक खतांचा असमतोल वापर यामुळे कपाशी पिकाची अतिरिक्त अथवा असमतोल वाढ होताना आढळते. पिकाची कायिक वाढ जास्त होते. यात फळफांद्यातील अंतर जास्त होऊन फळफांद्याची संख्या कमी होते. परिणामी उत्पादनात घट येते. वाढ नियंत्रित करण्याकरिता लागवडीनंतर साधारणतः ३० दिवसांनी क्लोरमेक्वाट क्लोराईड १० मिलि अधिक सिलीकॉन १० मिलि प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे वापरावे.
  • यानंतर पीक साधारणत: ९० दिवसांचे झाल्यानंतर पुन्हा वरील वाढ नियंत्रकाची फवारणी करावी. यामुळे तापमानातील चढउतारापासून पिकाचे रक्षण होते. जमिनीतील ओल कमी अथवा जास्त झाल्यास त्यापासून पिकाचे संरक्षण होते.
  • बीटी कपाशीचे पीक ७० दिवसांचे व उंची साधारणपणे साडेतीन फूट झाल्यानंतर झाडांचे शेंडे खुडून घ्यावे. यामुळे पिकाची होणारी अतिरीक्त वाढ टाळली जाते. झाडाचे बूड जाड व फळफांद्या बळकट होतात.
  • लाल्या किंवा लालसर डाग विकृती :   कपाशीचे पीक बोंडे पक्वतेच्या अवस्थेत असताना लाल्या किंवा लालसर डाग विकृतीचा प्रादुर्भाव होताना दिसतो. जमिनीतील ओल अतिशय कमी झाल्यामुळे, अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होतो. बहुतांश कोरडवाहू शेतात लाल्याग्रस्त कपाशीची झाडे आढळतात. हे टाळण्यासाठी कोरडवाहू कपाशीची लागवड करताना किंवा पीक साधारणत: दीड महिन्याचे झाल्यावर डवऱ्याच्या फेरासोबत डवऱ्याच्या जानोळ्याला घट्ट दोरी बांधून दोन ओळींच्या मधोमध गाळा पाडून घ्यावा. यामुळे कपाशीचे पीक आपोआपच गादीवाफ्यावर येते. शेतामध्ये पडणारे पावसाचे पाणी सरीमध्ये जमा होऊन मूलस्थानी जलसंवर्धन होते. जमिनीतील ओल टिकून अन्नद्रव्याचा पुरवठा होऊन लाल्याचा प्रादुर्भाव कमी राहतो. सुरवातीला तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्यास पुढे लाल्याचा प्रादुर्भाव आढळतो.

    तणांचा प्रादुर्भाव

  • बीटी कपाशी पिकाला ओलिताची सोय, रासायनिक खतांचा मुबलक वापर, दोन ओळीमधील मोकळी जागा इत्यादी कारणांमुळे तणांचा प्रादुर्भाव वाढतो. कपाशीच्या पिकामध्ये सुरवातीचे ६५-७० दिवसांचा कालावधी तण व पीक यामधील तीव्र स्पर्धेचा काळ समजला जातो. या काळात तणांचा प्रादुर्भाव कमी राखण्यासाठी खालील उपाययोजना परिणामकारक ठरतात.
  • पेरणीपश्चात परंतु उगवणीपूर्व पेंडीमिथॅलीन ५ ते ८ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे ओलसर जमिनीवर समप्रमाणात फवारणी करावी. याद्वारे कपाशी उगवण्याआधी, जमिनीतील अंकुर फुटलेल्या तणांच्या बियाण्यांचा नायनाट करता येतो.
  • कपाशीच्या उभ्या पिकात तणांच्या नियंत्रणासाठी पायरोथिओबॅक सोडियम २.५ मिलि अधिक क्वीझॉलोफॉप ईथाईल २.५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करता येते.
  •  तणनियंत्रणासाठी लागवड पद्धतीत बदल बीटी कपाशीच्या प्रचलित लागवड पद्धतीमध्ये शेतकरी दोन ओळीतील अंतरानुसार शेताच्या एका दिशेने काकर पाडून घेतात. त्यानंतर मजुरांच्या साह्याने बीटी कपाशीचे बियाणे दोन झाडातील अंतरानुसार डोबून घेतात. या पद्धतीमध्ये बियाणे डोबताना ओळीतील झाडे काही प्रमाणात मागेपुढे होतात. त्यामुळे शेतात उभी-आडवी डवरणी शक्य होत नाही. दोन झाडामधील जागेतील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पूर्णपणे निंदनावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेतात मार्करच्या साह्याने काकर पाडताना पुढील उपाययोजना करावी. पेरणीच्या वेळी दोन ओळीतील अंतरानुसार उभे काकर पाडून घ्यावेत. त्यानंतर सव्वा ते दीड फुटी काकरीने आडवे काकर पाडावेत. अशा प्रकारे संपूर्ण शेतात फुल्या तयार होतात. या प्रत्येक फुलीवर एक या प्रमाणे बीटी बियाणे लावावे. पेरणी अशा प्रकारे केल्यास उभी - आडवी डवरणी शक्य होते. निंदणाच्या मजुरी खर्चात बचत होते.

     : जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७ (लेखक जितेंद्र दुर्गे व डॉ. शिंदे हे श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती येथे सहयोगी प्राध्यापक असून, आकाश वादाफळे हे रुरल इन्स्टिट्यूट, पिपरी, वर्धा येथे कार्यरत आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com