सिंधुदुर्गात शेतातच सडताहेत कलिंगडे

माझी आठ एकर कलिंगड शेती आहे. दिड एकरांमधील कलिंगडाची काढणी पुर्ण झाली आहे. सरासरी एकरी २५ ते ३० टन उत्पादन मिळाले. अजून साधारणपणे १४० ते १५० टन उत्पादन मिळेल. आता ३० टन मालाची नासाडी झाली आहे. अजून चार दिवसांनी ५० टन माल परिपक्व होणार आहे. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा कलिंगडे तयार होतील. हा सर्व माल गोवा येथील व्यापारी खरेदी करीत होते. मात्र संचारबंदीमुळे माल खरेदी करणार नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या कलिंगडाचे करायचे काय असा प्रश्‍न आमच्यासमोर आहे - दिपक कासोटे, शेतकरी, गडमठ, जि. सिंधुदुर्ग.
गडमठ येथील शेतकरी दिपक कासोटे यांच्या शेतातील परिपक्व झालेले कलिंगड पिक वाया जात आहे.
गडमठ येथील शेतकरी दिपक कासोटे यांच्या शेतातील परिपक्व झालेले कलिंगड पिक वाया जात आहे.

सिंधुदुर्ग  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर वाहतूक बंद आहे. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गावांमधील शेतांमध्ये परिपक्व झालेली शेकडो टन कलिंगडे संकटात सापडली आहेत. शेतातच माल सडत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने शेतीमाल विक्रीसाठी पास देण्यास सुरवात केली असली तरी व्यापारी माल उचलण्यास तयार नाहीत. बाजारपेठांमध्ये ग्राहकच नसतील तर माल घेऊन करायचे काय असा प्रश्‍न व्यापाऱ्यांसमोर आहे. त्यामुळे कलिंगड पिकावर अर्थकारण अवलंबून असणारे शेतकरी चिंतेत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत कलिंगड पिकाने अनेक शेतकऱ्यांना आधार दिला आहे. जिल्ह्यानजीक असलेल्या गोव्यातील पर्यटनामुळे तेथे या कलिंगडास मोठी मागणी आहे. पावसाळा संपला की नोव्हेंबरपासून कलिंगड लागवडीला सुरवात होते. साधारणपणे जानेवारीच्या पहिल्या किवा दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात कलिंगड उत्पादन सुरू होते. हा माल स्थानिक पातळीवर विक्री केला जातोच; परंतु, त्याहीपेक्षा गोव्यात कलिंगडास मोठी मागणी असते. गोवा, बांदा येथील अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कलिंगड खरेदी करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार टप्प्याने कलिंगडाची लागवड शेतकरी करतात.

यावर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कलिंगडास सुमारे ९ ते १० रूपये असा होलसेलचा दर होता. परंतु, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वाढला. त्यामुळे संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. त्याचा मोठा परिणाम इतर क्षेत्रांप्रमाणे शेतीक्षेत्रावर झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो टन माल परिपक्व झाला आहे. काही शेतकऱ्यांकडील माल पुर्णपणे सडला आहे. काही शेतकऱ्यांनी सुरूवातीला फक्त २० ते २५ टन माल विकला उर्वरित दिडशे ते दोनशे टन माल अजूनही शेतातच आहे.

शेतमाल विक्रीसाठी महसूल, कृषी विभागाकडून पास मिळतात. परंतु बाजारपेठेत ग्राहक नसल्यामुळे व्यापारी कलिंगड घेण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यातच देशात लॉकडाऊन करण्याअगोदर गोव्यातील कलिंगडाची बाजारपेठ तीन दिवस अगोदरच बंद करण्यात आली. त्यामुळे आता या कलिंगडांचे करायचे काय असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. अनेकांनी कर्ज काढून कलिंगडाची शेती केली आहे. त्यांच्या कर्जफेडीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

कलिंगड, आंबा किंवा अन्य फळांची विक्री जिल्हा किंवा राज्यात करण्यासाठी शासनाने पासची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कलिंगडे तयार असून त्यांची नासाडी होत आहे. परंतू, ही समस्या सर्वच ठिकाणच्या फळांच्या बाबतीत घडत आहे. जिल्ह्यातील नुकसानीचा योग्य तो अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  एस.जी.बागल यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com